Advertisement

नशीब असावं तर असं... एकाच घरातील तीन जणांना लाॅटरी

लाॅटरीसाठी म्हाडा भवनात उपस्थित असलेला एक तरूण मात्र कमालीचा खुश होता. अगदी आनंदानं नाचत होता. नाचणार नाही तर काय, अहो जिथं दहा दहा अर्ज भरून एक घर सोडा, प्रतिक्षायादीतही नाव येत नाही तिथं या तरूणाच्या घरात एक-दोन नव्हे तर तीन घरं लागली आहेत.

नशीब असावं तर असं... एकाच घरातील तीन जणांना लाॅटरी
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी रविवारी लाॅटरी फुटणार म्हणता सर्वच अर्जदारांच्या हृदयाची धडधड नक्कीच शनिवारपासूनच वाढली असेल. मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच एकमेव इच्छा असते. मग त्यातून अनेकांनी देव पाण्यात ठेवला असेल, तर कुणी उपवासही केला असेल, कुणी सकाळी सकाळी देवाला साकडंही घातलं असेल. एवढं करूनही घर न लागल्यानं हजारो अर्जदारांच्या चेहऱ्यावर निराशा होती. 


घर जिंकण्याची हॅट्रिक

त्याचवेळी लाॅटरीसाठी म्हाडा भवनात उपस्थित असलेला एक तरूण मात्र कमालीचा खुश होता. अगदी आनंदानं नाचत होता. नाचणार नाही तर काय, अहो जिथं दहा दहा अर्ज भरून एक घर सोडा, प्रतिक्षायादीतही नाव येत नाही तिथं या तरूणाच्या घरात एक-दोन नव्हे तर तीन घरं लागली आहेत. आई, वडील आणि स्वत: या तरूणाला मुंबईत घर लागलं असून घर जिंकण्याची हॅट्रिक साधली आहे. म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरातील तीन जणांना घर लागलं असावं.


अाई, वडिलांसहीत अर्ज

या तरूणाचं नाव आहे रमीझ तडवी. सरकारी कर्मचारी असलेला रमीझ सध्या टिटवाळ्याला भाड्याच्या घरात राहतो. तर त्याला कामासाठी सीएसएमटीला यावं लागतं. रोजचा इतका मोठा प्रवास करून वैतागलेल्या रमीझला मुंबईत हक्काचं घर हवं होतं. पण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं हे सर्वसामान्यांच्या बस की बात नाही. याचं कारण मुंबईतील घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती.

त्यामुळं परवडणाऱ्या दरात घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अशा नागरिकांना म्हाडाशिवाय पर्याय नाही. त्यानुसार रमीझच्या आई, वडिलांनी आणि रमीझनं स्वत घरांसाठी अर्ज केले. लाॅटरीच्या दिवशी तो स्वत आवर्जून म्हाडा भवनात उपस्थित राहिला. दहा दहा अर्ज भरले तरी लाॅटरी लागत नाही असा हजारोंचा अनुभव असतो.


ही पहिलीच वेळ

रमीझ मात्र या लाॅटरीत चांगलाच लकी ठरला आहे. रमीझला तर घर लागलंच.  पण रमीझच्या आईला आणि वडिलांनाही घर लागलं आहे. एकाच घरात तीन घर लागण्याची ही पहिलीच वेळ. आता टिटवाळ्यावरून थेट मुंबईत हक्काच्या घरात लवकरच रमीझ आणि त्याचे आई-वडील राहायला येण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानं रमीझचा आनंद गगनात मावत नव्हता. ही आपल्यासाठी खूप मोठी बाब असल्याचं म्हणत म्हाडासह सर्वांचेच आभार त्यानं मानले आहेत.


१ घर द्यावं लागणार

वडाळ्यासह अन्य दोन ठिकाणी तडवी कुटुंबाला घर लागलं आहे. म्हाडा कायद्यानुसार पती-पत्नी असं कुटुंब समजलं जातं. तर १८ वर्षापुढील मूल हे स्वतंत्र कुटुंब मानलं जातं. त्यानुसार रमीझला लागलेल्या घराचा ताबा त्याला मिळेल. मात्र, त्याचवेळी आई वा वडील यापैकी एकाचं घर म्हाडाला परत करावं लागेल. तर एक घर त्याला घेता येईल. म्हणजेच तीन घरं लागली असली तरी प्रत्यक्षात मात्र तडवी कुटुंबाला दोन घरं मिळणार हे नक्की. एक घर लागणं -जिथं मुश्किल तिथं तीन घर लागणं आणि त्यातूनही दोन घरांचा ताबा मिळण्याची खात्री असणं ही खूप मोठी बाब आहे.हेही वाचा - 

म्हाडा लाॅटरी : अनिता तांबे पहिल्या भाग्यवान विजेत्या

EXCLUSIVE: कल्याण खोणी-शिरढोणमधील ५ हजार घरांसाठी जानेवारीत जाहिरात
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा