Advertisement

जुन्या इमारतींची दुरूस्ती धोक्यात? थकित रक्कम मिळेपर्यंत कंत्राटदारांचं 'कामबंद'


जुन्या इमारतींची दुरूस्ती धोक्यात? थकित रक्कम मिळेपर्यंत कंत्राटदारांचं 'कामबंद'
SHARES

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेनंतर दक्षिण मुंबईतील जीर्ण-जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा आणि दुरुस्तीचा प्रश्न एेरणीवर आला असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईतील बी वॉर्डमधील उपकरप्राप्त धोकादायक-अतिधोकादायक इमारतींच्या दुरुस्तीचे काम आठवड्याभरापासून बंद आहे. 

बी वॉर्डमधील दुरूस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना केलेल्या कामाचा पैसाच न मिळाल्याने या कंत्राटदारांनी 1 सप्टेंबरपासून दुरूस्तीची कामेच बंद केली आहेत. 'जोपर्यंत बिलाची थकलेली रक्कम मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही' अशी ठाम भूमिकाही म्हाडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बी वॉर्डने घेतली आहे. तर म्हाडाने मात्र निधीची चणचण असल्याचे म्हणत हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जुन्या इमारतींची दुरूस्ती धोक्यात आली असून भेंडीबाजारसारखी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

दक्षिण मुंबईत 14 हजार 40 ते 150 वर्षे जुन्या इमारती आजच्या घडीला आहेत. या इमारतींच्या दुरूस्तीची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे आहे. त्यानुसार दरवर्षी इमारतींचे सर्व्हेक्षण करत ज्या ज्या इमारतींना दुरूस्ती आवश्यक आहे, त्या इमारतींची दुरूस्ती कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जाते. पण गेल्या काही वर्षांपासून कंत्राटदारांना केलेल्या कामाची बिलेच मिळत नसल्याने कंत्राटदार आता आक्रमक झाले आहेत.

बी वॉर्डमध्ये अंदाजे 1300 इमारती असून त्यातील अनेक इमारतींची दुरूस्ती मंडळाकडून सुरू आहे. बी वॉर्डमध्ये अंदाजे 300 छोटे-मोठे कंत्राटदार असून त्यांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. पण या सर्व कंत्राटदारांची 5 लाख ते 10 लाखांची दुरूस्तीच्या कामाची थकबाकी असल्याची माहिती म्हाडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बी वॉर्डचे अध्यक्ष आसिफ खुरेशी यांनी दिली आहे. कामाचा पैसाच मिळत नसेल तर पुढच्या कामासाठी पैसा आणायचा कुठून? मजुरांना पगार द्यायचा कुठून? असा सवाल खुरेशी यांनी केला.

आता आमच्या हातात पुढचे काम करण्यासाठी पैसाच नाही. थकबाकी मिळावी म्हणून आम्ही वेळोवेळी दुरूस्ती मंडळाकडे पाठपुरावा करतो. पण तरीही मंडळ आमच्याकडे लक्षच देत नव्हते. त्यामुळे बी वॉर्डमधील सर्व कामे आम्ही बंद केली असून जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही. अशावेळी दुर्घटना घडली तर त्याला आम्ही जबाबदार नाही.

आसिफ खुरेशी, अध्यक्ष, म्हाडा कॉन्ट्रॅक्टर, बी वॉर्ड


निधीच नाही तर बिले द्यायची कुठून? म्हाडा हतबल

14 हजार इमारतींच्या दुरूस्तीसाठी मंडळाला राज्य सरकारकडून वर्षाला 100 कोटींचा निधी मिळतो. म्हणजेच प्रत्येक इमारतीसाठी अंदाजे 71 हजार रुपये इतका निधी. सर्व 14 हजार इमारतींची दुरूस्ती दरवर्षाला होत नाही, पण दुरूस्तीसाठीच्या इमारतींची संख्या तशी खूप मोठी आहे. असे असताना 100 कोटींचा निधी दुरूस्तीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे कंत्राटदारांची बिले देता येत नसल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अभियंत्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. दरम्यान, थकबाकीदार कंत्राटदारांची बिले येत्या आठ दिवसांत चुकती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.


200 कोटींचा निधी कागदावरच

म्हाडाच्या मागणीनुसार सरकारने 300 कोटी नाही, पण 200 कोटी निधी देण्याला मंजुरी दिली आहे. 200 कोटींचा निधी देण्याचा निर्णय होऊन तीन ते चार वर्षाचा काळ लोटला पण अद्यापही म्हाडाला 200 कोटींचा निधी काही मिळालेला नाही. त्यामुळे सरकारची ही घोषणा अद्यापही कागदावरच आहे.


आहे तो निधीही मिळेना

100 कोटींचा निधी दरवर्षी म्हाडाला मिळणे अपेक्षित आहे. पण ही 100 कोटींची रक्कमही पूर्णपणे मिळत नसल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. गेल्या वर्षी 79 कोटी तर या वर्षी 88 कोटी इतका निधी मिळाला आहे. त्यामुळे आहे तो निधीही पूर्णपणे मिळत नसल्याने कंत्राटदारांची बिले मंडळाला देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने याकडे आता गांभीर्याने लक्ष देत हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी कंत्राटदारांसह म्हाडाकडून होत आहे.

माझ्या काळात 200 कोटींचा निधी देण्याची मागणी मान्य करत सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला. पण अद्याप हा निधी मिळत नाही हे खरे आहे. पण हा निधी म्हाडाला मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: सकारात्मक असल्याने लवकरच हा निधी मिळेल.

प्रसाद लाड, माजी सभापती, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळ



हेही वाचा

'त्या' 83 कुटुंबांची अखेर मृत्युच्या दाढेतून सुटका!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा