Advertisement

बीकेसीतली बुलेट ट्रेन, विक्रोळीतून घेणार श्वास!

बीकेसीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ची जागा ताब्यात घेतल्यानंतर आता एनएचआरसीनं आपला मोर्चा विक्रोळीतील ४ एकरच्या जागेकडे वळवला आहे. या जागेवर बुलेट ट्रेन प्रकल्पातील व्हेंटिलेशन डक्ट उभारण्यात येणार असून डक्ट व्हेंटिलेशनद्वारे भुयारात मोकळी हवा पुरवण्यात येणार आहे.

बीकेसीतली बुलेट ट्रेन, विक्रोळीतून घेणार श्वास!
SHARES

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटडे (एनएचआरसी) ने गती दिली आहे. कारडेपो आणि बीकेसी स्थानकासाठी बीकेसीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ची जागा ताब्यात घेतल्यानंतर आता एनएचआरसीनं आपला मोर्चा विक्रोळीतील ४ एकरच्या जागेकडे वळवला आहे. या जागेवर बुलेट ट्रेन प्रकल्पातील व्हेंटिलेशन डक्ट उभारण्यात येणार असून डक्ट व्हेंटिलेशनद्वारे भुयारात मोकळी हवा पुरवण्यात येणार आहे. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिपेंद्र सिंग, जिल्हाधिकारी, उपनगर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


लवकरच बांधकाम

मुंबई ते अहमदाबाद हे अंतर काही तासांत पार करता यावं यासाठी १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च करत बुलेट ट्रेनचा घाट घालण्यात आला आहे. १२ स्थानकांचा समावेश असलेल्या बुलेट ट्रेनमधील बीकेसी ते ठाणे हा २१ किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. दरम्यान बीकेसी स्थानक आणि कारडेपोसाठी एनएचआरसीन बीकेसीतील एमएमआरडीएची जागा शोधली आणि मोठ्या प्रयत्नानंतर ही जागा मिळवलीही. त्यानुसार आता लवकरच या जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे.


४ एकर जागा

बीकेसी ते ठाणे या २१ किमीच्या भुयारी मार्गासाठी व्हेंटिलेशन डक्ट बांधण्यात येणार आहे. या व्हेंटिलेशन डक्टसाठी एनएचआरसीला ४ एकर जागेची गरज आहे. त्यामुळे बीकेसीतील जागेनंतर एनएचआरसीने मुंबईत मध्य उपनगरात जागा शोधण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार विक्रोळीतील सीटीएस क्रमांक ५१ चा चार एकरचा प्लाॅट एनएचआरसीनं शोधून काढला आहे.


जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा

या जागेवर व्हेंटिलेशन डक्ट बांधण्याचा निर्णय घेत ही जागा आपल्याकडे हस्तांतरीत करण्यात यावी यासाठी एनएचआरसीने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार जागा विकत घेत संपादित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून आता लवकरच ही जागा ताब्यात येईल, असंही सिंग यांनी सांगितलं आहे.


गोदरेजची जागा

गोदरेज कंपनीची ही जागा असून बाजाराभावाच्या २२५ टक्के अधिक किंमत देत ही जागा खरेदी केली जाणार असल्याचं समजतं आहे. गोदरेज कंपनीही जागा विकण्यास तयार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरचही जागा व्हेंटिलेशन डक्टसाठी एनएचआरसीच्या ताब्यात येईल, असं म्हटलं जात आहे.

४ एकर जागेवर व्हेंटिलेशन डक्ट उभारण्यात येणार आहे. भुयारी मार्गातील व्हेंटिलेशनसाठी लागणारी सर्व यंत्रणा या जागेत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हेंटिलेशन डक्ट बुलेट ट्रेनमधील अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे.



हेही वाचा-

मूठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट- राज ठाकरे

धक्कादायक...मुंबई-अहमदाबाद रेल्वेलाच प्रवासी नाहीत! बुलेट ट्रेनचं काय होणार?

वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा