पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणार 'बलोच'!

बलोच'च्या निमित्तानं लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे प्रथमच एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत.

SHARE

मराठीत नेहमीच विविधांगी विषयावरील सिनेमे बनत असतात. कित्येकदा इतिहासाची पानं उलगडून काळाच्या पडद्याआड गेलेल्या घटना आणि कथाही या निमित्तानं समोर येतात. असंच एक सत्य उलगडणारा 'बलोच' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


टिझर पोस्टर लाँच 

प्रकाश पवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'बलोच' हा सिनेमा पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणारा असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. प्रकाश पवार यांचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी 'रांजण' आणि 'मिथुन' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या निमित्तानं पवार यांनी पुन्हा एकदा आव्हानात्मक विषयाला हात घालण्याचं धाडस केलं आहे. 


अभिनयाची जुगलबंदी 

या चित्रपटात बरीच वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या वैशिष्ट्य म्हणजे 'बलोच'च्या निमित्तानं लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे प्रथमच एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत. तरडे यांनी आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. भाऊराव कऱ्हाडे यांनीही 'बबन' या त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या दुसऱ्या चित्रपटात साकारलेल्या नायकाच्या वडीलांची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळं या सिनेमात प्रेक्षकांना प्रवीण तरडे आणि भाऊराव कऱ्हाडे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.


शूटिंग राजस्थानमध्ये 

भाऊराव आणि प्रवीण यांच्या जोडीला 'बलोच'मध्ये विशाल निकम, रोहित आवाळे या नवोदित कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग जून महिन्यात राजस्थानमध्ये सुरू होणार आहे. पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम मानली जाते. त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावं लागलं होतं. त्या गुलामांची शौर्यगाथा म्हणजे 'बलोच' सिनेमा असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे.हेही वाचा -

'प्रीतम' घडवणार कोकण-केरळचा संगम!संबंधित विषय
ताज्या बातम्या