Advertisement

Movie Review : खेड्यातील वास्तव दाखवणारी शर्यत

ग्रामीण पातळीवर विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांअभावी प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घ्यावं लागतं. देशातील बऱ्याच खेड्यांमधील हे चित्र आजही बदललेलं नाही. तरीही तिथली एखादी विद्यार्थीनी कशा प्रकारे स्वत:ला सिद्ध करते ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

Movie Review : खेड्यातील वास्तव दाखवणारी शर्यत
SHARES

अलीकडच्या काळातील काही मराठी चित्रपट खेळावरही लक्ष केंद्रित करत काही प्रेरणादायी कथा रसिकांसमोर आणल्या आहेत. 'पळशीची पीटी' या चित्रपटातील एका गावातील मुलीचा धावपटू बनण्याचा प्रवासही प्रेरणादायी ठरावा असा आहे. ग्रामीण पातळीवर विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांअभावी प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घ्यावं लागतं. देशातील बऱ्याच खेड्यांमधील हे चित्र आजही बदललेलं नाही. तरीही तिथली एखादी विद्यार्थीनी कशा प्रकारे स्वत:ला सिद्ध करते ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटात दिग्दर्शकानं वास्तव चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं त्यात कल्पनाशक्तीच्या बळावर काहीही अतिशयोक्ती किंवा फिल्मी स्टाईलमधे चित्रण करण्यात आलेलं नाही. असं असलं तरी रुपेरी पडद्यावर हा प्रवास पाहताना मनाला भिडत नाही. नायिकेचा संघर्ष प्रभवीपणे समोर येत नाही. पटकथेतील उणीवा, पार्श्वसंगीत आणि बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. कलाकारांनी आपल्या परीनं चांगला अभिनय केला असला तरी तांत्रिकदृष्ट्या आणि इतर बाबतीतही हा चित्रपट सामान्य दर्जाचा वाटतो.

ही कथा आहे पळशी गावातील शाळेत शिकणाऱ्या भागीची (किरण ढाणे). अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या धनगर जमातीत जन्मलेली भागी तिथल्याच गावातील शाळेत शिकत आहे. परिस्थितीमुळं अनवाणी धावत शाळेत जाणाऱ्या भागीच्या शाळेतील शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांचं प्रतिनिधीत्व करणारी आहे. मुख्याध्यापिका ही संस्थापकाच्या हातातील बाहुली, तर खेळाचे शिक्षक खेळाबाबतच उदासीन असतात. अशातच तालुका स्तरीय शालांत स्पर्धांमध्ये प्रत्येक शाळेतून विद्यार्थी पाठवण्याची आॅर्डर येते. त्यावर उपाय म्हणून शिक्षक भागी आणि दुसऱ्या एका मुलीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठवतात. चित्रकला शिकवणाऱ्या बीडकर सरांना (राहुल बेलापूरकर) स्पर्धेसाठी मुलींसोबत पाठवलं जातं. अपंग बीडकर त्यांना घेऊन जातात. त्या स्पर्धेत भागी प्रथम क्रमांक पटकावते. त्यानंतर जिल्हा स्तरीय स्पर्धेतही बाजी मारते. बीडकर सर तिला सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करतात. भागीच्या घरी मात्र याची जराही कल्पना नसते. भागीचे आई-वडील हवालदार विकासशी (राहुल मगदुम)तिचं लग्न लावून देण्याच्या तयारीत असतात. अशा परिस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी भागी कशी तयारी करते ते या चित्रपटात पहायला मिळतं.

चित्रपटाची कथा वास्तववादी आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात, विशेषत: खेडोपाडी खूप टॅलेंट दडलेलं आहे. योग्य मार्गदर्शन आाणि परिस्थिती नसल्यानं ते पुढं येऊ शकत नसल्याचं आपण कित्येकदा पाहिलं आहे. हा चित्रपटही अशाच टॅलेंटचा प्रवास जगासमोर आणणारा असल्यानं या चित्रपटाची कथा समाजातील दुर्बल घटकांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या चित्रपटासाठी एका तडाखेबंद पटकथेची गरज होती. ठराविक अंतरानं कथेत ट्विस्ट आणणारी पटकथा आणि उत्कंठावर्धक प्रसंगांची पेरणी पटकथेत असणं गरजेचं होतं, पण तसं काहीही पहायला मिळत नाही. बोलीभाषा आणि वास्तववादी चित्रण यावर विशेष मेहनत घेतली असून, त्याला पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील.

ग्रामीण भागातील उदासीन शिक्षण व्यवस्था, शालांतर्गत राजकारण, संस्थापकांची हुकूमशाही, संधीसाधू राजकारणासोबतच नायिकेचा संघर्ष या चित्रपटात आहे, पण बऱ्याच उणीवा राहिल्यानं भागीचा संघर्ष तितकासा प्रभावी वाटत नाही. चित्रपटात जत्रा आहे, पण त्या जत्रेत गर्दीच नाही. त्यामुळं दर्जेदार निर्मितीमूल्यांचाही अभाव जाणवतो. शर्यतीतील क्षण आणखी उत्कंठावर्धक बनवण्याची आवश्यकता होती, पण तसं काहीही घडलेलं नसल्यानं निराशा होते. छायालेखन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. वास्तववादी लोकेशन्सवर वेगवेगळ्या अँगलमधून छायाचित्रण करण्यात आलं आहे. पार्श्वसंगीत, संकलन या बाबीही सामान्य दर्जाच्या असल्यानं दिग्दर्शक धोंडीबा कारंडे यांनी वास्तववादी कथानकाच्या माध्यमातून दाहकता दर्शवत प्रेरणादायी कथा मांडण्याचा प्रयत्न पूर्णत: यशस्वी झालेला नाही.

'लागीरं झालं जी' या मालिकेत जयडीच्या रूपात प्रकाशझोतात आलेल्या किरण ढाणेनं शीर्षक भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आपला प्रत्येक सीन प्रभावी वाटावा यासाठी तिनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. या मागोमाग राहुल बेलापूरकरनं अपंग चित्रकला शिक्षकाच्या भूमिकेत अचूक रंग भरले आहेत. त्यानं साकारलेली व्यक्तिरेखा एका तरी शिक्षकाला प्रेरणा देणारी ठरली तरी त्याच्या भूमिकेचं सोनं होईल. 'लागीरं झालं जी'मध्ये राहूल्याची भूमिका साकारणाऱ्या राहुल मगदुमची व्यक्तिरेखा फार लांबीची नाही. हवालदाराच्या भूमिकेत तो शोभत नाही, पण ग्रामीण बाजाची ही भूमिका त्यानं आपल्या शैलीत साकारली आहे. चित्रपटातील इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

बऱ्याच उणीवा राहिल्यानं हा चित्रपट जरी फारसा प्रभावी बनला नसला तरी, भागीच्या रूपातील पळशीच्या पीटीचा हा प्रवास केवळ दुर्बल घटकांमधीलच नव्हे, तर सर्वांना प्रेरणादायक वाटावा असा आहे. त्यामुळं पळशीच्या पीटीची ही शर्यत पाहण्याचा चान्स घ्यायला हरकत नाही.

दर्जा : **

...............................

 मराठी चित्रपट : पळशीची पीटी

निर्माता, कथा, दिग्दर्शक : धोंडीबा कारंडे

पटकथा : तेजपाल वाघ, महेशकुमार मुंजाळे. संवाद : तेजपाल वाघ

कलाकार : किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, राहुल मगदुम, धोंडीबा कारंडे, शिवानी घाटगे, तेजपाल वाघ, विद्या सावळे, राजू सहस्त्रबुद्धे, संजय डुबल, दीक्षा सोनवणे, नीलिमा कामाने, ज्ञानेश्वर माने




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा