Advertisement

हो...मी लग्नाआधीच आई झाले!


हो...मी लग्नाआधीच आई झाले!
SHARES

प्रेग्नन्सीचा रिपोर्ट हातात आला आणि शोभा(बदलेलं नाव)च्या पायाखालची जमीनच सरकली. कारण प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. दुसरा महिना उलटून गेला होता. तिला कळेचना की नक्की कसं रिअॅक्ट व्हावं. आई झाल्याचा तिला आनंद होता. पण तिच्या मनात भीतीही होती की, लग्नाशिवाय बाळाला कसा जन्म द्यायचा? एकीकडे तिच्या गर्भात वाढत असलेलं बाळ आणि दुसरीकडे समाज आणि तिचं कुटुंब. त्यामुळे शोभा द्विधा मनस्थितीत अडकली होती. प्रकाश(बदलेलं नाव)नंही हे बाळ नको असल्याचं सांगून आपले हात झटकले. आता तिच्याजवळ अबॉर्शन करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पण तिचं मन यासाठी तयार नव्हतं. यात त्या बाळाची काय चुकी? त्या छोट्याशा जिवाला का शिक्षा? तिच्या डोक्यात सतत हेच विचार फिरत होते.

अखेर मोठ्या हिमतीनं तिनं अबॉर्शन न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. खरंतर समाज फार लांबची गोष्ट झाली. पण स्वत:च्या कुटुंबाविरोधात जाऊन शोभानं घेतलेला हा निर्णय आव्हानात्मक होता. प्रवाहाविरुद्ध जाणारा होता. आई आणि मूल हे जगातील सर्वात पवित्र नातं. पण आईच्या पुढे जर 'कुमारी' आई लावलं तर त्याचा सर्व संदर्भच बदलतो. लग्न न करता किंवा लग्नाआधी स्वीकारलेलं मातृत्व अपवित्र मानलं जातं. पण या सर्वांना फाटा देत शोभानं मातृत्व स्विकारलं.

आज समाजात अशा कितीतरी शोभा आहेत. शोभानं मन घट्ट करुन जो निर्णय घेतला, तसाच काहीसा निर्णय मुंबईत राहणाऱ्या फॅशन डिझायनर्स निरुशा निखत यांनी घेतला. लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा ठरला आणि यानंतरच सुरू झाला एका आईचा संघर्षमयी प्रवास...

"१२ वर्षांपूर्वी मी अलाहाबादवरून मुंबईत आले. इतर मुलींसारखीच माझीही स्वप्न होती. काही तरी करून दाखवायची जिद्द होती. याच जिद्दीच्या बळावर मी मायानगरीत आपली एक ओळख निर्माण केली. २००५ मध्ये मी लिवइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्या दरम्यान मी प्रेग्नंट झाली. त्याच काळात माझ्यासमोर आणखी एक सत्य आलं. ते म्हणजे, ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम केलं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्याला मुलंही होती. ही गोष्ट मला उशीरा कळली. माझा पार्टनर माझी साथ द्यायला तयार होता. आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देण्यासाठीही तो तयार होता. पण मला दुसऱ्याचा संसार मोडून स्वत:चा संसार उभारायचा नव्हता. मला मनात गिल्ट ठेवून जगायचं नव्हतं की माझ्यामुळे एक कुटुंब तुटलं. म्हणून मी ते रिलेशन तिथेच संपवलं. पण प्रश्न होता तो माझ्या पोटात वाढणाऱ्या एका जिवाचा. त्याचं काय? हा प्रश्न सारखा सतावत होता. मुळात गर्भपात करणं हे मला मान्य नव्हतं. त्यामुळे बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला माझं कुटुंब माझ्यासोबत नव्हतं. पण माझ्या आईनं सर्वांची मनधरणी केली. मला आठवतंय प्रेग्नन्सीच्या वेळी मी एकटी होते. माझी आई मुंबईत येत होती. पण मुंबईत २६ जुलै २००५ ला पावसामुळे पूर आला होता. त्यामुळे माझी आई वेळेत पोहोचू नाही शकली. त्यामुळे मी एकटीच रुग्णालयात गेले आणि बाळालाही एकटीच घरी घेऊन आले.”

-निरुशा निखत, फॅशन डिझायनर

निरुशा निखत यांनी फक्त त्यांची कहाणीच नाही तर त्यांना करावा लागणारा संघर्ष, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि बदलणारा समाज यावरही प्रकाश टाकला.

"स्वत: घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा"

पहिली गोष्ट म्हणजे स्वत:च्या निर्णयावर नेहमी विश्वास ठेवा. तुमचा निर्णय योग्य असेल किंवा अयोग्य असेल, पण तुम्ही एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम रहा. तुमच्या निर्णयाला सन्मान द्या. जर तुम्ही सन्मान द्याल तर बाकीचे तुम्हाला सन्मान देतील. इतक्या वर्षांनंतरही मला माझ्या निर्यणावर अभिमान असं सांगताना निरुशा निखत यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.

"मुलाच्या अॅडमिशनसाठी संघर्ष"

माझ्या मुलाला शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शाळेत दाखला घेण्यासाठी फॉर्म भरून द्यायचा होता. पण वडिलांच्या नावाचा कॉलम मी ब्लँक ठेवला. त्यामुळे मुलाला दाखला मिळू शकला नाही. याविरोधात मी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टानं माझ्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मुलाला शाळेत दाखला मिळला.

फक्त शाळेतच नाही तर मला मुलाच्या पासपोर्टच्या वेळीही अनेक समस्या आल्या. पासपोर्टसाठी मी माझ्या मुलाला सोबत घेऊन गेले होते. त्यावेळी तिकडची एक महिला बोलून गेली की, चुका तुम्ही करता आणि भोगावं लागतं मुलांना. याचा माझ्या मुलावर इतका परिणाम झाली की, त्यानं मला याबद्दल विचारलं. या महिलेविरोधात मी सोशल मीडियावर आवाज उठवला आणि त्यानंतर पासपोर्ट डिपार्टमेंटमधल्या त्या महिलेनं माझी रीतसर माफी मागितली.

"फादर इज नॉट अ टायटल"

मुळात अनवेड मदर्स ही संकल्पना आपल्या इथं नाही. वडिलांच्या नावाचा कॉलम इथे रिकामा नाही ठेऊ शकत. इथे जीवन जगायचे तीनच मार्ग आहेत. सिंगल आहात तर मग तुम्ही आई कसे होऊ शकता? लग्न झालं असेल तरी वडिलांच्या नावाला प्राधान्य आणि सेपेरेटेड असाल तरीही वडिलांचं नाव लागतं. फादर इज नॉट अ टायटल, नॉर मदर इज अ टायटल. आई आणि वडील हे बाळासाठी टायटल नाहीत तर बाळ हे दोघांची जबाबदारी आहे. जर एक पुरुष आपल्या बाळाची जबाबदारी घेत नसेल तर त्याला त्याचं नाव का द्यावं?

"समाज बदलतोय"

भारतात अनवेड मदर्ससाठी कुठलंच धोरण नाही. एक वेळ अशी होती की कोणत्या महिलेसोबत असं काही घडलं तर तिच्यापुढे एकच पर्याय असायचा आणि तो म्हणजे बाळ अबॉर्ट करण्याचा. पण हळूहळू लोकांचे विचार बदलत आहेत. २४ वर्षांपूर्वी नीना गुप्ता यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी हा निर्णय तेव्हा घेतला होता जेव्हा असं काही करण्याचा विचारही केला जात नव्हता. पण २४ वर्षात हळूहळू समाज बदलतोय आणि पुढेही बदलेल. समाज कोण आहे? आपणच समाज आहोत. सरोगेट मदर्स आणि आयवीएफ या मेडिकल टेक्निकद्वारे आता प्रेग्नेंट होता येतं. कितीतरी कुटुंबांना या टेक्निकमुळे आई-वडील होण्याचं सुख मिळालं आहे. काय चुकीचं आहे त्यात? यात काहीच वाईट नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परिस्थितीनुसार निर्णय घेते.

"खूप खडतर होता मार्ग"

मी माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगले आहे. माझी साथ द्यायला कुटुंब आणि समाज दोन्ही आहेत. पण हे सर्व पुन्हा कमवायला मी माझं अर्ध आयुष्य घालवलं. यात कधी यश आलं तर कधी अपयश. पण कधी हार नाही मानली. नेहमी लढा दिला आणि आजही देतेय.

निरुशासारख्या अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवते. कुटुंबाच्या दबावाखाली किंवा समाजाच्या भितीपोटी त्या गर्भपात करण्याचा निर्णय घेतात. पण काही महिला स्वत:च्या बाळाची जबाबदारी उचलतात. मुंबईतल्या कामा हॉस्पिटलमध्ये अशा महिलांसाठी एक खास वॉर्ड आहे. तिथे ९ महिने महिलांचा सांभाळ केला जातो.

कामा हॉस्पिटलमध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे अनवेड मदर्सचा सांभाळ करतो. काही मुली रेप व्हिक्टिम असतात. काही मुलींची फसवणूक झालेली असते. अशा अनेक मुली येतात. काहीवेळा कुटुंबसुद्धा साथ सोडतं. त्यानंतर मुली आमच्या इथे भरती होतात. प्रसुतीपर्यंत ९ महिने आम्ही त्यांची काळजी घेतो. प्रसुती झाल्यानंतर केवळ १० टक्के मुली आपल्या बाळाची जबाबदारी उचलतात आणि स्वत:च्या हिंमतीवर त्यांचा सांभाळ करतात. यात कसं असतं, एखाद्या पुरुषानं लग्नाआधी मूल दत्तक घेतलं किंवा सरोगसीद्वारे आपल्या मुलाला जन्म दिला तर त्याचं कौतुक केलं जातं. त्याचं लग्न झालेलं असो किंवा नसो, त्या पुरुषावर कुणी बोट उचलत नाही. पण कुमारी माता असेल तर समाज तिची जबाबदारी झटकून टाकतो. त्यामुळे कुठे ना कुठे समाजानं आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे.
- डॉ. राजश्री काटके, स्त्री रोग तज्ज्ञ

अशा कितीतरी निरुशा आजही समाजात आहेत. अशा कितीतरी कामा हॉस्पिटलच्या महिला वॉर्डची कदाचित आजही गरज आहे. पण अशा कितीतरी महिला आजही समाजाच्या वाहत्या प्रवाहाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. पूर्ण ताकदीनिशी. पण महिलांवरच प्रेग्नन्सीची जबाबदारी टाकून नामानिराळा होणारा पुरुषी समाज कधी जबाबदार होणार? आणि स्वत:च्या हिंमतीवर नियती आणि परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण कधी बदलणार? या प्रश्नांची उत्तरंसुद्धा याच समाजात आहेत. फक्त त्यांचा शोध घेण्याची तयारी हवी आहे. बोला, आहे तयारी?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा