Advertisement

रूपारेलमध्ये रंगला अनोखा 'सायकल कट्टा'!


रूपारेलमध्ये रंगला अनोखा 'सायकल कट्टा'!
SHARES

'मेड इन इंडिया' आणि 'स्टार्टअप'चे वारे देशात वेगाने वाहत आहेत. त्यातच आता सायकलनिर्मिती क्षेत्रातील बड्या परदेशी कंपन्या अत्याधुनिक आणि वेगळ्या प्रकारच्या सायकली घेऊन भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. मग भारतातील सायकल कंपन्या तरी कशा मागे राहतील? त्यामुळे या भारतातील सायकल कंपन्याही नानाविध प्रयोग करत आहेत. नेमके हे प्रयोग काय आहेत?, निर्मितीमागचे विज्ञान, आर्थिक गणित, पर्यावरण संवर्धनाला त्याचा कशाप्रकारे हातभार लागणार? आणि नेहमीच्या वापरातील सायकलपेक्षा वेगळ्या सायकली बनवण्याच्या प्रयोगामागची कहाणी रविवारी 'सायकल कट्टा'वर उलगडण्यात आली. हा 'सायकल कट्टा' रविवार, 4 जून रोजी माटुंगा रोड येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
बांबूपासून तयार केलेली, अपंगांसाठीची, बॅटरीवर आणि सौरउर्जेवर चालणारी, टॅन्डम सायकल, दुमडणारी सायकल, भारतीय बनावटीचे सायकलचे भाग आणि संपूर्ण सायकलच्या निर्मितीमागची कथा पहिल्यांदाच त्यांच्या निर्मात्यांच्या तोंडून रविवारी रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात मुंबईकरांना ऐकायला मिळाली. विशेष म्हणजे सायकलीवरून गप्पा तर रंगल्याच, पण त्या सायकली प्रत्यक्ष पाहता देखील आल्या. यातील काही प्रयत्न हे प्रायोगिक तत्त्वावर तर, काही व्यावसायिक स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने केले गेले होते. त्यामुळे या सर्वांना 'सायकल कट्टा'च्या व्यासपीठावर एकत्रितपणे ऐकणे ही सायकलप्रेमींसाठी पर्वणीच ठरली.

हा सायकल कट्टा सर्वांसाठी मोफत होता. या निमित्ताने अनेकांनी सायकलीशी आपला आलेला संबंध आणि अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले. या सायकल कट्ट्याचे आयोजन पत्रकार अलका धुपकर आणि प्रशांत ननावरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे धुराने होणारे प्रदूषण तसेच पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती भविष्यासाठी किती आवश्यक आहे, यावर रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मुंबई आणि पुण्यातील 8 सायकलप्रेमींनी 2 वर्षांपूर्वी या सायकल कट्ट्याची स्थापना केली. सध्या या सायकल कट्ट्याच्या सदस्यांची संख्या 15 आहे. जनजागृतीसाठी हे सायकल प्रेमी 3 महिन्यातून एकदा वेगवेगळ्या ठिकाणी या सायकलकट्ट्याचे आयोजन करतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा