प्रीतमचा डबल धमाका

‘अहिल्या’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रीतम कागणेला दादासाहेब फाळके आश्वासक अभिनेत्री पुरस्कार आणि संस्कृती कलादर्पणचा लक्षवेधी अभिनेत्री असे दोन पुरस्कार एकाच दिवशी प्रदान करण्यात आले आहेत.

SHARE

आपण केलेल्या कामाची पावती एखाद्या पुरस्काराच्या स्वरूपात मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण जर एखाद्याला एकाच दिवशी दोन पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं, तर त्याचा आनंदाला पारावारच उरणार नाही. अभिनेत्री प्रीतम कागणेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे.


 दुर्मिळ योगायोगच 

प्रीतमनं एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये बाजी मारत दोन पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रीतमसाठी हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या बहुचर्चित ‘हलाल’ या चित्रपटासोबतच प्रीतमनं यापूर्वी ‘३१ ऑक्टोबर’, ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आता ‘अहिल्या’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रीतमला दादासाहेब फाळके आश्वासक अभिनेत्री पुरस्कार आणि संस्कृती कलादर्पणचा लक्षवेधी अभिनेत्री असे दोन पुरस्कार एकाच दिवशी प्रदान करण्यात आले आहेत.


मेहनतीचं चीज

हा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखा नसल्याचं सांगत प्रीतम म्हणाली की, एकाच दिवशी दोन पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी खरंच अविश्वसनीय आणि अत्यंत आनंददायी बाब आहे. असा योग वारंवार जुळून येत नाही. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचं चीज या पुरस्कारांनी केलं आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकही त्यांच्या प्रतिसादातून खरा पुरस्कार देतील अशी खात्री प्रीतमला वाटते.


डॅशिंग महिला आयपीएस 

‘अहिल्या’ या चित्रपटात प्रीतमनं एक डॅशिंग महिला आयपीएस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. यात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर आदी कलाकार आहेत. प्रचंड मेहनतीनं आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची कथा ‘अहिल्या’ या चित्रपटात पहायला मिळेल.हेही वाचा -

सयाजीसोबत नवोदित पूजाचा 'तांडव'

मराठीसाठी पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली !
संबंधित विषय
ताज्या बातम्या