Advertisement

मायकेल जॅक्सनने लावला रितेशच्या 'डोक्याला शॉट' !

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला जेव्हा 'डोक्याला शॉट' लावणाऱ्या प्रसंगाबाबत विचारलं, तेव्हा त्याने थेट आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पाॅप स्टार मायकेल जॅक्सनचं नाव घेतलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मायकेल जॅक्सनने लावला रितेशच्या 'डोक्याला शॉट' !
SHARES

या जगात कोण, कधी आणि कसा कोणाच्या 'डोक्याला शॉट' लावेल याचा नेम नाही. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला जेव्हा 'डोक्याला शॉट' लावणाऱ्या प्रसंगाबाबत विचारलं, तेव्हा त्याने थेट आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पाॅप स्टार मायकेल जॅक्सनचं नाव घेतलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.


वास्तवातील 'डोक्याला शॉट'

'डोक्याला शॉट' हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँच प्रसंगी रितेशने आपल्या बाबतीत घडलेला 'डोक्याला शॉट' लावणारा प्रसंग शेअर केला. या सोहळयाला रितेश प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता, तर पार्श्वगायक पद्मश्री कैलास खेर यांनीही विशेष हजेरी लावली होती. या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणाऱ्या मेघना एरंडेने जेव्हा रितेशला 'डोक्याला शॉट' लावणाऱ्या प्रसंगाबाबत विचारलं, तेव्हा रितेशने बिनधास्तपणे मायकेल जॅक्सनचं नाव घेतलं.


मायकेल गायला लागला अन्...

रितेश म्हणाला की, माझे परममित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९९६ मध्ये मायकेल जॅक्सनला म्युझिकल काँन्सर्टसाठी भारतात आणलं होतं. खूप मोठा लवाजमा होता. खूप मोठा गाजावाजा झाला होता. सर्वांप्रमाणे मलाही या कान्सर्टला जाण्याचा मोह आवरता आला नाही. मायकेलची एंट्री झाली आणि त्याने जेव्हा गायला सुरुवात केली, तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या 'डोक्याला शॉट' लागला. त्याच्या इंग्लिश गाण्यांचे बोल मला जराही समजत नव्हते. सर्वजण धुंद होऊन एन्जाय करत होते आणि मी मात्र तो काय गातोय हे ऐकून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी इंग्रजी गाण्यांची पुस्तकं वाचून काढली आणि मग मला गाणी समजायला लागली.


चार मित्रांची कथा

दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी 'डोक्याला शॉट' या चित्रपटात चार मित्रांची कथा मांडली आहे. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित यांनी चार मित्रांची भूमिका साकारली असून, यांच्या जोडीला प्राजक्ता माळीही मुख्य भूमिकेत आहे. कैलास खेर आणि मिका सिंग यांनी या चित्रपटात एक-एक गाणं गायलं आहे. 'डोक्याला शॉट' या सिनेमाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली असून, संगीतकार अमितराज आणि श्रीकांत-अनिता यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.


हेही वाचा -

टाॅर्चमन संदिप बनला सिनेमाचा नायक!

‘स्ट्रीट डान्सर’साठी वरुण-प्रभूचं रियुनियन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा