Advertisement

मंजिरीसोबत जमली पुष्करची जोडी!

'अदृश्य' या आगामी मराठी सिनेमात अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस ही जोडी प्रथमच एकत्र झळकणार आहे.

मंजिरीसोबत जमली पुष्करची जोडी!
SHARES

रुपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात, ज्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वीही ठरतात. आपल्या सिनेमातही अशीच एखादी अनोखी जोडी असावी असं प्रत्येक लेखक-दिग्दर्शकाला वाटत असतं आणि त्यातूनच नव्या कोऱ्या जोड्यांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळते. मराठी सिनेमेही याला अपवाद नाहीत. कृष्णधवल सिनेमांच्या काळापासून नायक-नायकांच्या नवनवीन जोड्यांनी रसिकांना भुरळ घातल्याचं आपण पहात आलो आहोत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मंजिरी फडणीस आणि पुष्कर जोग ही आणखी एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'अदृश्य' या आगामी मराठी सिनेमात अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस ही जोडी प्रथमच एकत्र झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग देहरादून इथं सुरू झालं आहे. बॉलिवूडमधील प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. कबीर लाल यांनी आजवर 'वेलकम बॅक', 'परदेस', 'ताल', 'हम आपके दिल में रहते है' या व अशा बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. निर्माते अजय सिंग यांनी लवली वर्ल्ड प्रॉडक्शन्स या बॅनर अंतर्गत 'अदृश्य'ची निर्मिती केली असून, आजवर कधीही रुपेरी पडद्यावर न सादर झालेलं कथानक मराठी रसिकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा- ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मात्र...

आजच्या सोशल मीडीयाच्या काळात पुष्करनं आपल्या सोशल हँडलवरुन या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळं प्रेक्षकांनाही या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही. या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच ती घोषित करण्यात येणार असल्याचं प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं सांगण्यात येत आहे. पुष्कर-मंजिरी या नव्या कोऱ्या जोडीसोबत मराठीतील नवे-जुने कलाकार या सिनेमात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. याखेरीज मराठी-हिंदीतील तज्ज्ञ तंत्रज्ञांची टीम या सिनेमाच्या सादरीकरणात मोलाची कामगिरी बजावणार असल्याचंही समजतं.

'रोक सको तो रोक लो' या हिंदी सिनेमाद्वारे बॅालिवूडमध्ये आपली कारकिर्द सुरू करणारी मंजिरी २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या इम्रान खानच्या 'जाने तू या जाने ना' या सिनेमाद्वारे खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. त्यानंतर हिंदीसह तेलुगू, तमीळ, मल्याळम भाषांमध्ये आपली वाटचाल सुरू ठेवणारी मंजिरी २०१६ मध्ये 'सर्व मंगल सावधान' या सिनेमाद्वारे मराठीकडे वळली. आता 'अदृश्य'मध्ये ती रुपेरी पडद्यावर बालकलाकारापासून नायकापर्यंतचा यशस्वी प्रवास करणाऱ्या पुष्करसोबत दिसणार आहे. त्यामुळं पुष्करसोबत ती कशा प्रकारे धमाल करते ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

(actor pushkar jog and manjari fadnis pairing in marathi movie adrushya)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा