Advertisement

Movie Review : स्त्रीनं स्वगृहाचा घेतलेला शोध

हा चित्रपट केवळ मिनीच्या प्रश्नावर आधारित नसून, भारतीय कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा आहे. यात मनोरंजनाचे मसाले नासले तरीही जीवनाचं सार मात्र दडलं आहे.

Movie Review : स्त्रीनं स्वगृहाचा घेतलेला शोध
SHARES

व्यावसायिक क्षेत्रात आज जरी स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं वाटचाल करत असली, तरी संसारात मात्र ती पुरुषांच्या दोन पावलं मागेच असल्याचं दिसतं. आजही काही सुशिक्षीत स्त्रियांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या पतीच्याच्या हाती असल्याचं चित्र पहायला मिळतं. मुलगी लग्न करून सासरी जाते, पण तिथं नवऱ्यासोबत काही मतभेद झाले तर तिनं नेमकं कुठं जायचं? तिचं आपलं असलं स्वत:चं घर नेमकं कोणतं? कारण ज्या घरी जन्म घेतला, बालपण गेलं ते माहेरही स्त्रीला लग्न झाल्यानंतर परकं वाटू लागतं. अशा परिस्थितीत स्त्रीनं जायचं तरी कोणत्या घरात? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुकथनकर यांनी घेतला आहे.

या चित्रपटाची कथा केवळ एक-दोन व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेली नसून, ज्या ज्या व्यक्तिरेखा या चित्रपटात आहेत त्या प्रत्येकाचा घराबाबतचा आणि संसाराविषयीचा विचार यात मांडला आहे. जवळजवळ चार पिढ्यांमधील स्त्रीया आणि मुलींच्या मनातील घराबाबतचं चित्र यात रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं हा चित्रपट म्हणजे केवळ स्त्रीचं घर नेमकं कोणतं? या प्रश्नाभोवती केलेली विविध प्रसंगांची मांडणी नाही. यात कुठेही उपदेशाचे डोस पाजण्याचाही प्रयत्न केलेला नाही. दिग्दर्शकांनी आपल्या मनातील विचार पडद्यावर चितारले असून, पाहणाऱ्यानं आपल्या परीनं त्याचा अर्थ लावून अंतर्मुख होऊन उपस्थित प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधायची आहेत.

या चित्रपटाची सुरुवातच काहीशा गंभीर दृश्यानं होते. उदास चेहऱ्यानं बसलेल्या डॅा. सौदामिनी उर्फ मिनीच्या (मृणाल कुलकर्णी) घराची बेल वाजते आणि ती भानावर येते. त्यानंतर ती बॅगा भरते आणि स्मृतीभंश झालेली सासू माईला (सेवा चौहान) घेऊन माहेर गाठते. मिनीचे वडील (डॅा. मोहन आगाशे), आई (उत्तरा बावरक), लहान बहिण मधुमती (स्पृहा जोशी) यांना प्रथम काहीच कळत नाही. मिनीची मुलगी कुकीही (प्रांजली श्रीकांत)तिथेच असते. मिनीचे आपल्या पतीशी काहीतरी मतभेद झाले असून, ती सासर सोडून कायमची माहेरी आल्याचं नंतर सर्वांना समजतं. बारा वर्षे पतीसोबत संसार केल्यानंतर कायमची माहेरी परतलेल्या मिनीच्या मनात त्यानंतर प्रश्नांचं काहूर माजतं. आता हे घर आपलं आहे का? या प्रश्नानं तिच्या मनाची घालमेल सुरू होते. त्यानंतर तिचा स्वगृहाचा शोध सुरू होतो. त्याचा प्रवास या चित्रपटात आहे.

भावे-सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींचे चित्रपट खूप वैचारीक असतात. मराठी प्रेक्षक सुजाण आहेत याची जाण ठेवून स्पून फिडींग करण्याऐवजी ही जोडी प्रसंग, घटना आणि संवाद यांवर भर देत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असते. 'वेलकम होम' या चित्रपटाची कथाही त्यांनी अशाच प्रकारे सादर केली आहे. सुमित्रा भावेंनी ही कथा जवळजवळ दहा वर्षांपूर्वी लिहिली होती, पण ती २०१९ मध्ये जरी प्रेक्षकांसमोर येत असली तरी त्यातील ताजेपणा आजही कायम आहे. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही हेच यातून जाणवतं. सुमित्रा भावेंनी लिहिलेले संवाद प्रसंगानुरूप तर आहेतच, पण अर्थपूर्णही आहेत.

