Advertisement

'त्या' 83 कुटुंबांची अखेर मृत्युच्या दाढेतून सुटका!


'त्या' 83 कुटुंबांची अखेर मृत्युच्या दाढेतून सुटका!
SHARES

विक्रोळी, कन्नमवारनगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या चारही बाजुने टेकू लावलेल्या इमारती पाहिल्याबरोबर पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. तर मृत्युच्या दाढेत शिबिरार्थी कसे राहतात? हा प्रश्न पिच्छा सोडत नाही. पण म्हाडाच्या निष्क्रियतेमुळे या रहिवाशांवर मृत्युच्या दाढेत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. असे असताना आता कन्नमवार येथील 83 कुटुंबांच्या डोक्यावरील मृत्यूची तलवार दूर होणार आहे. कारण या 83 कुटुंबांना जवळच्या नव्या तात्पुरत्या संक्रमण शिबिरात हलवण्याच्या प्रक्रियेला अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने सुरूवात केली आहे.

दरम्यान, 'मुंबई लाइव्ह'ने घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर कन्नमवारनगरमधील शिबिरार्थी कसे टेकू लावलेल्या इमारतीत मृत्युच्या सावटाखाली राहत आहेत, यासंबंधीची व्यथा मांडली होती. 'मुंबई लाइव्ह'च्या या वृत्तानंतर नव्या संक्रमण शिबिरात शक्य तितक्या शिबिरार्थींना सामावून घेण्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर ही मागणी आता मान्य करत दुरुस्ती मंडळाने 83 कुटुंबीयांना नवे गाळे देण्याचा निर्णय घेतला आहे.

या नरकात आम्ही हौस म्हणून नव्हे, तर नाईलाजाने राहत आहोत. म्हाडाने एक तर आम्हाला लवकरात लवकर हक्काचे कायमस्वरुपी घर मास्टरलिस्टच्या माध्यमातून द्यावे आणि आमची या नरकातून सुटका करावी. दरम्यान, 83 कुटुंबांना विक्रोळीतीलच नव्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचा म्हाडाचा निर्णय या कुटुंबासाठी दिलासादायक आहे.

रवि पाबेरकर, रहिवाशी, कन्नमवारनगर संक्रमण शिबिर

कन्नमवार नगर येथे संक्रमण शिबिराच्या बऱ्याच इमारती असून त्यात अंदाजे 2000 संक्रमण शिबिरार्थी राहत आहेत. उपकर प्राप्त धोकादायक-अतिधोकादायक इमारतीतून या रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. पण 30 ते 40 वर्षे झाली, तरी हे रहिवाशी संक्रमण शिबिरातच आयुष्य काढत आहेत. कारण त्यांच्या मूळ इमारतीचा पुनर्विकासच मार्गी लागत नसल्याने त्यांना हक्काचे घरच मिळाले नाही. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षात कन्नमावारनगरातीलच नव्हे, तर म्हाडाच्या सर्वच जुन्या संक्रमण शिबिरांची मोठी दुरवस्था झाली आहे. ही संक्रमण शिबिरे दुरुस्तीच्या पलिकडे गेली आहेत.

त्यामुळेच कन्नमवारनगरमधील 67, 68, 130, 131, 180, 181, 182 सह अन्य संक्रमण शिबिराच्या इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे. या इमारती गेल्या काही वर्षांपासून टेकूवर उभ्या असून पावसाळ्यात या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता आहे. पण दुरुस्ती मंडळ मात्र याकडे गांभीर्याने लक्षच देताना दिसत नाही. या संक्रमण शिबिरार्थींसाठी दुरूस्ती मंडळाने गोराईतील नव्या संक्रमण शिबिराची व्यवस्था केली आहे. त्यानुसार येथील अतिधोकादायक संक्रमण शिबिरातील 400 रहिवाशांना गोराईतील गाळ्यांचे वितरण करत कन्नमावरमधील घरे रिकामी करण्याचे आदेशही दिले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र या शिबिरार्थींविरोधात जबरदस्तीने घरे रिकामी करत त्यांना गोराईत हलवण्याचे धाडस काही दुरुस्ती मंडळ दाखवताना दिसत नाही. त्यामुळे अशा अतिधोकादायक संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या जीवाचा प्रश्न एरणीवर आला आहे.

अजूनही उर्वरित शिबिरार्थींचा प्रश्न जैसे थेच आहे. दुरुस्ती मंडळाने मास्टरलिस्टच्या प्रक्रियेला वेग देत हक्काची घरे या शिबिरार्थींना देणे गरजेचे आहे. दक्षिण मुंबईतील नव्या संक्रमण शिबिरातही मोठ्या संख्येने घुसखोरी झाली असून या घुसखोरांना काढले तरी किमान 1000 गाळे उपलब्ध होतील.

अभिजीत पेठे, अध्यक्ष, ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेनंतर मात्र दुरुस्ती मंडळ बऱ्यापैकी सक्रिय झाले आहे. त्यानुसार कन्नमवारनगरमधील 67, 68, 130 आणि 131 या संक्रमण शिबिरातील शिबिरार्थींची लवकरच मृत्युच्या दाढेतून सुटका होणार आहे. कारण कन्नमवारनगरमध्ये दुरुस्ती मंडळाने 93 गाळ्यांचे नवे तात्पुरते संक्रमण शिबीर बांधले आहे. या संक्रमण शिबिरात या चार इमारतीतील 83 रहिवाशांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय दुरूस्ती मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वीच नव्या गाळ्यांच्या वितरणाचे पत्र पाठवण्यात आले असून येत्या काही दिवसांतच या संक्रमण शिबिरार्थींना नव्या गाळ्यात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.


उर्वरित शिबिरार्थींवर मृत्यूची टांगती तलवार तशीच!

180, 181, 182 या संक्रमण शिबिराच्या इमारतींचीही मोठी दुरवस्था असून या इमारती टेकूवर उभ्या आहेत. यातील शिबिरार्थींना गोराईतील गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. पण 40 वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील हक्काचे घर सोडून विक्रोळीत संक्रमण शिबिरात आलो ते आलो. आता 40 वर्षांपासून येथे राहत असताना आता पुन्हा थेट गोराईतील संक्रमण शिबिरात फेकत म्हाडा आपल्यावर अन्याय करत असल्याचे म्हणत या शिबिरार्थींनी इथून हलण्यास विरोध दर्शवला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा