Advertisement

Exclusive: ‘बाजीराव मस्तानी’चे गीतकार होणार दिग्दर्शक!

मागील दोन ते तीन वर्षांपासून एक विचार मनात घोळत होता. कामाच्या निमित्ताने वावरताना आजूबाजूला घडणऱ्या घटनांचा वेध घेत होतो. त्यातून भारतातील पुरूष आणि स्त्रियांमधील नातेसंबंधांवर लघुपट बनवण्याची कल्पना सुचली. आपल्याकडे घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. त्यामागील कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. रिसर्च केला. त्यातून जे निष्पन्न झालं ते लघुपटात मांडलं आहे.

Exclusive: ‘बाजीराव मस्तानी’चे गीतकार होणार दिग्दर्शक!
SHARES

आपल्या क्षेत्रात नावलौकीक मिळाल्यानंतर त्या परीघाबाहेर जाऊन काहीतरी भव्य-दिव्य करायचं अनेकांचं स्वप्न असतं. असंच स्वप्न आहे ‘बाजीराव मस्तानी’ फेम गीतकार प्रशांत इंगोले या तरुण गीतकाराचं. स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रशांतची पावलं आता गीतलेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळली आहेत.

बी. कॅाम. पदवीधर, सिनेसृष्टीचा कोणताही अनुभव नाही, गॅाड फादर नाही... असं असताना एक मराठमोळा तरुण थेट हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतो. स्ट्रगल करताना ‘आ देखे जरा’ हा सिनेमा मिळतो, पण त्याचं क्रेडीटही त्याला मिळू शकत नाही. तरीही न खचता आपला संघर्ष सुरूच ठेवतो. याचं फलित म्हणून की काय त्याला निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ हा बिगबजेट सिनेमा मिळतो. या मराठमोळ्या तरुण गीतकाराचं नाव आहे प्रशांत इंगोले.

‘बाजीराव मस्तानी’मधील ‘मल्हारी...’ आणि ‘गजानना...’ ही प्रशांतने लिहिलेली गाणी खूप गाजली आहेत. याशिवाय ‘मेरी कोम’ तसंच ‘बेजुबान इश्क’ या सिनेमांतील प्रशांतची गाणीही श्रवणीय ठरली. आता प्रशांतची पावलं दिग्दर्शनाकडे वळली आहेत. दिग्दर्शनातील पहिलं पाऊल टाकण्याचा अनुभव प्रशांतने खास ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला.



दिग्दर्शन करायचं होतंच

जवळजवळ १३ वर्षांच्या संघर्षाच्या काळात खूप मोठा अनुभव गाठीशी आला. फावल्या वेळी खूप इंग्रजी सिनेमे पाहिले. त्यामुळे स्टाईल आॅफ मेकींग कशी असते याचं ज्ञान आलं होतं. प्रॅक्टीकल नॅालेज बऱ्यापैकी मिळालं होतं. थिअरीकल नॅालेज नव्हतं. गीतलेखनासोबत कथा-पटकथा लेखनाचा अनुभव असल्याने सर्वप्रथम शॅार्टफिल्म बनवण्याचा निर्णय घेतला.


पुरूष-स्त्रीमधील नातेसंबंधांवर

मागील दोन ते तीन वर्षांपासून एक विचार मनात घोळत होता. कामाच्या निमित्ताने वावरताना आजूबाजूला घडणऱ्या घटनांचा वेध घेत होतो. त्यातून भारतातील पुरूष आणि स्त्रियांमधील नातेसंबंधांवर लघुपट बनवण्याची कल्पना सुचली. आपल्याकडे घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. त्यामागील कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. रिसर्च केला. त्यातून जे निष्पन्न झालं ते लघुपटात मांडलं आहे.



शीर्षक ‘बुद्ध’

या लघुपटाचं शीर्षक ‘बुद्ध’ असं ठेवलं आहे. हे विचारांचं द्योतक आहे. जगभरातील ९० टक्के भाषा या संस्कृतपासून प्रेरीत आहेत. त्यामुळेच या लघुपटाचं शीर्षकही संस्कृतमधून प्रेरित होऊन ‘बुद्ध’ ठेवायचं ठरवलं. १७ मिनिटांच्या या लघुपटात वेगवेगळ्या वयोगटातील तीन स्त्रियांच्या कथांद्वारे एक विचार मांडला आहे. गावातील मुलगी, शहरातील लहान मुलगी आणि मध्यमवयीन विवाहीत तरुणी अशा तिघींच्या माध्यमातून कथा सादर केली आहे.


९ वर्षांपूर्वीचा अनुभव कामी

जवळजवळ ९ वर्षांपूर्वी मी १० मिनिटांची एक शॅार्टफिल्म बनवली होती. ‘आॅफ सेव्हन’ असं शीर्षक असलेल्या या लघुपटाला त्यावेळी पुण्यामध्ये झालेल्या कल्चरल एक्सचेंज फेस्टिव्हलमध्ये अॅवाॅर्डही मिळाला होता. ‘बुद्ध’ या लघुपटाच्या दिग्दर्शनासोबत लेखनही मीच केलं आहे. हा लघुपट फेस्टिव्हलसाठी बनवला असून, आॅलरेडी दोन-तीन फेस्टिव्हलसाठी सिलेक्टही झाला आहे.


भन्साळींचं मेकींग भावतं

‘बाजीराव मस्तानी’च्या निमित्ताने संजय लीला भन्साळींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाची मेकींग स्टाइल जवळून पाहता आली. कागदावर लिहिलेला एखादा सीन पडद्यावर कसा अचूकपणे उतरवायचा हे त्यांचं कसब अफलातून आहे. याशिवाय इतरही बड्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभवही या प्रवासात कामी येणार आहे.


आईची निर्मिती

‘बुद्ध’ची निर्मिती माझी आई विमल इंगोले यांनी केली आहे. यात विनीत शर्मा, गीतांजली मिश्रा, सबीना जाट, सुदीप सारंगी, रीचा मीना, देवेंद्र प्रजापती, अपर्णा आंबवणे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चंदन कोवली यांनी या लघुपटाचं छायालेखन केलं असून, संकलन महेश किल्लेकर आणि गुरू पाटील यांनी केलं आहे. श्रेयस पुराणिकने या लघुपटासाठी एक गाणं कंपोज केलं असून, प्रसिद्ध साऊंड रेकाॅर्डीस्ट गणेश गंगाधरन यांनी साऊंड डिझायनिंगचं काम केलं आहे.



हेही वाचा-

‘होम स्वीट होम’मध्ये पुन्हा भेटणार रिमा

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाने जुळवली रिअल लाईफ जोडी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा