Advertisement

धक्कादायक! जुहू बीचच्या मुळावर मेट्रो, झाडं कापून कास्टिंग यार्डचं काम


धक्कादायक! जुहू बीचच्या मुळावर मेट्रो, झाडं कापून कास्टिंग यार्डचं काम
SHARES

मेट्रो-३ सह अन्य मेट्रोच्या कामासाठी मुंबईच्या रस्त्यांवरची झाडं कापली जात आहेतच, पण त्याचवेळी मेट्रो-३ च्या कारडेपोसाठी चक्क आरेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. हे कमी म्हणून की काय, आता मेट्रो जुहू बीचच्याही मुळावर उठल्याचा आरोप सेव्ह ट्री आणि सेव्ह आरेने केला आहे.


जुहू बीचवर झाडांची कत्तल

मेट्रो-२ बच्या कामासाठी जुहू कोळीवाडा बीच येथील झाडांची कत्तल करून बीचवर बांधकाम केलं जात असल्याची माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली आहे. हे संपूर्ण बांधकाम विना परवानगी बेकायदेशीररित्या सुरू असल्याचाही आरोप बाथेना यांनी केला असून यासंबंधी लवकरच पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.



बीचवर उभं राहाणार कास्टिंग यार्ड

डी. एन. नगर, अंधेरी ते मानखुर्द या मेट्रो-२ ब च्या कामासाठी जुहु कोळीवाडा बीच येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून कास्टिंग यार्ड बांधण्यात येणार आहे. या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रोचे खांब, गर्डर आणि इतर भाग तयार केले जाणार आहेत. 

सुमारे १० एकर जागेवर हे कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार असून या कामाला पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. त्यासाठी बीचवरील १० फुटांपर्यंतच्या झाडांची, तिवरांची बेसुमार कत्तल करत ती जाळली जात असल्याची माहिती बाथेना यांनी दिली. या कामासाठी अद्यापपर्यंत एमएमआरडीएकडे कोणतीही परवानगी नसल्यानं विशेषत झाडं तोडण्याचं काम बेकायदेशीर असल्याचा दावा सेव्ह ट्रीकडून केला जात आहे.



MMRDAनं मात्र फेटाळले आरोप

झाडं तोडून ती जाळली जात असून बीचवरील वाळूचाही उपसा केला जात आहे. त्यामुळे बीच धोक्यात आल्याचं म्हणत सेव्ह ट्री लवकरच वृक्ष प्राधिकरणासह पोलिसांकडे यासंबंधी तक्रार करणार आहे. दरम्यान, याविषयी एमएमआरडीएचे संचालक(प्रोजेक्ट)मेट्रो पीआरके मूर्ती यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे काम कायेदशीर असल्याचं स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळले आहेत. ही जागा एमएमआरडीएच्या मालकीची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


आरेनंतर बीचवरूनही वाद रंगणार

आरे जंगल वाचवण्यासाठी सेव्ह ट्री आणि सेव्ह आरे प्रयत्नशील असून त्यांनी यासाठी जनआंदोलन सुरू केलं आहे. त्यात आता बीचवरही एमएमआरडीएची वक्रदृष्टी असल्यानं आता बीचवरूनही पर्यावरणवादी विरूद्ध एमएमआरडीए असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा