Advertisement

बाप्पा गेले, आता मराठी सिनेमांची दिवाळी

दरवर्षी असंच होतं... गणपती बाप्पा आले की, सिनेमागृहांमधून मराठी सिनेमे गायब होतात. पुढल्या वर्षी ११ दिवस लवकर येण्याचं आश्वासन देऊन गणपती बाप्पा आपल्या गावी गेल्यानं मराठी सिनेमांचा तिकिटबारीवरील मार्ग मोकळा झाला आहे.

बाप्पा गेले, आता मराठी सिनेमांची दिवाळी
SHARES

दरवर्षी असंच होतं... गणपती बाप्पा आले की, सिनेमागृहांमधून मराठी सिनेमे गायब होतात. पुढल्या वर्षी ११ दिवस लवकर येण्याचं आश्वासन देऊन गणपती बाप्पा आपल्या गावी गेल्यानं मराठी सिनेमांचा तिकिटबारीवरील मार्ग मोकळा झाला आहे.

तिकिटबारीवर दुष्काळ 

महाराष्ट्रात जरी पावसाची संततधार कायम असली तरी मागील दोन आठवड्यांपासून मराठी सिनेमांच्या तिकिटबारीवर अक्षरश: दुष्काळ पडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. गणेशोत्सवाच्या काळात मराठी सिनेमे प्रदर्शित केले जात नाही याला यंदाचं वर्षही अपवाद ठरलेलं नाही. याही वर्षी गणेशोत्सवापूर्वीच्या शुक्रवारी आणि गणेशोत्सवादरम्यान एकही मराठी सिनेमा प्रदर्शित झाला नाही. त्यामुळं भविष्यात येणाऱ्या काही शुक्रवारी मराठी सिनेमांची जत्रा भरल्याचं चित्र पहायला मिळालं तर नवल वाटणार नाही.

हे चित्रपट प्रदर्शित

आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'वन्स मोअर' आणि 'बाबा', दुसऱ्या आठवडयात 'ये रे ये रे पैसा २' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. तिसऱ्या आठवड्यात म्हणजे १५ आॅगस्टला 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस'चं आव्हान असल्यानं कोणताही मराठी सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. चौथ्या आठवड्यात 'लाल बत्ती' आणि 'पळशीची पीटी' हे दोन सिनेमे रिलीज झाले. त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होण्यापूर्वी आॅगस्टच्या पाचव्या शुक्रवारी म्हणजेच ३० आॅगस्टलाही मराठी सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. ६ सप्टेंबरला तर गणेशोत्सव असल्यानं सिनेमा प्रदर्शित करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कालच्या शुक्रवारी मात्र भाऊ कदम अभिनीत 'व्हीआयपी गाढव' फार बोभाटा न करता प्रदर्शित झाला आहे.

खिचीक

हे चित्र पहाता गणेशोत्सवापूर्वी आणि नंतरच्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित न झाल्याचा ताण काही आगामी शुक्रवारी येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट' आणि प्रीतम एस.के. पाटील लिखीत-दिग्दर्शित 'खिचीक' हे दोन सिनेमे २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते, परंतु 'खारी बिस्किट'ची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानं पुढल्या शुक्रवारी फक्त 'खिचीक' प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एका वेगळ्याच गेटअपमध्ये झळकतील. २७ सप्टेंबरला 'गालिब' असं शीर्षक असलेल्या मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची योजना असली, तरी अद्याप कुठेच काही गाजावाजा नाही.

थिएटर न मिळण्याचा मुद्दा

आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने मराठी सिनेसृष्टीसाठी जणू दिवाळीच ठरणार आहेत. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'रॅाम कॅाम', 'मी तुझीच रे', दुसऱ्या आठवड्यात 'आप्पा आणि बाप्पा', 'मन उधाण वारा', 'सातरचा सलमान', 'दंडम', तिसऱ्या आठवड्यात 'आता बस्स', चौथ्या आठवड्यात 'ट्रीपल सीट' आणि 'हिरकणी' हे सिनेमे प्रदर्शित होतील. नोव्हेंबरमध्ये 'खारी बिस्कीट', 'पांघरूण', 'विकून टाक', 'फत्तेशिकस्त', 'गर्ल्स', 'आक्रंदण', 'आटपाडी नाईट्स', 'बस्ता' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. डिसेंबरमधील सिनेमांचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे. यात 'मी मराठा', 'अरुणा', 'तुझा दुरावा' आणि 'केसरी' हे सिनेमे डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं तूर्तास तरी घोषित करण्यात आलं आहे. या यादीमध्ये अचानक प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचा उल्लेख नसला तरी ते नेहमीप्रमाणं घोळ घालणार आणि पुन्हा एकदा मराठी सिनेमांना थिएटर न मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर येणार हे ठरलेलं आहे.



हेही वाचा -

Movie Review: एकटेपणा दूर करणारी 'ड्रीम गर्ल'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा