Advertisement

भाऊसाहेब शिंदेला कोणाचं 'याड' लागलं?

महाराष्ट्राच्या लाल मातीतून थेट चंदेरी दुनियेतील लाल कार्पेटवर एंट्री घेणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे सध्या काय करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

भाऊसाहेब शिंदेला कोणाचं 'याड' लागलं?
SHARES

महाराष्ट्राच्या लाल मातीतून थेट चंदेरी दुनियेतील लाल कार्पेटवर एंट्री घेणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे सध्या काय करतोय, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'ख्वाडा' सिनेमाला स्वत:कडील पैसे खर्च करून हातभार लावणारा भाऊसाहेब 'बबन' या कमर्शियल म्युझिकल सिनेमामध्ये पुन्हा एकदा भाव खाऊन गेला. त्यामुळं या दोन सिनेमांनंतर भाऊसाहेब पुन्हा कोणत्या नव्या रूपात दर्शन देणार याची उत्सुकता सिनेप्रेमींना होतीच. भाऊसाहेबनं थेट नव्या सिनेमाचा मुहूर्त करतच सर्वांना या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

रुपेश दिनकर पगारे, संजय बाबुराव पगारे आणि अरविंद अर्जुन कदम यांची निर्मिती असलेल्या शकुंतला क्रिएशन्सच्या 'लागलं याड तुझं' या सिनेमात भाऊसाहेब मुख्य भूमिका साकारणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे अतिशय साध्या पद्धतीनं 'लागलं याड तुझं'चा मुहूर्त करण्यात आला. जिजाऊ क्रिएशन्सच्या रुपाली दीपक पवार आणि वैशाली नितीन पवार यांची निर्मिती व्यवस्था असलेल्या या सिनेमातील बऱ्याच गोष्टी सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या असल्या तरी आकाश अर्जुन कदम हा नवा चेहरा या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यात असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. 'लागलं याड तुझं' च्या निमित्तानं शकुंतला क्रिएशन्सनं मराठी सिनेनिर्मितीतील पहिलं पाऊल टाकलं असून, या प्रेमकथेच्या रूपात नावीन्यपूर्ण, रोमांचक आणि संगीतप्रधान सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

हेही वाचा- कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा, ८ जानेवारीपर्यंत अटक टळली

आजवर मराठी सिनेमात कधीही न दाखवण्यात आलेले प्रेमकथेतील दुर्लक्षित पैलू हा सिनेमा सिनेरसिकांसमोर उलगडणार असून, दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सज्ज असलेला 'लागलं याड तुझं' सर्वांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होईल, असा विश्वास भाऊसाहेबनं व्यक्त केला आहे. मेहनत घेतल्यानं नशीब नक्कीच बदलू शकतं हा विचार भाऊसाहेबनं सर्वार्थानं सार्थ ठरवला आहे. गाठीशी तुटपुंजे पैसे, पण मनात प्रबळ इच्छाशक्ती घेऊन महाराष्ट्रातील एका खेडेगावातून शहरात आलेल्या भाऊसाहेबनं मित्र-मंडळींच्या साथीनं चंदेरी दुनियेत पहिलं पाऊल टाकलं. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमामुळं अल्पावधीत प्रकाशझोतात आल्यानंतर भाऊसाहेबचा खरा स्ट्रगल सुरू झाला.

'बबन'च्या लोकप्रियतेनंतर आता 'लागलं याड तुझं' हा सिनेमा खऱ्या अर्थानं भाऊसाहेबसाठी पुढचा मार्ग मोकळा करून देणारा ठरणार आहे. शीर्षकावरून सिनेमाच्या कथानकाची थोडीफार कल्पना येत असली तरी, सिनेमात काहीसं रोमांचक कथानक पहायला मिळणार आहे. या सिनेमाची संकल्पना संतोष दाभोळकर यांची आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार? यात भाऊसाहेबची नायिका कोण असणार? शूट कधी सुरू होणार? यांसारख्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं टप्प्याटप्प्यानं दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- अभिनेता आशिष रॉय यांचं मुंबईत निधन, उपचारासाठीही नव्हते पैसे

संबंधित विषय
Advertisement