मिनीनं आपल्या वडीलांना विचारलेला 'आप्पा, मला माझं स्वत:चं असं घरच नाही का?' हा प्रश्न आणि त्यांनी त्यावर दिलेलं 'जेव्हा जिथे आहोत ते आपलं घर' हे उत्तर अतिशय मार्मिक वाटतं. 'प्रत्येकाची सुख-दु:ख ही वेगळी असतात, पण सारखीही असतात. हे जो जाणेल ना, तो आपला' ही आपलेपणाची अनोखी व्याख्याही दिपा श्रीराम यांनी साकारलेल्या ताई मावशीच्या मुखातून ऐकायला मिळते. नवऱ्याचं घर सोडून येताना त्याच्या स्मृतीभंश झालेल्या आईलाही मिनी आपल्या माहेरी घेऊन येते, त्यावर तिच्या वडीलांनी उच्चारलेलं 'ज्याच्याकडे माणुसकी आहे, तो कधीही संन्याशाच्या भूमिकेतून बाहेर येऊ शकत नाही', हे या चित्रपटाच्या अनुषंगानं जीवनाचं सार सांगणारं वाक्य सुवर्णमोलाचं वाटतं.

मिनीला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट चार पिढ्यांतील स्त्रियांचीही गोष्ट सांगतो. यात मिनीच्या शाळकरी मुलीपासून आजच्या युगातील तिची अविवाहित धाकटी बहिण, आई, मावशी, सासू आणि वडीलांच्या आईचाही घराबाबतचा दृष्टिकोन आहे. यासोबतच स्त्री आणि पुरुषाच्या मैत्रीचा पारदर्शक धागाही यात आहे. अखेरीस भारत सोडून बॅास्टनमध्ये गेलेल्या मिनीच्या भावाचा पॅाइंट आॅफ व्ह्यू आणि विचारही आहे, जो मिनीच्या मनातील वादळ शमवण्यास मदत करतो.

मनातील विचारांचा गुंता अत्यंत सुरेखपणे या चित्रपटात सोडवण्यात आला आहे, पण यात मिनीच्या पतीची बाजू दुर्लक्षित केल्यासारखी वाटते. या चित्रपटातील 'राधे राधे...' हे गाणं श्रवणीय आहे. इतर तांत्रिकबाबीही कथानकाला अनुसरून आहेत. रेव्ह पार्टीतील 'या खुदा...' हे गाणं चांगलं झालं असलं, तरी एकूणच तो भाग अनावश्यक वाटतो. याशिवाय इतरही काही प्रसंग वेळ काढणारे तसेच ते नसते तरी कथानकावर काही परिणाम झाला नसता असं वाटणारे आहेत.

लहानसहान भूमिकेसाठी मराठीतील आघाडीचे कलाकार असणं ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. या चित्रपटात एक वेगळ्याच मृणाल कुलकर्णी पहायला मिळतात. त्यांचा नेत्राभिनय मनाला भिडतो. सुरुवातीला मनानं खचलेली आणि नंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणं उंच भरारी घेण्यासाठी खंबीरपणं उभी राहिलेली अशा मिनीच्या दोन परस्परभिन्न मानसिक अवस्था मृणाल यांनी अतिशय सुरेखरीत्या सादर केल्या आहेत.

मित्राच्या भूमिकेत सुमित राघवननं त्यांना तितकीच सुरेख साथ दिली आहे. स्पृहा जोशीनं आजच्या काळातील मुलीचं प्रतिनिधीत्व करणारी मधुमती छान साकारली आहे. सेवा चौहान यांची स्मृतीभंश झालेली माईही चांगली झाली आहे. प्रांजली श्रीकांत या चिमुकलीनंही चांगलं काम केलं आहे. यासोबतच डॅा. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दिपा श्रीराम, सिद्धार्थ मेनन, सारंग साठे यांनीही आपलं काम चोख बजावलं आहे.

हा चित्रपट केवळ मिनीच्या प्रश्नावर आधारित नसून, भारतीय कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा आहे. यात मनोरंजनाचे मसाले नसले तरीही जीवनाचं सार दडल्यानं एकदा तरी पहायला हवा.

.................................

मराठी चित्रपट : वेलकम होम

निर्माते - अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दिपक कुमार भगत

कथा/पटकथा/संवाद - सुमित्रा भावे 

दिग्दर्शन - सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर 

कलाकार - मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, दीपा श्रीराम, सिद्धार्थ मेनन, सारंग साठे, प्रांजली श्रीकांत



हेही वाचा - 

बिग बॉसच्या घरात पाणीबाणी

EXCLUSIVE : … तर ‘टकाटक’साठी मिलिंद चढणार कोर्टाची पायरी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा