झोपुकडून एका दिवसांत 20 इमारतींना ओसी

 Mumbai
झोपुकडून एका दिवसांत 20 इमारतींना ओसी

मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंर्तगत बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतींतील सुमारे 35 हजार सदनिकांच्या ओसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ओसी पंधरवडा मोहिम राबवली आहे. या मोहिमेंर्तगत 9 मार्चला एका दिवसांत 20 इमारतींतील सुमारे 3,500 घरांना ओसी देण्यात आली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते झोपु प्राधिकरणाच्या मुख्यालयात एका कार्यक्रमात 20 इमारतींना ओसी वितरीत करण्यात आली. झोपुचे अधिकारी-कर्मचारी मार्चअखेरीपर्यंत ओसीच्याच कामावर भर देणार असल्याने मार्चअखेरपर्यंत 31 हजार 401 सदनिकांच्या ओसीचा प्रश्न निकाली निघेल, अशी माहिती झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी दिली आहे. तर, मेहता यांनी झोपुच्या या उपक्रमाचे कौतुक करत झोपडपट्टीवासियांच्या हिताचे असे अनेक निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला.

झोपु योजनेखाली बांधण्यात आलेल्या कित्येक इमारतींना ओसी नसल्याने त्या इमारतीत राहणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. ओसी नसल्याने पाणी, वीज बिल आणि इतर करांची रक्कम दामदुप्पटीने भरावी लागत आहे. झोपु प्राधिकरणाच्या सर्व्हेक्षणानुसार 44, 698 सदनिकांना ओसी नसल्याचे समोर आले. त्यामुळे झोपुने गेल्या वर्षी एप्रिल 2016 मध्ये 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 पर्यंत या सर्व सदनिकांना ओसी देण्याचे टार्गेट ठेवले. पण प्रत्यक्षात 1 एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत 44, 698 पैकी केवळ 13, 297 सदनिकांना ओसी देण्याचे टार्गेट झोपुला पुर्ण करता आले. हे टार्गेट पूर्ण न करता आल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 7 मार्च ते 21 मार्च असा विशेष ओसी पंधरवडा जाहिर केला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत ओसी देण्याचे काम वेगात सुरू आहे.

या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून 21 मार्चपर्यंत 31 हजार 401 सदनिकांना ओसी देण्याचे टार्गेट पूर्ण करण्याचा झोपुचा मानस आहे. झोपुच्या या उपक्रमामुळे सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला असून सोसायट्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Loading Comments