चर्चगेट, कफ परेडमध्ये रात्रभर मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मशिन्सचा गोंगाट

 Mumbai
चर्चगेट, कफ परेडमध्ये रात्रभर मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मशिन्सचा गोंगाट
Mumbai  -  

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ची मनमानी आणि ती ही कायदा धाब्यावर बसवत सर्रासपणे सुरू आहे. चर्चगेट आणि कफ परेडमधील रहिवाशांना मंगळवारी पुन्हा एमएमआरसीच्या मुजोरीचा अऩुभव आला असून या मुजोरीचा त्रासही सहन करावा लागत आहे. रात्री आठ वाजल्यानंतरही एमएमआरसीकडून ओव्हल मैदान आणि कफ परेड येथे दगड फोडण्याचे काम सुरू होते. मोठाल्या मशिन्सच्या आवाजामुळे रहिवाशांच्या झोपेचे खोबरे झाले. सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेत अखेर दीडच्या सुमारास काम थांबले. पण त्यानंतर सकाळी सहा वाजताच कामाला पुन्हा सुरूवात झाल्याची माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य आणि स्थानिक रॉबिन जयसिंघानी यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्रीच्या वेळेस बांधकामाशी संबंधित कोणतेही काम करता येत नाही. यासंबंधी राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. असे असताना मेट्रो असो वा इतर कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प, रात्रीच्या वेळेस काम करताच येत नाही. त्यामुळेच मंगळवारी रात्री 1 वाजता ओव्हल मैदान आणि कफ परेडमधील काम थांबवण्यासाठी सेव्ह ट्रीचे सदस्य कामाच्या ठिकाणी गेले असता आपल्याकडे आवश्यक ती परवानगी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मोडण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा प्रश्न करत जयसिंघानी यांनी परवानगीचे पत्र मागितले असता उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाद घातला. शेवटी रात्री दोनच्या सुमारास त्यांना काम बंद करावे लागले. दरम्यान पोलिसांकडेही यासंबंधी तक्रार केली, पण पोलिसांनीही परवानगी असल्याचे सांगत रहिवाशांच्या बाजूकडे साफ दुर्लक्ष केल्याचे सेव्ह ट्रीकडून सांगण्यात आले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हा भंग आहे. त्यातही सरकारी यंत्रणेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आता तक्रारदारांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे. तर यासाठी जी काही मदत लागेल ती निश्चितपणे आवाज फाऊंडेशन करेल- सुमेरा अब्दुलअली, आवाज फाऊंडेशन

एमएमआरसी सातत्याने कायद्याचे उल्लंघन करत असल्याने आता कायद्यानेच एमएमआरसीला धडा शिकवू असे सांगत जयसिंघानी यांनी याबाबत पुनर्याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान यासंबंधी एमएमआरसीच्या प्रवक्त्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते नॉट रिचेबल होते.

Loading Comments