Advertisement

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा

हा चित्रपट अत्याचार झालेल्या स्त्रीयांच्या मनात जगण्याची नवी उमेद जागृत करणारा असला तरी बऱ्याच त्रुटी राहिल्यानं एका धडाकेबाज तुरुंग अधिक्षीकेनं दिलेला लढा पडद्यावर प्रभावहीन वाटतो.

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा
SHARES

आज स्त्री जरी कितीही मोठ्या हुद्द्यावर विराजमान असली तरी सर्वच क्षेत्रांमध्ये तिला नमवण्यासाठी पुरूष अत्याचाररूपी शस्त्राचा वापर करतो. मग तो लैगिक अत्याचार असो, वा मानसिक... अशा प्रकारच्या पुरूषी अत्याचाराला बळी पडल्यानंतरही त्या स्त्रीनं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उठून उभं रहायला हवं, आरोपींना धडा शिकवण्यासाठी कंबर कसायला हवी आणि त्यासाठी तिच्यामागं प्रामाणिक शासकीय यंत्रणांनी संपूर्ण ताकदीनिशी उभं रहायला हवं असं काहीसं कथानक 'बंदिशाळा' या चित्रपटात आहे. हा चित्रपट अत्याचार झालेल्या स्त्रीयांच्या मनात जगण्याची नवी उमेद जागृत करणारा असला तरी बऱ्याच त्रुटी राहिल्यानं एका धडाकेबाज तुरुंग अधिक्षीकेनं दिलेला लढा पडद्यावर प्रभावहीन वाटतो.

या चित्रपटाची कथा डॅशिंग तुरुंग अधिक्षीका माधवी सावंत (मुक्ता बर्वे)भोवती गुंफण्यात आली आहे. शिस्तप्रिय, प्रामाणिक, आरोग्यप्रिय, भ्रष्टाचारविरोधी, नीतीमूल्ये जपणारी अशी ख्याती असलेल्या माधवीला तुरुंगामध्ये कोणताही गैरप्रकार खपत नसतो. रघू फराकटे (उमेश जगताप) नावाचा अट्टल गुन्हेगार मात्र माधवीला जुमानत नसतो. अशातच आमदार देशमाने (शिवराज वावलेकर) यांचा जवळचा नातेवाईक भगवंतराव गायकवाडला (प्रवीण तरडे) कारागृह उपमहानिरीक्षक असलेले सुदामराव जाधव (शरद पोंक्षे) कारागृहातील कामांसाठी ११० कोटी रुपयांचं कंत्राट देतात. काम उत्कृष्ट दर्जाचं आणि कायद्याच्या चाकोरीतच करावं लागेल, असं माधवी मात्र गायकवाडला ठणकावून सांगते, पण गायकवाड काही ऐकत नाही. त्यानंतर एकीकडे माधवी रघूला कठोर शिक्षा देते, कैद्यांना खोटं सर्टिफिकेट देणाऱ्या डॅाक्टरला नोटिस पाठवते, तुरुंग अधिकारी जगदाळेलाही धारेवर धरते, तर दुसरीकडे गायकवाडला ब्लॅक लिस्टेड करते. सहकुटुंब एका हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या माधवीवर गुंडांचा हल्ला होतो. त्यानंतर काय घडतं आणि माधवी कशाप्रकारे परिस्थितीशी लढा देते ते पहायला मिळतं.

या चित्रपटातील काही संवाद अतिशय मार्मिक आणि हृदयाला भिडणारे आहेत, पण पटकथालेखन पातळीवर आणखी चोख काम होण्याची गरज होती. मुक्तानं माधवी सावंत ही व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी अफलातून मेहनत घेतली असली तरी पटकथेची मांडणी आणखी तडाखेबंद असती, तर हा चित्रपट अत्यंत प्रभावी बनला असतात. मुख्य व्यक्तिरेखेतील मुक्ता वगळता आजूबाजूच्या व्यक्तिरेखांची व्यवस्थित पेरणी आणि त्यांच्या असण्याचं कारण नीट स्पष्ट न केलं गेल्यानं त्यांचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटतं. मुक्ताचा नवरा केवळ एलआयसीचं प्रमोशन करण्यासाठी आहे. मुक्ताच्या मागं उभं राहण्याखेरीज त्याचं काहीच कर्तृत्व नाही. मैत्रीण रुक्साना, तिचा भांडखोर नवरा, माधवीवर अत्याचार झाल्यावर मध्येच तिला टोमणे मारण्यासाठी घरी आलेल्या स्त्रिया यांचा काय संबंध? असा प्रश्न पडतोच.

पहिल्या दृश्यापासून चित्रपट उत्सुकता वाढवतो. माधवी सावंतची कडक शिस्त, कैद्यांप्रती आस्था, त्यांच्या आरोग्याविषयीची काळजी आणि माणूस म्हणून त्यांना दिली जाणारी आपुलकीची वागणूक पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं पहायला मिळणार असल्याचं जाणवतं. कथानक जसजसं पुढे सरकतं तसतशी मात्र दिग्दर्शनातील ढिलाईही सलू लागते. सुरुवातीपासून वास्तववादी वाटणारा चित्रपट क्लायमॅक्समध्ये मेलोड्रामा बनतो. तुरुंग अधिकारी असलेली एक खमकी स्त्री, जी वेळप्रसंगी कैद्यांना जायबंदी होईपर्यंत मारते, वरिष्ठांनाही बिनधास्तपणे शिंगावर घेते, भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या नाकी नऊ आणते ती अत्याचार करणाऱ्या तीन गुंडांचा सामना करू शकत नाही, हे पटत नाही. 

कोर्टातील ड्रामा अक्षरश: फ्लॅाप ठरला आहे. अजय पूरकरनं आरडाओरड करून अमरिश पुरींच्या शैलीत वकील सादर करण्याचा कलेला प्रयत्न लाऊड वाटतो. त्याच्या विरोधात असलेल्या सरकारी वकील सविता प्रभुणे काहीच हालचाल न करता मूग गिळून गप्प बसल्याचं चित्र दिसतं. त्यात न्यायाधिशांची भूमिकाही मवाळ वाटते. मध्येच एका दृश्यात मोबाईलद्वारे आरोपींचं बोलणं शूट केल्याचा सीन आहे, पण त्याचं पुढे काहीच होत नाही. चित्रपटातील गाणीही तितकीशी प्रभावी नाहीत. सुरुवातीची लावणी तर उगाच कोंबल्यासारखी वाटते. 'काळोखाच्या वाटेवरती उजेड दिसंना बाई...' हे गाणं अर्थपूर्ण गाणं हृदयाला भिडतं. तांत्रिक बाबींमध्येही हा चित्रपट ठिकठाकच आहे.

आपण इतर अभिनेत्रींपेक्षा का वेगळे आहोत हे मुक्ता बर्वेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एका धडाकेबाज स्त्री तुरुंग अधिक्षीकेची भूमिका मुक्तानं अत्यंत बिनधास्तपणं साकारली आहे. तिला कैदी रघू फराकटेच्या रूपात उमेश जगतापनं जबरदस्त टक्कर दिली आहे. शरद पोंक्षेंनी साकारलेला भ्रष्ट कारागृह उपमहानिरीक्षकही बेरका आहे. हेमांगी कवीनं साकारलेली रुक्साना ही मुस्लीम व्यक्तिरेखा कथानकात तितकीशी महत्त्वाची नसली, तरी तिनं मात्र ती चोख बजावली आहे. अश्विनी गिरी यांनी छोट्याशा ग्रामीण भूमिकेत मराठमोळ्या म्हणींच्या आधारे रंग भरला आहे. याशिवाय विक्रम गायकवाड, आशा शेलार, प्रवीण तरडे, आनंदा कारेकर, अभिजीत झुंझारराव, आनंद अलकुंटे, माधव अभ्यंकर, शिवराज वावलेकर आदी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.


या चित्रपटाची वनलाईन सुरेख असून, त्याद्वारे देण्यात आलेला संदेशही मोलाचा आहे. मुक्ताचा डॅशिंग अनुभव आणि समाजव्यवस्थेतील वास्तव जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.

..................................

मराठी चित्रपट : बंदिशाळा

निर्माती : सौ. स्वाती संजय पाटील 

कथा, पटकथा, संवाद व गीते : संजय कृष्णाजी पाटील 

दिग्दर्शक :  मिलिंद लेले

कलाकार : मुक्ता बर्वे, उमेश जगताप, विक्रम गायकवाड, हेमांगी कवी-धुमाळ, शरद पोंक्षे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अजय पुरकर, सविता प्रभुणे, अनिल नगरकर, अश्विनी गीरी, आनंदा कारेकर, अभिजीत झुंझारराव, वर्षा घाटपांडे, आनंद अलकुंटे, माधव अभ्यंकर, शिवराज वावलेकर, प्रसन्न केतकर, प्रताप कळके, सोनाली मगर, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, कृतिका गायकवाड, आर्या घारे, सई खेडेकरहेही वाचा-

शिवा-सिद्धीचा सत्यनारायणाच्या पूजेसाठी 'जीव झाला येडापिसा'

जॉनीसोबत भरत-निर्मिती करणार 'एक टप्पा आऊट'
संबंधित विषय
Advertisement