Advertisement

मेट्रो डबे पुरवण्यासाठी सात बड्या कंपन्या उत्सुक

मेट्रो २ अ आणि मेट्रो-७ मार्ग कार्यान्वित करण्यासाठी तब्बल ३७८ मेट्रो डबे लागणार आहेत. हे डबे पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा मंगळवारी दिल्लीत खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार मेट्रोचे डबे पुरवण्यासाठी भारतासह परदेशातील सात बड्या कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

मेट्रो डबे पुरवण्यासाठी सात बड्या कंपन्या उत्सुक
SHARES

मेट्रो-२ अ अर्थात दहिसर ते डीएन नगर आणि मेट्रो ७, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो मार्गाचं काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वेगात सुरू आहे. एकीकडे बांधकाम सुरू असतानाच दुसरीकडे रोलिंग स्टाॅक अर्थात मेट्रो डबे, सिग्नल यंत्रणा आणि इतर काम पूर्ण करून घेण्याकडे एमएमआरडीएचा कल आहे. 


त्याचाच भाग म्हणून मेट्रोचे डबे पुरवण्यासाठी एमएमआरडीएकडून मागवण्यात आलेल्या निविदेला कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार सात बड्या कंपन्यांनी यासाठी उत्सुकता दाखवल्याची माहिती महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी  दिली आहे.


३७८ डबे लागणार

मेट्रो २ अ आणि मेट्रो-७ मार्ग कार्यान्वित करण्यासाठी तब्बल ३७८ मेट्रो डबे लागणार आहेत. हे डबे पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा मंगळवारी दिल्लीत खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार मेट्रोचे डबे पुरवण्यासाठी भारतासह परदेशातील सात बड्या कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. मे. हयुंदाई राॅटेम (कोरीया), मे. बम्बार्डीयर इंडिया अॅण्ड बाम्बार्डीयर जर्मनी, मे. सीआरआरसी काॅर्पेरेशन (मर्यादीत), मे. भारत अर्थ मूव्हर्स (मर्यादीत), मे. टायटॅगर वॅगन्स अॅण्ड टायटॅगर फिरेमा, मे. अॅस्ल्टाॅम ट्रान्सपोर्ट इंडिया अॅण्ड अॅल्स्टाॅम एस. ए. आणि मे. सीएएफ इंडिया अॅण्ड सीएएफ स्पेन अशा कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.


पर्यावरणपुरक डबे

मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एशियन डेव्हल्पमेंट बँकेच्या निकषांनुसार या निविदा मागवण्यात आल्या होत्या. प्रवाशांचा, वरिष्ठ नागरिकांचा, दिव्यांगांचा प्रवास सुकर होईल अशी मेट्रो डब्यांची रचना असावी, वातानुकुलित आणि पर्यावरणपुरक डबे असावेत, डब्यात सीसीटीव्ही आणि इतर सुविधा असाव्यात अशी मुख्य अट निविदेत असल्यानं या अटींसह मेट्रोचे डबे तयार करावे लागणार आहेत.


मूल्यांकन समितीकडून छाननी 

सादर झालेल्या सात निविदांची आता मूल्यांकन समितीकडून छाननी केली जाईल आणि त्यानंतर लवकरच निविदा अंतिम केली जाईल, असंही राजीव यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं या सात कंपन्यांमधून कुठली कंपनी बाजी मारते हे आता लवकरच समजेल. दरम्यान मेट्रो २ अ आणि मेट्रो-७ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होतील असा पुनरूच्चारही यावेळी राजीव यांनी केला आहे.



हेही वाचा-

गिरणी कामगारांसाठी खूशखबर! आधी अर्जांची छाननी मगच लॉटरी

सिडकोच्या घरांसाठी तुफान प्रतिसाद; ७ दिवसांत ३५ हजार नोंदणी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा