Advertisement

अखेर म्हाडाने दिली कंत्राटदारांना थकबाकी


अखेर म्हाडाने दिली कंत्राटदारांना थकबाकी
SHARES

गेल्या १२ दिवसांपासून दक्षिण मुंबईतील बी वाॅर्डमधील उपकरप्राप्त धोकादायक-अतिधोकादायक इमारतींची ठप्प असलेली दुरूस्तीची कामे अखेर बुधवारपासून सुरू झाली आहेत. बी वाॅर्डमधील कंत्राटदारांची बिलाची थकबाकी देण्यास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने सुरूवात केल्याने कंत्राटादारांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याने बुधवारपासून पुन्हा दुरूस्तीच्या कामाने वेग घेतला आहे.


बी वाॅर्डमध्ये अंदाजे 1300 धोकादायक-अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारती असून या इमारतींची दुरूस्ती दुरूस्ती मंडळाच्या माध्यमातून केली जाते. अंदाजे 300 कंत्राटदारांच्या माध्यमातून सध्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. पण दुरूस्ती मंडळाला सरकारकडून वेळेत निधी मिळत नसल्याने, उपलब्ध निधी अपुरा पडत आहे. त्यामुळेच फेब्रुवारी 2017 पासून या 300 कंत्राटादारांची बिले चुकती करण्यात आली नव्हती. अंदाजे 16 कोटींची थकबाकी मंडळाकडे होती. तर बिले न मिळाल्याने कंत्राटदारांनी आक्रमक होत 1 सप्टेंबरपासून काम बंद केले.


भेंडीबाजार इमारत दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीच कंत्राटदारांनी दुरूस्तीची कामे बंद केल्याने धोकादायक-अतिधोकादायक इमारतींच्या दुरूस्तीचा प्रश्न गंभीर झाला होता. दरम्यान यासंबंधीचे सविस्तर वृत्त गेल्या आठवड्यात सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर दुरूस्ती मंडळ चांगलेच अडचणीत आले. म्हाडा प्राधिकरणानेही या वृत्ताची गंभीर दखल घेत काही करा, कुठूनही पैसा उभारा, पण दुरूस्तीची कामे सुरु करा, असे आदेश दुरूस्ती मंडळाला दिले. आदेशानंतर दुरूस्ती मंडळ कामाला लागले नि पैशांची जुळवाजुळव करत अखेर कंत्राटदारांची थकबाकी देण्यास सुरूवात केली आहे.


फेब्रुवारी ते मे पर्यंतची थकबाकी मंडळाने दिली आहे. तर पुढची थकबाकी लवकरच देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही सकाळपासूनच कामाला सुरूवात केली आहे. पण येत्या आठ दिवसांत आॅगस्टपर्यंतची थकबाकी मिळाली नाही तर आम्ही पुन्हा काम बंद करु.

-आसिफ खुरेशी, अध्यक्ष, म्हाडा बी वाॅर्ड काॅन्ट्रक्टर असोसिएशन


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा