Advertisement

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव

निर्मितीकडून अभिनयाकडं वळत प्रथमच महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अमोल कागणेचं नावच 'बाबो' या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव
SHARES

चित्रपटसृष्टीत वाद-विवाद होतच असतात, पण एखाद्या कलाकारानं काम करूनही जेव्हा त्याच्या नावाचा उल्लेख केला जात नाही, तेव्हा मराठीतच मराठमोळ्या कलाकारांना सावत्र वागणूक दिल्याची जाणीव होते. निर्मितीकडून अभिनयाकडं वळत प्रथमच महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अमोल कागणेचं नावच 'बाबो' या आगामी मराठी चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.


अमोल कागणेला डावललं

मागील बऱ्याच वर्षांपासून असे प्रकार सर्रासपणं घडत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीही यात मागं नाही. ३१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'बाबो' या चित्रपटात अमोल कागणेला डावलण्यात येत असल्याचं 'मुंबई लाइव्ह'च्या निदर्शनास आलं. ट्रेलर लाँच सोहळ्याची जी माहिती मीडियाला पाठवण्यात आली, त्यात अमोलच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळं याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा नुकत्याच पुण्यात झालेल्या ट्रेलर लाँच सोहळ्यालाही अमोलला आमंत्रित करण्यात नव्हतं असं समजलं, किंबहुना त्याला ट्रेलर लाँचसाठी बोलावलं जाऊ नये, असा आदेशच जणू दिग्दर्शक रमेश चौधरीनं पीआर टिमला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.


दिग्दर्शकाकडून टाळाटाळ

याची पडताळणी करण्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक रमेश चौधरीशी संवाद साधण्यात आला. रमेश म्हणाला की, ‘बाबो’ या चित्रपटात सयाजी शिंदे, किशोर कदम यांच्यासारखे बरेच नामवंत कलाकार आहेत. यात अमोल कागणेनंही एक व्यक्तिरेखा साकारली आहे. यात कोणीही मुख्य भूमिकेत नाही. पुण्यात अचानक ‘बाबो’चा ट्रेलर लाँच आयोजित करण्यात आला होता. सयाजी शिंदे त्या दिवशी पुण्यात असल्यानं तो कार्यक्रम उरकून घेतल्याचं रमेशनं पुन्हा पुन: सांगितलं, पण अमोलचं नाव वगळण्याबाबत तसंच ट्रेलर लाँचला न बोलावण्याच्या आदेशाविषयी बोलण्याचं रमेशनं हेतुपुस्सर टाळलं. यावरून कुठं तरी पाणी मुरतंय असं म्हणायला हरकत नाही.

                                                          रमेश चौधरी (दिग्दर्शक)

दीड महिन्यापासून डावललं

नेमकं असं काय घडलं ज्यामुळं ‘बाबो’ चित्रपटात अमोलला सावत्र वागणूक देण्यात आली याचं उत्तर शोधण्यासाठी अमोलशीही संपर्क साधण्यात आला. अमोल म्हणाला की, मी आजवर निर्माता म्हणून 'हलाल', 'लेथ जोशी' आणि 'परफ्युम' या महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय सहा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘बाबो’मध्ये मी लीड रोल केला आहे. यात माझ्यावर दोन गाणीही शूट करण्यात आली आहेत, पण मला क्रेडीट देण्यात येत नसल्याचं ‘मुंबई लाइव्ह’च्या निदर्शनास आलेली गोष्ट खरी आहे. चित्रपट पूर्ण होईपर्यंत सारं काही ठीक होतं, पण मागील दीड महिन्यापासून मला डावलण्यात येत आहे.


सीन्स कट केले 

या चित्रपटातील माझे बरेच सीन्स कट केले आहेत. प्रतिक्षा मुणगेकर आणि माझ्यावर शूट करण्यात आलेला झाडावरील रोमँटिक सीनही कट केला आहे. ‘लग्नाचं नाचकाम…’ या गाण्यातीलही माझा बराचसा भाग कमी केला आहे. ‘मॅड रे…’ हे गाणं पूर्ण आहे. चित्रपटाची फर्स्ट काॅपी आणि फायनल काॅपीमध्ये खूप बदल केले आहेत. २० दिवसांच्या शूटिंग शेड्युलमध्ये मी जवळजवळ १८ दिवस काम केलं आहे. माझ्यावर ४० पेक्षा जास्त सीन्स शूट करण्यात आले आहेत. त्यातून जरी १० सीन्स कट केले असतील, तरी ३० शिल्लक ठेवावेच लागतील नाहीतर कथेवर त्याचा विपरीत परिणाम होईल. दिग्दर्शकांचाही या चित्रपटात माझ्या बरोबरीनं रोल असल्यानं कदाचित स्वत:ला प्रमोट करण्यासाठी त्यांनी असं केलं असावं. ते कशामुळं असं करत आहेत याचं नेमकं कारण मलाही ठाऊक नाही.


दिग्दर्शकांची बोबडी वळली

‘मुंबई लाइव्ह’नं संपर्क साधल्यावर दिग्दर्शकांची अक्षरश: बोबडीच वळली. अमोलला सावत्र वागणूक दिल्याबाबत त्यांच्याकडं काहीही ठोस उत्तर नव्हतं. त्यामुळं आता मुंबईमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेला अमोलला बोलावलं जाईल, असं आश्वासन देत दिग्दर्शक राजेशनं या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. अमोल मात्र आजवर अन्याय सहन करूनही गप्प बसला. मुख्य भूमिकेतील पहिलाच चित्रपट असल्यानं कंट्रोव्हर्सी नको या विचारानं नाव गायब होऊनही त्यानं मौनच बाळगणं पसंत केलं. या प्रकरणावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी ‘बाबो’च्या पीआर टीमशीही संपर्क साधण्यात आला, पण संपर्क होऊ शकला नाही.

असे प्रकार केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर सगळीकडं सर्रासपणं घडत असतात, पण त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळंच असं करणाऱ्यांना बळ येतं. अन्याय सहन करून गप्प बसण्यापेक्षा त्या विरोधात आवाज उठवला गेला तरच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसू शकतो.



हेही वाचा -

'बाबो'चा ट्रेलर अन् 'याना'चा गोंधळ

'मोगरा'साठी आनंद बनला बँक मॅनेजर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा