Advertisement

हिंदीतील दिग्गजांना मराठीची मोहिनी

भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मराठी चित्रपटांनी नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे सिनेमे दिल्याचं जगमान्य आहे. कदाचित त्यामुळंच अलीकडच्या काळातील हिंदीतील दिग्गजांवर मराठी सिनेमानं मोहिनी घातल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

हिंदीतील दिग्गजांना मराठीची मोहिनी
SHARES

भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मराठी चित्रपटांनी नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे सिनेमे दिल्याचं जगमान्य आहे. कदाचित त्यामुळंच अलीकडच्या काळातील हिंदीतील दिग्गजांवर मराठी सिनेमानं मोहिनी घातल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

हिंदीतील दोन बड्या व्यक्तींनी नुकतीच मराठी सिनेमांची निर्मिती सुरू केल्याच्या बातम्या या आठवड्यात आल्या. त्यामुळं पुन्हा एकदा हिंदीतील दिग्गजांचा मराठीकडं ओढा वाढल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत शो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुभाष घईंनी आपल्या नव्या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता-दिग्दर्शक सतिश कौशिक यांनीही मराठी सिनेमाची वाट धरली आहे. या दोन चित्रपटांकडे मराठी सिनेसृष्टीसोबतच तमाम मराठी रसिकांचंही लक्ष लागलं आहे.

यापूर्वीही मराठी चित्रपटांनी हिंदीतील मातब्बरांवर आपली जादू केली आहे. भूतकाळात डोकावताना अगदी पूर्वीच्या काळातील दिग्गजांबाबत बोलायचं तर १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजदत्त दिग्दर्शित 'झेप' या मराठी चित्रपटाची निर्मिती वैजयंती माला यांनी केली आहे. नुकत्याच देवाज्ञा झालेल्या विद्या सिन्हा यांनीही मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत १९८६ मध्ये अनंत मराठे यांच्या दिग्दर्शनाखाली 'बिजली'सारखा लक्षवेधी सिनेमा बनवला आहे. १९८९ मध्ये सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'भुताचा भाऊ' या चित्रपटाची निर्मिती शैलेंद्र सिंग यांनी केली आहे. ज्युनियर मेहमूद यांनी १९९१ मध्ये 'मस्करी' चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन करत मराठीतील कारकिर्द सुरू केली.

बॅालीवुडचे शहेनशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेल्या 'विहीर' या मराठी चित्रपटानं २००९ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली. एकता कपूरची निर्मिती असलेल्या 'ताऱ्यांचे बेट' या चित्रपटानंही २०११ मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या '७२ मैल - एक प्रवास' या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारनं पत्नी ट्विंकल खन्नासह मराठी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास सुरू केला. अजय देवगणच्या निर्मितीत २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'विटी दांडू' या सिनेमात ब्रिटीशकालीन कथानक पहायला मिळालं. २०१४ मध्ये आलेल्या सई ताम्हणकर आणि अजिंक्य देव अभिनीत 'सौ. शशी देवधर'ची निर्मिती मराठमोळ्या शिल्पा शिरोडकरनं केली. 

२०१६ मध्ये प्रियांका चोप्राची पहिली मराठी निर्मिती असलेल्या 'व्हेंटीलेटर' या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. गत लोकसभा निवडणूकीत राजकारणात आपलं नशीब आजमावणाऱ्या मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरनं मागच्या वर्षी 'माधुरी' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. माधुरी दीक्षितनं यंदा नेटफ्लिक्ससाठी बनवलेल्या '१५ आॅगस्ट' या चित्रपटाद्वारे आपली मराठी चित्रपट निर्मितीची हौस भागवली. अलीकडच्या काळातील चित्रपटाबाबत बोलायचं तर संजय दत्तनं आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये 'बाबा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आता घई आणि कौशिक यांच्यामुळं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. घईंनी यापूर्वीही मराठी सिनेमांच्या निर्मितीत सहभाग घेतला आहे. 'सनई चौघडे' या सिनेमासोबतच त्यांनी 'वळू' आणि 'समिता' या सिनेमांचीही निर्मिती केली आहे. नुकत्याच त्यांच्या 'विजेता' या सिनेमाचा मुहूर्त पार पडला आहे. अमोल शेटगे दिग्दर्शित या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर, क्रुतिका तुळसकर, प्रीतम कागणे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपुरकर, ललित सावंत अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट आहे. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचं पोस्टर गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये लाँच करण्यात आलं होतं.

नेहमीच आपल्या भूमिकांसोबतच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सतिश कौशिक यांनीही मराठी चित्रपट निर्मितीचा वीडा उचलला आहे. 'मन उधाण वारा' या शीर्षकांतर्गत बनणाऱ्या सिनेमात ते एक हळवी प्रेमकथा सादर करणार आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून, पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मराठीकडं वळणाऱ्या हिंदीतील दिग्गजांच्या नावाची यादी भविष्यात झपाट्यानं वाढणार हे निश्चित. कारण हिंदी चित्रपटसृष्टी सध्या मराठीच्या भलतीच प्रेमात आहे. मराठी दिग्दर्शकांसाठीसुद्धा ही एक सुवर्णसंधी असून, प्रामाणिकपणं काम करणाऱ्यांसाठी ही संधी 'स्काय इज लिमीट' ठरणारी आहे.



हेही वाचा  -

'निकम्मा'साठी शिल्पाचं कमबॅक

क्रिकेट देवतेच्या रूपात सोनम कपूर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा