दादर इथं शिवसेना भवनासमोर कोहिनूर स्क्वेअर नावानं दोन टोलेजंग इमारती आकारत घेत आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून कोहिनूर स्क्वेअरचं काम बंद पडल्यानं या दोन्ही टोलेजंग इमारती अर्धवट अवस्थेत आहेत. आता या इमारतींच्या कामाला तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा सुरूवात होणार अाहे. पुढच्या दीड वर्षात कोहिनूरच्या या दोन्ही टोलेजंग इमारती बांधून पूर्ण होतील.
कोहिनूर स्क्वेअर प्रकल्पाचं काम माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांच्या हातातून गेलं आहे. तर आता या कोहिनूरला पैलु पाडण्याची अर्थात हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी संदीप शिर्के अॅण्ड असोसिएट या कंपनीवर आली आहे. त्यानुसार या कंपनीनं दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
दादर शिवसेना भवनसमोर २००९ मध्ये कोहिनूर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. कोहिनूर प्रकल्पासाठी उन्मेश जोशी यांनी बँकांकडून ९०० कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडण्यात उन्मेश जोशी हे अपयशी ठरले. हा प्रकल्प आर्थिक अडचणींमुळे दोन वर्षांपासून ठप्प आहे. कर्ज फेडलं जात नसल्यानं बँकांनी नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्युनलकडे जून २०१७ मध्ये दाद मागितली होती. त्यानुसार ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयानुसार हा प्रकल्प उन्मेश जोशी यांच्या हातून निसटला आहे.
प्रभादेवी येथील संदिप शिर्के अॅण्ड असोसिएट कंपनी हा प्रकल्प आता पूर्ण करणार आहे. त्यानुसार २६ जानेवारीपासून प्रकल्पाच्या कामाला पुन्हा सुरूवात होणार आहे. दोन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प काम सुरू झाल्यापासून १५ ते १६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचं संदिप शिर्के अॅण्ड असोसिएटकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -
खूशखबर: म्हाडा लाॅटरीत खेळाडू, अनाथांसाठी राखीव घरं; लोकप्रतिनिधींचा कोटा निम्मा
सीसी नसलेल्या प्रकल्पांनाही महारेरात सामावून घ्या, ग्राहक पंचायतीचं केंद्राला साकडं