Advertisement

आर्थर रोड जेलचा होणार कायापालट, आता कैद्यांना मिळणार चमचमीत पदार्थ

वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना तुरुंगात मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनानं घेतला आहे.

आर्थर रोड जेलचा होणार कायापालट, आता कैद्यांना मिळणार चमचमीत पदार्थ
SHARES

वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना (Prisoners) तुरुंगात (Jail) मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा (Food quality) सुधारण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनानं (Jail administration) घेतला आहे. चिकन, मटन आणि रेस्टॉरंटमधील इतर पदार्थांसारखे चमचमीत पदार्थ तुरुंगातही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

त्याचप्रमाणे आरोग्याचं संवर्धन कऱण्यासाठी गरजेचे असणारे प्रोटीन बारसारखे पदार्थदेखील तुरुंगात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महाराष्ट्र तुरुंग प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईतील आर्थर रोड जेल लवकरच बहुमजली होणार आहे. यासोबतच मुंबईतील चेंबूरमध्ये देशातील पहिले बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्तावही तुरुंग प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यासाठी चेंबूरमधील महिला आणि बालकल्याण विभागाची १५ एकर जागा वापरण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकारनं मान्यता दिल्याचंही रामानंद यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्यातील येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणे या कारागृहांचा विस्तार करण्याचा प्रस्तावही आपण पाठ्वल्याचं रामानंद यांनी म्हटलं आहे. त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वाचा उपयोग करण्यात येणार आहे.


'हे' पदार्थ मिळणार

चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, सिझनल फ्रुट्स, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, सामोसा, च्यवनप्राश, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कोफी, फेस वोश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकोन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव इत्यादी पदार्थ आता राज्यातील तुरुंगांमधील कॅन्टीन्समध्ये मिळणार आहे.

मोजावे लागणार पैसे

कैद्यांना या पदार्थांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून मिळणाऱ्या पैशांमधून दर महिन्याला साडे चार हजार रुपये कॅन्टिनमधील पदार्थ खरेदी करण्यासाठी वापरण्याची मुभा असते. त्याचा उपयोग करून कैदी आता या पदार्थांपैकी कोणताही पदार्थ खरेदी करू शकणार आहेत. यातील अनेक पदार्थ कैद्यांना आधीही कॅन्टीनमध्ये विकत घेता येत होते. पण, आता त्यामध्ये अनेक पदार्थांची भर घालण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी ६० तुरुंगांमध्ये असणाऱ्या कैद्यांची संख्या ही क्षमतेपेक्षाही अधिक होती. क्षमतेच्या १५२ टक्के कैदी तुरुंगात होते. आतापर्यंत ४ हजार २४३ कैद्यांना कोरोना झाला आहे. त्यापैकी ४ हजार १५७ कैदी बरे झाले आहेत.

कोरोना काळात १३ हजार ११५ कैद्यांना पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनानं घेतला होता. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी झाली होती.

कैद्यांना घरी पाठवल्यामुळे रिकाम्या झालेल्या तुरुंगाचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्यात आला. यामुळे अनेक रुग्णांना वाचवण्यात यश आलं. सध्या सर्व तुरुंगात मिळून ७३ ऍक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. तर १३ कैदी आणि १० कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता अदानी समूहाकडे

मुंबईत उभारलं सर्वात मोठं सार्वजनिक शौचालय, टीव्ही, वायफायची सुविधा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा