Advertisement

संजय जाधवच्या सिनेमात कतरीना कैफ!

सिनेमांचं अर्धशतक आणि 'खारी बिस्कीट'चं औचित्य साधत संजयनं 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली. यावेळी बोलताना आपल्या सिनेमात कतरीना कैफ दिसणार असल्याच्या रहस्याचा खुलासाही संजयनं केला.

संजय जाधवच्या सिनेमात कतरीना कैफ!
SHARES

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर 'चेकमेट', 'रिंगा रिंगा', 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे', 'लकी' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या संजय जाधवनं सिनेमांचं अर्धशतक ठोकलं आहे. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शकाच्या रूपातील 'खारी बिस्कीट' हा संजयच्या कारकिर्दीतील ५०वा सिनेमा ठरणार आहे. आजवर नेहमीच प्रेमकथा सादर करणाऱ्या संजयनं या सिनेमात लहान बहिण-भावाची कथा मांडली आहे. सिनेमांचं अर्धशतक आणि 'खारी बिस्कीट'चं औचित्य साधत संजयनं 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली. यावेळी बोलताना आपल्या सिनेमात कतरीना कैफ दिसणार असल्याच्या रहस्याचा खुलासाही संजयनं केला.

अमराठी प्रेक्षकांचं लक्ष

मूळात एक सिनेमॅटोग्राफर असल्यानं संजय जाधवनं नेहमीच स्टोरीलाईनपासून सादरीकरणापर्यंत काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळंच त्याच्या सिनेमांकडं केवळ मराठीच नव्हे, तर अमराठी प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. आजवर नेहमीच प्रेमीयुगूलांच्या गोष्टी सांगणारा संजय आता बहिण-भावाच्या प्रेमाची कथा सांगणार आहे. यामागील विचाराबाबत संजय म्हणाला की, या वेळीही नहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा माझा ध्यास होता. त्यातूनच 'खारी बिस्कीट' चित्रपटाचा विचार समोर आला. मागील काही सिनेमांपासून काहीसा तोचतोचपणा येत असल्यानं मी देखील थोडा कंटाळलो होतो. 'खारी बिस्कीट' बनवल्यानंतर मी सुद्धा रिफ्रेश झालो आहे.

काहीतरी वेगळं

आपल्या कामात तोचतोचपणा येऊ लागल्याचं सत्य संजयनं प्रामाणिकपणं मान्य केलं. त्यातून स्वत:ला बाहेर कसं काढायचं या प्रयत्नात त्यानं 'खारी बिस्कीट' बनवला आहे. याविषयी तो म्हणाला की, 'चेकमेट' आणि 'रिंगा रिंगा' बनवणारा जुना संजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एखादी गोष्ट ज्यावेळी वर्क करते, तेव्हा लोकं त्याच गोष्टीची अपेक्षा करतात. मग ते निर्माते असोत, वा आॅडीयंस. 'चेकमेट' आणि 'रिंगा रिंगा' बनवले तेव्हा ते वर्क झाले नाहीत, पण वेब प्लॅटफॅार्मवर खूप चालले. त्यानंतर 'दुनियादारी' आला आणि सुपरहिट झाला. त्यामुळं लोकांना वाटलं की, मी लव्हस्टोरी चांगली सांगू शकतो. मला मात्र नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं, पण लव्हस्टोरीच करण्याचा आग्रह होत राहिला. आता मात्र त्यातून बाहेर पडलो आहे.

खारी बिस्कीट

'खारी बिस्कीट'सारखा सिनेमा जेव्हा संजय जाधवसारखा दिग्दर्शक हाताळतो, तेव्हा त्याच्याकडून अपेक्षाही खूप वाढतात. याबाबत विचारलं असता सिनेमाच्या संकल्पनेबाबत संजय म्हणाला की, ही गोष्ट मागील बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात होती. फायनली झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील यांच्या निमित्तानं हा सिनेमा बनवण्याचा योगायोग जुळून आला. त्यांनाही ही गोष्ट आवडल्यामुळं मीसुद्धा हॅप्पी आहे. 'दुनियादारी'च्या आधीपासून माझ्या मनात अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याचा विचार घोळत होता. तेव्हापासून गोष्ट मनात होती. थॅाट छोटा होता, पण त्यावरून नंतर गोष्ट फुलत गेली आणि 'खारी बिस्कीट' आकाराला आला.

