'मोगरा'साठी आनंद बनला बँक मॅनेजर

पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'मोगरा फुलला' या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत.

SHARE

मोगऱ्याचा सुगंध कुठेही लपून रहात नाही. मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतही मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. याच मोगऱ्यासाठी अभिनेता आनंद इंगळे बँक मॅनेजर बनला आहे.


स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत

पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'मोगरा फुलला' या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. आजवर मराठी चित्रपटांसोबतच नाटक आणि टेलिव्हीजन जगतातही नाव कमावलेला आनंद इंगळे 'मोगरा फुलला'मध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बँक मॅनेजरची भूमिका साकारणारा आनंद चित्रपटात स्वप्नीलचा हितचिंतकही आहे. आजवर कधी विनोदी, तर कधी धीरगंभीर भूमिकाही यशस्वीपणं साकारणारा आनंद या व्यक्तिरेखेत काय धमाल करतो ते पाहायचं आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


पोस्टर प्रकाशित

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच 'मोगरा फुलला'! असं या चित्रपटाचं वर्णन केलं जात आहे. या भावनिक चित्रपटाचा नायक सुनील कुलकर्णी म्हणजेच स्वप्नील जोशी एक सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे. सुनीलचा ज्या बँकेशी करार आहे, त्या बँकेच्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत आनंद आहे. 'बँकेतली खाती आणि आपुलकीची नाती, दोन्ही जपावी लागतात', या टॅगलाईनसह या दोघांचं एक पोस्टर नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यावरून या दोघांमधील व्यावसायिक तरीही आपुलकीचं नातं अधोरेखित होतं.


भूमिका काहीशी वेगळी 

या भूमिकेविषयी आनंद म्हणाला की, या चित्रपटातील बँक मॅनेजरची भूमिका काहीशी वेगळी आहे. स्वप्नीलबरोबरचं हे नातं म्हटलं तर व्यावसायिक आहे आणि म्हटलं तर मैत्रीचं आहे. चित्रपटाची कथा वेगळी आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही तावून सुलाखून निघालेली आहे. त्यामुळं या चित्रपटातील बँक मॅनेजरची भूमिका साकारताना एक वेगळा अनुभव मिळाला. प्रतिभावान अशा श्रावणीताई देवधर यांच्याबरोबर काम करताना बरंच काही शिकता आलं. स्वप्नीलसोबत काम करताना धमाल आली.


१४ जूनला प्रदर्शित

या चित्रपटामध्ये स्वप्नील आणि आनंद यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, संदिप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा -

'टकाटक' जोडीचा गंमतीशीर ट्रेलर

मुक्ता बर्वेचं 'ब्रेव्ह' रिटर्न गिफ्ट
संबंधित विषय
ताज्या बातम्या