Advertisement

'तिनं' भल्याभल्यांनाही विचार करायला लावलंय!

तिच्या घराजवळच्या झोपडपट्टीकडे नेहमीच ती एकटक पाहायची. क्षीरजाला तिच्याच वयाची मुलं तिथे दिसायची. ते अशा परिस्थितीत का राहतात? त्यांचे कपडेही फाटलेले असतात. मिळेल ते खातात. नाही मिळालं तर रिकाम्या पोटीच झोपतात. छोट्या क्षीरजाला कोवळ्या वयात खरी परिस्थिती कळली होती. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याचा विचार तिनं केला आणि इथून क्षीरजाचा प्रवास सुरू झाला...

SHARES

क्षीरजा राजे...वय वर्ष 14... आई-बाबांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे लाडातच लहानाची मोठी झाली. पण कधी हट्टीपणा नाही किंवा उद्धटपणा नाही. पण या उलट तिचं सामाजिक भान पाहून तुम्हाला तिचा हेवाच वाटेल. 8 वर्षांची असताना क्षीरजानं घराजवळच्या झोपडपट्टीत रहाणाऱ्या मुलांना पाहिलं. 8 वर्षांची होती, पण तिला सर्व गोष्टी कळत होत्या. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींची जाणीव तिला होत होती. या वयात सर्व मुलांना पडतात तसे अनेक प्रश्न तिच्या मनातही घिरक्या घालत होते. त्यामुळे तिच्या विचारांची चक्की नेहमीच फिरत राहायची.

तिच्या घराजवळच्या झोपडपट्टीकडे नेहमीच ती एकटक पाहायची. क्षीरजाला तिच्याच वयाची मुलं तिथे दिसायची. ते अशा परिस्थितीत का राहतात? त्यांचे कपडेही फाटलेले असतात. मिळेल ते खातात. नाही मिळालं तर रिकाम्या पोटीच झोपतात. छोट्या क्षीरजाला कोवळ्या वयात खरी परिस्थिती कळली होती. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याचा विचार तिनं केला आणि इथून क्षीरजाचा प्रवास सुरू झाला.




एका कंदीलापासून सुरू झाला प्रवास...

शाळेत दिवाळीत दिलेल्या प्रोजेक्टसाठी क्षीरजानं एक छोटा आकाश कंदील बनवला होता. त्यावरून आकाश कंदील विकण्याची कल्पना तिला सुचली.


क्षीरजानं सुचलेली कल्पना बाबांना सांगितली आणि विचारलं, 'बाबा एक कंदील बनवायला आपल्याला किती खर्च आला असेल?' त्यावर तिचे बाबा म्हणाले, 'अंदाजे 4-5 रुपये.' यानंतर मात्र तिचं उत्तर ऐकून आमचं मन भरून आलं. ती म्हणाली, 'आपण हे कंदील बनवून विकले तर? म्हणजे कंदील 10 रुपयाला विकला तर 5 रुपयाचा फायदा होईल ना? मग ते पाच-पाच रुपये जमवून आपण गरजू किंवा अनाथाश्रमाला खाऊ किंवा खेळणी देऊ या.'

उज्वला राजे, क्षीरजाची आई


तेव्हापासून सुरू झालेला क्षीरजाचा प्रवास आजतागायत सुरू आहे. दरवर्षी 'आर्ट अँड क्राफ्ट'पासून ती विविध वस्तू बनवते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांनी गरजू मुलांची मदत करते.




थ्रीडी क्विलिंग 'क्वीन'!

क्षीरजाला शिकण्याची आवड होती. 'आर्ट अँड क्राफ्ट'च्या वस्तू बनवायला तिला फार आवडायचं. अशात एकदा ती एका प्रदर्शनाला गेली होती. तेव्हा तिची ओळख 'पेपर क्विलिंग आर्ट'शी झाली. प्रदर्शनातील एका स्टॉलवर पेपर क्विलिंगची फुलं लावलेली गिफ्ट पाकिटं तिनं पाहिली. स्टॉलवरच्या महिलांकडे तिनं क्विलिंग पेपरपासून बनवलेली फुल बनवायला शिकण्याची इच्छा व्यक्त केली. पण तू खूप लहान आहेस, तुझ्या आई-बाबांना शिकता येईल, असं त्या महिलांनी सांगितलं. त्यामुळे ती हिरमुसली. आणि तिनं आईकडे क्विलिंगचं 'लर्निंग किट' मागितलं. आईनं तिला आणूनही दिले. क्षीरजा क्विलिंगच्या पेपरपासून वस्तू बनवायला शिकली. काही दिवसांमध्येच क्षीरजाला वेगवेगळ्या रंगाची फुलं, फोटो फ्रेम, ग्रीटिंग कार्ड चांगले जमू लागले.



बाहुल्यांमध्ये रमलेली बाहुली

क्विलिंग पेपरपासून वेगवेगळ्या वस्तू बनवताना क्षीरजाच्या हातून अजाणतेपणी थ्रीडी बाहुली बनवली गेली. तिची आवड पाहून वडिलांनी तिला थ्रीडी क्विलिंग एक्सपर्ट जेन जेटकिंग यांचं पुस्तक आणून दिलं. या पुस्तकाच्या मदतीनं क्षीरजानं बाहुल्यांचं विश्वच निर्माण केलं! नटलेली नवरी, डिझनी प्रिन्सेस टेनिस प्लेअर्स, वारली चित्रकलेतल्या बाहुल्या, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दाखवणाऱ्या बाहुल्या, कोळीण, शेतकरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 227 बाहुल्या तिनं तयार केल्या आहेत. फक्त बाहुल्याच नाही, तर क्विलिंगच्या माध्यमातून विठ्ठलाची मूर्ती, निरनिराळी वाद्ये, पुणेरी पगडी अशा अनेक कलाकृती तिनं साकारल्या आहेत.



आत्तापर्यंत क्षीरजाचे तिच्या वस्तूंची नऊ ते दहा प्रदर्शनं आयोजित केली आहेत. 'आर्ट अँड क्राफ्ट'पासून बनवलेल्या वस्तूंनी क्षीरजानं अनेकांना मदतीचा हात दिला आहे. नुकतंच 12 आणि 13 ऑक्टोबरला क्षीरजानं प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या दोन दिवसीय प्रदर्शनाला मुंबईकरांचा चांगलाच प्रतिसाद  होता. या प्रदर्शनातून जमलेले पैसे ती मुलींच्या आश्रमशाळेला देणार आहे. आत्तापर्यंत प्रदर्शनातून मिळालेल्या पैशांमधून तिनं अनेकांना मदत केली आहे.

क्षीरजा आता 9 व्या इयत्तेत शिकते आहे. अभ्यास सांभाळत ती तिच्या कलागुणांना वाव देते. खरंतर भल्याभल्यांना हेवा वाटावा असं क्षीरजाचं कर्तृत्व आहे. हल्लीची लहान लहान मुलं मोबाईलच्या विश्वातच गुंतल्याची पालकांची नेहमीच तक्रार असते. पण क्षीरजा राजे मात्र याला अपवाद ठरली आहे, हे क्षीरजाची आई आज अभिमानानं सांगते!  



हेही वाचा

कॉमेडियन मल्लिका दुआही म्हणते #MeToo!

मुंबईतली खाऊगिरी...


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा