Advertisement

लहानग्यांचं विश्व आणि मनातील भावाची गोष्ट!


लहानग्यांचं विश्व आणि मनातील भावाची गोष्ट!
SHARES

‘बालपणीचा काळ सुखाचा...’ असं बऱ्याचदा म्हटलं जातं. कारण बालपणी केवळ स्वच्छंदी जगणं असतं, पण काहींच्या नशीबी या स्वच्छंदी जगण्यातही थोडं टेन्शन असतं. ते आपली प्रिय व्यक्ती सोडून जाण्याचं असेल तर तो इवलासा जीव तिला वाचवण्यासाठी मनाला पटेल आणि बु्द्धीला रुचेल ते सर्व प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांचीच कथा दिग्दर्शक रोहन देशपांडे यांनी या सिनेमात सादर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीत बालमनाचा आढावा घेत त्यांचं विश्व चितारणाऱ्या सिनेमांची संख्या इतरांच्या तुलनेत चांगली आहे. बालवयातील गंमतीजमती आणि आठवणी प्रत्येकाच्याच मनावर कायमच्या कोरलेल्या असतात. अशा सिनेमांच्या निमित्ताने त्या जाग्या होतात आणि सिनेमाचा विषय आपोआपच लोकांपर्यंत पोहोचतो. या सिनेमात एका माशाला केंद्रस्थानी ठेवून भाव आणि भक्तीचा अनोखा डाव मांडला आहे.



इच्छा तेथे मार्ग, भाव तेथे देव असं नेहमीचं म्हटलं जातं. त्यामुळे एखाद्या दगडालाही शेंदूर फासला की त्यात देवत्व आल्याचं मानून त्याची पूजा केली जाते. या सिनेमाची गोष्टही भाव आणि भक्ती यावर आधारित आहे. शाळेत शिकणारी चानी (मैथिली पटवर्धन) आणि तिचा मित्र बाळू (साहिल जोशी) यांची ही कथा आहे. चानीची आई कावेरी (अभिलाषा पाटील) आजारी असते. ती केवळ तीन महिनेच जगेल असं डॅाक्टर सांगताना चानी ऐकते आणि तिच्या पायाखालची जमिनच सरकते. आईला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं असं ती बाळूला सांगते. गोष्टीतील राक्षसाचा जीव पोपटात असतो हे तिला ठाऊक असतं. अशातच मंदिरात किर्तन करणाऱ्या महाराजांनी सांगितलेली राजा आणि माशाची गोष्टही ती ऐकते. तो मासा कसा राजाचा जीव वाचवतो हे महाराजांनी सांगितलेलं चानीच्या बालमनावर ठसतं. आईचा जीवही माशातच असणार आणि तो मासा शोधायला हवा असं तिला वाटतं. चानीच्या मनातील भाव तिच्या आईचा जीव वाचवते का? ते या सिनेमात पाहायला मिळतं.

सिनेमाचा विषय जरी लहान असला तरी त्यातून चितारलेलं भावविश्व खूप मोठं आहे. कथेचा जीव फार मोठा नसल्याने उगाच फाफटपसारा वाढवून वेळकाढूपणा करण्याचं दिग्दर्शकाने टाळलं ते चांगलं केलं आहे. त्यामुळे कमी वेळात चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान लाभतं. सिनेमात काही उाणिवाही आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास लहानग्यांचं सुरेख भावविश्व पाहायला मिळतं. पटकथा आणि संवादलेखन चांगलं असलं तरी जमिनी विकत घेऊन मालक असलेल्या शेतकऱ्यालाच चौकीदार बनवणं, दुष्काळाचा प्रभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नुकसान भरपाईमध्ये होणारा काळाबाजार यांसारखे विषय जोडल्याने मूळ विषयावरून लक्ष बाजूला नेण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतं. सिनेमातील एका दृश्यात कोणी तरी आत्महत्या केल्यासारखं वाटतं, पण ते नेमकं काय होतं ते अनुत्तरीतच राहतं.

खरं तर चानी, बाळू, मासा आणि चानीच्या आईचा जीव याभोवतीच खेळता आलं असतं. आईच्या दुखण्याबद्दल काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, पण चानीची श्रद्धा आणि आईचं बरं होणं हा ट्रॅक खूप छान झाला आहे. सिनेमा रिअल लोकेशनसोबतच सेटवरही चित्रीत करण्यात आला असला तरी कुठेही तसं जाणवत नाही. छायालेखन, कला दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, कॅास्च्युम, साऊंड डिझायनिंग या जमेच्या बाजू आहेत. दोन्ही लहान मुलांकडून उत्तम काम करून घेतल्याबद्दल दिग्दर्शकाचं कौतुक करावं लागेल. ‘तानापिहिनिपाजा...’ हे गाणं छान झालं आहे. माशासाठी टँकरमागे धावणं, जीवावर उदार होऊन बोगद्याच्या पलिकडे जाणं, काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्री विहिरीतील मासा शोधण्यासाठी जाणं हे सीन उत्कंठावर्धक आणि चांगले झाले आहेत.

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या दोन्ही मुलांनी कमालीचा अभिनय केला आहे. चालण्या-बोलण्यासोबतच वागण्यातील सहजता त्यांनी अचूकपणे सादर केली आहे. दोघांनी यापूर्वीही सिनेमांमध्ये काम केलं असल्याचा अनुभव येथे कामी आला. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे. अजय जाधव आणि अभिलाषा पाटील यांनी चानीच्या, तर अतुल महाले आणि पूजा नायक यांनी बाळूच्या आई-वडीलांच्या लहानशा भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. या सिनेमातील काही व्यक्तिरेखा ग्रामीण बोलीभाषा बोलतात, तर काही शहरी हा घोळ झाला आहे.

थोडक्यात काय तर लहानग्यांचं विश्व आणि त्यांच्या मनातील भाव यांची अचूकपणे सांगड घालणारा हा सिनेमा मैथिली आणि साहिल यांचा निरागस अभिनय पाहण्यासाठी एकदा तरी पाहायला हवा.

दर्जा: ***1/2
..........................................
सिनेमा- पिप्सी

दिग्दर्शक  - रोहन देशपांडे

निर्माती - विधि कासलीवाल

लेखक - सौरभ भावे

कलाकार - मैथिली पटवर्धन, साहिल जोशी, अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील, पूजा नायक


हेही वाचा-

सद्गुणांची चुंबकीय शक्ती

‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा

वास्तववादी सिनेमासाठी अभिनेत्री बनली निर्माती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा