Advertisement

बेस्ट समिती अध्यक्ष महापालिकेकडून बेदखल


बेस्ट समिती अध्यक्ष महापालिकेकडून बेदखल
SHARES

मुंबई - आर्थिक तोट्यात चाललेला बेस्ट हा महापालिकेचा अंगीकृत उपक्रम मानला जात असून, त्याला आर्थिक मदत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केला. बेस्टचा अर्थसंकल्प हा महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पासोबत मानला जावा, अशीही मागणी केली जात आहे. त्यामुळे एका बाजूला बेस्टला हातभार लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेनेच बेस्ट समिती अध्यक्षांना बेदखल केले आहे. यापूर्वी बेस्ट समिती अध्यक्षांसाठी मुख्यालयात दालनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आता नव्याने होणाऱ्या नुतनीकरणात बेस्टच्या या अध्यक्षांना दालनाचीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या नव्या विस्तारीत इमारतीतील पक्ष कार्यालये आणि वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्षांची कार्यालये जुन्या इमारतीत हलवली जात आहेत. या समिती अध्यक्षांच्या दालनाशेजारी बेस्ट समिती अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली होती. या दालनांचा वापर मागील अनेक वर्षांपासून बेस्ट समिती अध्यक्षांकडून केला जात आहे. परंतु मुख्यालयाच्या नुतनीकरणामध्ये सर्व वैधानिक समिती तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांची दालने तसेच पक्ष कार्यालये ही जुन्या इमारतीत स्थलांतरीत करताना बेस्ट समिती अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्ट समितीच्या नव्या अध्यक्षांना दालनाविनाच महापलिका मुख्यालयात फिरावे लागणार आहे.

बेस्ट समिती अध्यक्ष हे महापालिकेचे सदस्य असतात. त्यामुळे महापालिकेत बेस्टच्या अध्यक्षांना महापालिका मुख्यालयात यावे लागते. याकरताच मुख्यालयात बेस्ट समिती अध्यक्षांसाठी एक दालन उपलब्ध करून देण्यात आले होते. बेस्ट समिती अध्यक्षांसाठी बेस्ट भवनमध्ये स्वतंत्र दालन आणि कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्षांसाठी महापलिका मुख्यालयात दालनाची आवश्यकता नाही, असे मत महापालिका आयुक्तांनी व्यक्त करत नुतनीकरणामध्ये बेस्ट समिती अध्यक्षांसाठी दालनाची व्यवस्था न केल्याचे बोलले जात आहे.

परंतु महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुख्यालय इमारत देखाभाल विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांना विचारले असता, त्यांनी बेस्ट समिती अध्यक्षांसाठी दालनाची व्यवस्था नुतनीकरणात करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या इमारतीच्या तळ मजल्यावर शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, सपा आदींच्या पक्ष कार्यालयांसाठी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. तर तळमजल्यावर महिला आणि बाल कल्याण समिती, विधी समिती, पहिल्या मजल्यावर स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), आरोग्य समिती, उद्यान आणि बाजार समिती अध्यक्षांसह सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयाशेजारील विधी विभागाच्या जागेवर सत्ताधाऱ्यांचा डोळा असून, त्याठिकाणी बेस्ट समिती अध्यक्षांचे दालन बनवले जावे, म्हणून मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा