Advertisement

मुद्रांक शुल्क नोंदणीसाठी चार महिने मुभा

३१ मार्चपूर्वी केव्हाही नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करता येणार आहे.

मुद्रांक शुल्क नोंदणीसाठी चार महिने मुभा
SHARES

स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१  पर्यंत मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येणार आहेत. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

३१ मार्चपूर्वी केव्हाही नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्तनोंदणी करता येणार आहे. त्यामुळे निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असं आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलं आहे.

१ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर ५ टक्क्यांवरुन ३ टक्के करण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्थावर मालमत्तेशी संबंधित खरेदी, विक्री, भाडेकरार अशा स्वरुपाच्या करारांसाठी दस्तऐवजांवर ३१ मार्च २०२१ पर्यंत सर्व संबंधित पक्षकारांनी सही करणे आवश्यक आहे. अथवा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क भरुन कराराच्या दस्तऐवजांवर सही करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली तर कराराशी संबंधित पक्षकारांना दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी सही केल्याच्या दिवसापासून  चार महिन्यांची मुभा मिळेल. यामुळे दगदग टाळून आरामात दस्तऐवजांची नोंदणी करणे शक्य होणार आहे.

शासनाने १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत संपूर्ण राज्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट देऊन ५ टक्केऐवजी २ टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी लागू केली. त्यानंतर १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर ३ टक्के ठेवला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या सवलतीचा लाभ घेण्याकरिता मार्च २०२१ अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असं आवाहन मुंबई शहर सह जिल्हा निबंधक उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा