Advertisement

Movie Review : डोक्यावर पडलेल्या शहाण्या मित्राची गोष्ट

एखादा माणूस जर खरोखर डोक्यावर पडला तर कदाचित काय घडू शकतं? त्याचं प्रात्यक्षिकच 'डोक्याला शॅाट' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे

Movie Review : डोक्यावर पडलेल्या शहाण्या मित्राची गोष्ट
SHARES

'तू डोक्यावर पडलायस काय?' असं आपण अगदी सहजपणं मस्करीत आपल्या एखाद्या मित्राला म्हणतो. पण एखादा माणूस जर खरोखर डोक्यावर पडला तर कदाचित काय घडू शकतं? त्याचं प्रात्यक्षिकच 'डोक्याला शॅाट' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. दिग्दर्शनाकडं वळलेल्या शिवकुमार पार्थसारथी यांनी आपल्या पहिल्या मराठी सिनेमासाठी मॅड कॅामेडी प्रकारात मोडणारा विषय निवडला आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारे 'डोक्याला शॅाट' न देता डोकं बाजूला हा सिनेमा बघणं उचित ठरतं.


तमिळ सिनेमाचा मराठी रिमेक

'नाडुवूला कोंजम पक्कथा' या मूळ तमिळ सिनेमावरून हा सिनेमा बनवण्यात आला आहे. तमिळ आणि मराठीखेरीज 'शू थयू?' या शीर्षकांतर्गत या सिनेमाचा गुजराती रिमेक बनवण्यात आला आहे. आता 'डोक्याला शॅाट'च्या रूपात मराठी रिमेक प्रेक्षकांसमोर आला आहे. तमिळ सिनेमाचा मराठी रिमेक करताना गोष्टीचा गाभा तोच ठेवून मराठमोळी वातावरणनिर्मिती तयार करण्यात आली आहे. तसं पाहिलं तर हा एखाद्या सिनेमाचा रिमेक आहे, असं सिनेमा पाहताना कुठंही वाटत नाही हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. एका लहानशा घटनेभोवती कथानक गुंफून त्यावर पटकथेचा डोलारा उभारण्यात आलेला आहे.


क्रिकेट खेळण्याची लहर

अभिजीत (सुव्रत जोशी), भज्जी (रोहित हळदीकर), चंदू (ओंकार गोवर्धन) आणि गणेश (गणेश पंडित) या चार जीवलग मित्रांची ही कथा आहे. सिनेमाची सुरुवात लग्नाच्या मागणीपासून होते. अभिजीतचं दक्षिणात्य सुब्बुलक्ष्मीवर (प्राजक्ता माळी) प्रेम असतं. लग्नाची मागणी घालण्यासाठी तो थेट तिच्या घरी आलेला असतो. तिचे वडील प्रथम लग्नाला तयार नसतात, पण सर्वांच्या आग्रहाखातर साऊथ इंडियन पद्धतीनं लग्न करण्याच्या अटीवर अभिजीत आणि सुब्बुच्या लग्नाला होकार देतात. लग्नपत्रिकाही छापलेली असते. रिसेप्शन आणि लग्नाला केवळ एक दिवस शिल्लक असताना चौघा मित्रांना क्रिकेट खेळण्याची लहर येते.


लग्नासाठी धडपड

क्रिकेट खेळताना गणेशच्या गोलंदाजीवर भज्जीने हवेत भिरकावलेला चेंडू पकडण्याच्या नादात अभिजीत उताणा खाली पडतो. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस मार लागतो. त्यानंतर त्याला काही गोष्टी आठवतात, तर काही आठवत नाहीत. आपलं एका साऊथ इंडियन मुलीशी लग्न ठरलं आहे, याचाही त्याला विसर पडतो. त्यामुळं भज्जी, चंदू आणि गणेश यांची पाचावर धारण बसते. मग या सर्वातून अभिजीतला सुखरूप बाहेर काढून त्याचं लग्न सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांची जी धडपड सुरू होते ती या सिनेमात आहे.


थोडी अतिशयोक्ती

सिनेमाची वनलाईन चांगली आहे, पण त्याभोवती गुंफण्यात आलेली पटकथा तर्क-वितर्क आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या कृतींशी अचूक सांगड घालण्यात काही ठिकाणी कमी पडते. असं असलं तरी त्यातूनही विनोदनिर्मिती होऊन हशा पिकतोच. हे श्रेय लेखक-दिग्दर्शकांसोबतच कलाकारांनाही जातं. डोक्याला इजा झाल्यावर नायकाचा स्मृतीभ्रंश होतो. त्यानंतर तो काही गोष्टी विसरतो, काही विसरत नाही हे दाखवताना बऱ्याचदा गफलत झाल्यासारखी वाटते. जीवापाड प्रेम करणारी तरुणी स्वत:च्या लग्नाला एक दिवस शिल्लक असताना आपल्या प्रियकराला फोन करण्यासाठी धडपडत असते, पण तो रिसेप्शनला जेव्हा बाजूला उभा राहून अनोळखी व्यक्तीसारखा वागतो, तेव्हा तिला जराही संशय येत नाही, ही थोडी अतिशयोक्ती वाटते.


थोडं बोअर

सिनेमा सुरू झाल्यानंतर घटना इतक्या वेगात घडतात की, आता पुढील अर्ध्या तासात सिनेमा संपेल असं वाटतं. पण अभिजीतला अपघात झाल्यानंतर कथा एकाच जागी थबकते. तीन दिवसांच्या घटनाक्रमांमध्ये सिनेमाची गती संथ होते. याशिवाय अभिजीतचं पुन: पुन्हा तेच तेच बोलणं थोडं बोअर करतं. ती जरी कथानकाची गरज असली, तरी काहीसं सांकेतिक किंवा आणखी कोणत्या तरी पद्धतीनं सादर करण्याची आवश्यकता होती. काही विनोदी प्रसंग पोट धरून हसवतात. कैलास खेरच्या आवाजातील 'गुलाम जोरू का...' आणि मिका सिंगनं गायलेलं टायटल ट्रॅक चांगलं आहे. पार्श्वसंगीत, छायांकन आदी बाबी चांगल्या आहेत. प्रथमच दिग्दर्शन करताना शिवकुमार यांनी विनोदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवण्याचा केलेला प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे.


प्राजक्ताची भूमिका छोटी

सुव्रत जोशीनं अभिजीतची भूमिका अफलातून साकारली आहे. त्याचं टायमिंग, पुन: पुन्हा तेच आणि त्याच टोनमध्ये बोलणं, त्या जोडीला चेहऱ्यावरील हावभाव, मराठी मुलीशीच लग्न करण्याबाबतचं बोलणं... सारं काही अभिजीतच्या व्यक्तिरेखेसाठी पूरक आहे. मित्रांच्या भूमिकेत ओंकार गोवर्धननं अतिशय परिपक्व अभिनय केला आहे. गणेश पंडीतनं साकारलेला गणेशही काही ठिकाणी हसवतो. रोहित हळदीकरनं वठवलेला भज्जीही चांगला झाला आहे. प्राजक्ता माळी जरी नायिका असली, तरी या चौघांच्या तुलनेत तिची भूमिका छोटी आहे. साऊथ इंडियन मुलीची भूमिका साकारताना तिनं बोलीभाषेच्या लहेजाचा अभ्यास करण्याची गरज होती.



टाईमपास आणि मनोरंजनही

या सिनेमात फारसं बौद्धिक काही नाही. एक घटना घडल्यानंतर ती लपवण्यासाठी जो लपंडाव सुरू होतो त्याची कथा या सिनेमात आहे. फार तर्कवितर्क लावत हा सिनेमा पाहिल्यास काहीच हाती लागणार नाही. याउलट 'डोक्याला शॅाट' न देता पाहिला, तर टाईमपास आणि मनोरंजनही होईल.

..............................................

मराठी चित्रपट : डोक्याला शॅाट

निर्माता : उत्तुंग हितेंद्र ठाकूर

दिग्दर्शक : शिवकुमार पार्थसारथी

कलाकार : सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, रोहित हळदीकर, गणेश पंडित



हेही वाचा -

परळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण

छोट्या पडद्यावर अवतरणार 'मोलकरीण बाई'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा