Advertisement

अनुप म्हणतो, मुंबईतच माझे जास्त चाहते


अनुप म्हणतो, मुंबईतच माझे जास्त चाहते
SHARES

भारतात कबड्डीच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या मॅचेसना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे पाहून तरी हेच दिसत असून मुंबईकर चाहत्यांचे सर्व लक्ष 'यू मुम्बा'च्या कामगिरीकडे लागले आहे. मागच्या चार सीझनपासून 'यू मुम्बा'ला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पाठिंब्याच्या जोरावरच 'यू मुम्बा'ने प्रत्येक सीझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यंदाही मुंबईकरांचा असाच पाठिंबा राहिल्यास अंतिम फेरीत नक्कीच धडक मारू, असा विश्वास 'यू मुम्बा'चा कर्णधार अनुप कुमार याने 'मुंबई लाइव्ह'कडे व्यक्त केला आहे. भलेही मी राष्ट्रीय पातळीवर हरियाणाचे प्रतिनिधित्व करत असलो, तरी हरियाणापेक्षा मुंबईतच माझे सगळ्यात जास्त चाहते असल्याची प्रतिक्रीया अनुपने दिली आहे.



'यू मुम्बा' सर्वोत्तम संघ

यावेळच्या आमच्या संघात ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचे उत्तम मिश्रण करण्यात आले आहे. आमच्या संघात ६ ते ७ सिनियर खेळाडू असून उर्वरीत ताज्या दमाचे ज्युनियर खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. आमच्या संघात शब्बीर बापू, काशीलींग, नितीन मदाणे असे अनुभवी खेळाडू, श्रीकांत जाधव सारखा ताज्या दमाचा खेळाडू सोबतच विदेशी खेळाडू संघात आहे. आमची रायडींग साईट मजबूत आहे. डिफेन्सही दमदार आहे. त्याचआधारे यंदाचा 'यू मुम्बा' संघ सर्वोत्तम असाच आहे.


देहरादूनला सराव केल्याचा फायदा

देहरादून सारख्या पहाडी आणि थंड हवेच्या ठिकाणी सराव केल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आमच्या फिटनेसचा स्तर उंचावण्यास मदत झाली. मुंबई सारख्या शहरात सामना खेळताना फिटनेसचा कस लागतो. देहरादूनच्या सरावामुळे आम्ही अधिक कणखर झालो आहोत.


फिटनेस खूप महत्त्वाचा

कोणत्याही क्रीडा प्रकारात टिकून राहायचे असेल तर फिट असणे महत्वाचे आहे. फिट असाल तर तुम्ही दुखापतींपासून लांब रहाल आणि जास्त वेळ खेळू शकाल. यंदाचा सीझन खूपच मोठा आहे. फिटनेस नसेल तर आम्ही कसेबसे ४ ते ५ सामने खेळू शकतो. त्यापेक्षा जास्त सामने खेळणे निव्वळ अशक्यच. कुठल्याही संघासाठी खेळाडूंना होणारी दुखापत सर्वात मोठा धोका असतो. संघातला सर्वोत्तम खेळाडू दुखापतीने संघाबाहेर गेल्यास संपूर्ण संघच स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. त्यामुळेच फिटनेसकडे आम्ही प्रत्येकाने लक्ष दिले आहे.


हरियाणाविरोधात खेळताना दडपण

मी मूळचा हरियाणाचा आहे. त्यामुळे या संघाविरोधात खेळताना थोडेफार दडपण जाणवतेच. पण मी यू मुम्बाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी काय डावपेच लढवायचे याचीही मला पुरेपुर जाणीव आहे. शेवटी हा खेळ आहे आणि मुंबईकरांनी मला आतापर्यंत भरभरून प्रेम दिले आहे, ते देखील मला चांगलेच ठाऊक आहे.


जवळच्या खेळाडूंची आठवण येणारच

प्रत्येक सीझनला काही खेळाडू बदलतात. त्यामुळे आपल्या सोबत खेळलेल्या जुन्या सहकाऱ्यांची आठवण येते. पण सहकारी कितीही जवळचा असला, तरी नव्या सीझनमध्ये तो प्रतिस्पर्धी असल्याने त्याच्यावर मात करण्यासाठीच आम्ही मैदानात उतरतो.


हे देखील वाचा -

यू-मुम्बाचं धडाकेबाज 'कमबॅक'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा