Advertisement

संथ गतीच्या प्रवाहात हरवलेला ‘बोगदा’

आशयघन कथानकाला आवश्यक गती प्रदान केली गेली, तर कलात्मक सिनेमेही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतात. पण बोगदा या सिनेमाचा विषय खूप छान असल्याने अपेक्षाही खूप होत्या, पण संथ गतीचा फटका या सिनेमाला बसला आहे.

संथ गतीच्या प्रवाहात हरवलेला ‘बोगदा’
SHARES

आशयघन कथानकाला आवश्यक गती प्रदान केली गेली, तर कलात्मक सिनेमेही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतात हे यापूर्वीही आपण बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत पाहिलं आहे. पण तसं घडलं नाही तर एखादा चांगला विषयही वाया जातो आणि अपेक्षाभंग होतो हे ‘बोगदा’ या सिनेमाबाबत खेदानं म्हणावं लागत आहे. कारण या सिनेमाचा विषय खूप छान असल्याने अपेक्षाही खूप होत्या, पण संथ गतीचा फटका या सिनेमाला बसला आहे.

प्रवाहापेक्षा वेगळा विषय

आजच्या पिढीतील तरुण दिग्दर्शक प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत यशस्वी पदार्पण करत आहेत. त्यामुळे नितीन केणी यांची कन्या निशिता केणी जेव्हा या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळली, तेव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी आशा निर्माण झाली. शीर्षकापासून सिनेमाच्या कथानकातपर्यंतही वेगळेपण जाणवलं, पण सिनेमाच्या शेवटी तो केवळ फुसका बार ठरतो. स्वेच्छामरण हा भारतीय सिनेसृष्टीत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या दिग्दर्शकांनी हाताळलेला विषय या सिनेमात असल्याने ‘बोगदा’बाबत खूप उत्सुकता होती.


नृत्यात करिअर घडवायचंय

सिनेमाची कथा नृत्यात करियर घडवू इच्छिणारी कोकणातील एक मुलगी तेजस्विनी (मृण्मयी देशपांडे) आणि तिची आजारी आई-माई (सुहास जोशी) यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. कायम आजारी असलेली काहीशा तिरसट स्वभावाची माई आणि तेजस्विनी यांच्यातील दुरावलेल्या नात्यांचीदेखील ही गोष्ट आहे. तेजस्विनीला नृत्यांगणमध्ये काम करण्यासाठी कोल्हापूरला जायचं असतं, तर माईला एकदा दक्षिणेकडील एका अजब गावातील रहस्य समजतं. थम्पू नावाच्या या गावात आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना वेदनामुक्त करून त्यांचं जीवन संपवलं जातं. आजाराला कंटाळलेल्या माईलाही त्या गावी जाऊन वेदनामुक्त व्हायचं असतं. अखेरीस ती स्वत:च थम्पू गावातून एक गाडी बोलावते. किशोर (रोहित कोकाटे) नावाचा तरुण त्यांना थम्पू गावच्या प्रवासाला नेतो. या प्रवासात काय घडतं? माई आपल्या मुक्कामी पोहोचते का? या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात आहेत.


संथ गतीचे सीन

सिनेमाचा विषय खूप चांगला असला तरी कालावधी फार मोठा असल्याने पुढे काय घडणार याबाबत उत्कंठा वाढण्याऐवजी कंटाळा येऊ लागतो. अत्यंत संथ गतीने सिनेमाची सुरुवात होते. त्यानंतर त्याहीपेक्षा संथ गतीने मोठमोठे सीन्स पडद्यावर येतात. कलाकारांचे संवाद आणि हालचालीही खूप संथ आहेत. बोलीभाषेवर काम करण्याची गरज दिग्दर्शिकेला भासली नाही याचं नवल वाटतं. एका खेडेगावात राहणाऱ्या आई आणि मुलीची भाषा मुंबई-पुण्यासारख्या शहरासारखी आहे. यामागील कारण शेवटपर्यंत समजत नाही. दोघीही जरी शिक्षीत असल्या असं मानलं तरी खेडेगावात राहणाऱ्या सुशिक्षीत व्यक्तींच्या बोलीभाषेतही तिथल्या मातीचा सुगंध असतोच, पण या दोघी कोकणातील असूनही त्यांच्या बोलीभाषेत कुठेही कोकणातील लहेजा जाणवत नाही.


संवाद अर्थपूर्ण

सिनेमातील काही संवाद फार अर्थपूर्ण आहेत. “मला मरण साजरं करायचं आहे” हा सुहास जोशींच्या मुखातील संवाद अंतर्मुख करायला लावतोच, पण त्यासोबतच वेदना सहन करत मृत्यूची वाट पाहणाऱ्या असंख्य रुग्णंची मानसिकता नकळतपणे सांगून जातो. खरं तर सिनेमाचा विषय खूप गहन आणि कथेचा जीव फार मोठा असल्याने कमी लांबीचा सिनेमा बनवण्याची गरज होती. एखाद्या मालिकेप्रमाणे सारं काही दाखवण्याचा हट्ट धरण्याऐवजी कमी वेळात फार काही दाखवण्याची गरज होती. मृण्मयीवर चित्रीत करण्यात आलेलं ‘झुंबड…’ हे गाणं छान आहे. या गाण्यावर मृण्मयीने नृत्यही सुरेख केलं आहे. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगला आहे.


कसदार अभिनय

मराठीतील दोन दिग्गज अभिनेत्रींनी आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर हा सिनेमा तारण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या सुहास जोशी या सिनेमात दिसतात. आजाराला कंटाळल्याने काहीशी तिरसट आणि हेकट स्वभावाची माई त्यांनी सुरेखरीत्या साकारली आहे. नृत्य करण्याची आवड असूनही मानसिक गोंधळामुळे कोणत्याच निर्णयापर्यंत न पोहोचलेल्या तसंच आईच्या आजारपणामुळे अडकलेल्या तरुणीची भूमिका मृण्मयीने अगदी चोख बजावली आहे. रोहित कोकाटेनेही आपल्या छोट्याशा भूमिकेत वास्तववादी वास्तववादी रंग भरले आहेत.

अपेक्षाभंग

एका चांगल्या विषयावर तितकाच सुरेख सिनेमा पाहायला मिळावा अशी या सिनेमाकडून अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकलेली नाही. कलात्मक सिनेमांमध्ये मोडणाऱ्या या सिनेमाला तसे फार प्रेक्षक लाभणं अपेक्षित नव्हतं, पण कलात्मक सिनेमांचे चाहतेही हा सिनेमा पाहून संतुष्ट होतीलच असं सांगता येत नाही.

दर्जा : **

...........................................

चित्रपट : बोगदा

निर्माते : करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद, निशिता केणी

लेखन/दिग्दर्शक: निशिता केणी

कलाकार: मृण्मयी देशपांडे, सुहास जोशी, रोहित कोकाटे, जयंत गाडेकर, अजिंक्य भोसलेहेही वाचा-

रिमा-मोहन यांच्या ‘होम स्वीट होम’चा काव्यमय टीझर

‘माझा अगडबम’च्या शीर्षकगीताने ‘थरथरलं आसमान’संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा