
मुंबईत तापमान सातत्याने वाढत असताना रुग्णालयांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि उष्णतेमुळे होणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मेंदूच्या कार्यावरही गंभीर परिणाम करत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी उन्हाळ्यात रोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मुंबईतील उष्माघाताचे प्रमुख कारण म्हणजे उच्च तापमानासोबतच जास्त आर्द्रता. आर्द्रतेमुळे घाम सहज वाफ होऊ शकत नाही, त्यामुळे शरीर थंड होण्याची प्रक्रिया मंदावते आणि उष्णता थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढतो.
मीरा रोड इथल्या वॉकहार्ड हॉस्पीटल इथल्या डॉक्टरांच्या मते, चक्कर येणे, गोंधळ, डोकेदुखी, थकवा आणि बेशुद्ध पडणे यांसारख्या लक्षणांसह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही लक्षणे उष्णता थकव्याशी संबंधित असून, वेळीच उपचार न केल्यास ती जीवघेण्या उष्माघातात रूपांतरित होऊ शकतात.
डॉ. पवन पाई, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ, म्हणाले, “अत्यंत उष्णतेमुळे ब्रेनच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलनामुळे मेंदूचे सामान्य कार्य बिघडते, ज्यामुळे एकाग्रतेत घट, मूडमध्ये बदल आणि गंभीर प्रकरणांमध्ये स्ट्रोकसारखी लक्षणे दिसू शकतात.”
ते पुढे म्हणाले, “मेंदू तापमानातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. शरीराचे तापमान वाढल्यास मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो आणि न्यूरल अॅक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे वेळेवर पाणी पिणे आणि शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.”
डॉक्टरांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून न्यूरोलॉजिकल किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो. तसेच, बांधकाम कामगार, वाहतूक पोलिस आणि उन्हात दीर्घकाळ काम करणारे डिलिव्हरी कर्मचारी हेही अधिक धोक्यात आहेत.
डॉ. पवन पई यांनी सांगितले, “अगदी सौम्य डिहायड्रेशनमुळेही स्मरणशक्ती, सतर्कता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. गंभीर परिस्थितीत उष्माघातामुळे मेंदूला सूज, झटके किंवा कायमस्वरूपी न्यूरोलॉजिकल नुकसान होऊ शकते.”
त्यांनी प्रतिबंधासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत. पुरेसे पाणी पिणे, इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये घेणे, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळणे आणि पुरेशी विश्रांती घेणे.
मुंबईत तापमान वाढत असताना, शरीरासोबतच मेंदूचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले असून, जागरूकता आणि वेळेवर उपाययोजना हाच सुरक्षित राहण्याचा मुख्य मार्ग आहे.
हेही वाचा