आवाज खूप छान

संजयनं नेहमीच मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. या सिनेमात मात्र वेदश्री खाडीलकर ही लहान मुलगी नायिकेच्या रूपात दिसणार आहे. संजय म्हणाला की, खरं तर वेदश्री माझ्या लिस्टमध्ये नव्हे, तर मी तिच्या लिस्टमध्ये आहे. सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी किंवा तेजस्वीनी पंडीत यांच्यापेक्षा जास्त टॅट्रम्स मला वेदश्रीनं दिले आहेत. कारण शी इज अ स्टार. विनोदाचा मुद्दा सोडा पण तिचा आवाज खूप छान आहे. ऐकायला खूप मजा येते. ती खूप क्यूट आहे.

व्हॅाट्सअपवर व्हिडीओ

खारीचा शोध घेण्याच्या प्रोसेसबाबत संजय म्हणाला की, खारी शोधण्याचं काम टफ होतं. बघताक्षणी तिच्या प्रेमात पडावं अशी ती असावी असा माझा अट्टाहास होता. खरं तर सर्व लहान मुलं खूप क्यूट असतात. याला झाका आणि त्याला काढा असं असतं, पण खारी या सर्वांपेक्षा खूप वेगळी असावी असं वाटत होतं. फायनली मला हवी असलेली खारी वेदश्रीच्या रूपात मिळाली. बिस्कीटची भूमिका साकारणारा मुलगाही बोलका असावा ही अपेक्षा होती. तो आदर्श कदमच्या रूपात मिळाला. दोघांचं रक्षाबंधनला रिलीज झालेलं गाणं चांगलंच गाजलं. व्हॅाट्सअपवर व्हिडीओ मागवून नंतर आॅडीशन्स घेतली आणि त्यातून या मुलांची निवड करण्यात आली. 

सिनेमासाठी खारीचा शोध

या सिनेमात कतरीना कैफही आहे असं आम्हाला समजलं आहे. हे खरं आहे का? असं विचारलं असता संजय मोठ्यानं हसला आणि म्हणाला की, होय... हे खरं आहे. खरं तर आम्ही या सिनेमासाठी खारीचा शोध घेत होतो, पण त्या खारीला शोधता शोधता आम्हाला चक्क डोंबिवलीची कतरीना कैफ मिळाली. तिला पाहिल्यावरच समाधान होतं. तिचा आवाज ऐकल्यावर मन तृप्त होतं. त्यामुळं तिला पाहिल्यावर खऱ्या कतरीनालाही कॅाम्प्लेक्स येईल. ती इतकी हुषार आहे की, आपल्याला काय सांगायचंय ते तिला लगेच समजतं. त्यामुळं ही कतरीना कैफ मराठी तिकिटबारीवर धमाल उडवून देणार आहे.

वेगळा आणि वास्तवदर्शी

'खारी बिस्कीट' हा सिनेमा आजवरच्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा आणि वास्तवदर्शी असल्यानं फेस्टिव्हल्समध्येही जाणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना संजय म्हणाला की, खरं सांगायचं तर फेस्टिव्हल किंवा थिएटरचा विचार करून मी हा सिनेमा बनवला नाही. एक चांगला सिनेमा बनवणं हाच मूळ हेतू होता. या सिनेमात जरी दोन लहान मुलांची कथा असली तरी ती पूर्णत: आर्टिस्टीक नाही. हा खूप एन्टरटेनिंग सिनेमा आहे. सर्वांना आवडेल असा आहे. केवळ लहान मुलांचा सिनेमा नसून, प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट याद्वारे सांगण्यात आली आहे. नि:स्वार्थ प्रेमाची ही गोष्ट सांगणारा हा सिनेमा फेस्टिव्हललाही नक्कीच जाईल.हेही वाचा -

शिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा