Advertisement

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'

'पहिला पाऊस' हा लघुपट शॅार्टकट्टा या युट्युब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये नॅामिनेशन मिळालेल्या या लघुपटानं बरेच पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'
SHARES

कित्येकदा चित्रपट जे काही सांगू शकत नाहीत ते एखादा लघुपट सांगून जातो. मनाला स्पर्शून जाणारं 'पहिला पाऊस' असं शीर्षक असलेला एक लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


स्त्रियांच्या मनातील भावना 

एफटीआयआयमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर सत्यदेव दुबेंच्या सान्निध्यात आल्यावर दोन वर्षे ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहतांच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शनाचे धडे गिरवलेला दिग्दर्शक अनंत अंकुष आता स्त्रियांच्या मनातील भावना व्यक्त करणारा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'वर्तुळ' या आगामी चित्रपटापूर्वी अनंतनं दिग्दर्शित केलेला 'पहिला पाऊस' हा लघुपट शॅार्टकट्टा या युट्युब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये नॅामिनेशन मिळालेल्या या लघुपटानं बरेच पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना अनंतनं 'पहिला पाऊस' केवळ चार वाक्यांवर आधारित असल्याचं सांगत इतरही गोष्टींचा उलगडा केला.


कान्समध्ये नॅामिनेशन 

'पहिला पाऊस' ही शॅार्टफिल्म अनंतनं जवळजवळ सहा महिन्यांपूर्वी बनवली आहे. या चित्रपटानं कान्स चित्रपट महोत्सवामध्ये नॅामिनेशन मिळवण्यासोबतच देश-विदेशातील बऱ्याच शॅार्टफिल्म महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत बऱ्याच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यात मेघा घाडगे मुख्य भूमिकेत आहे. याबाबत अनंत म्हणाला की, १६ मिनिटांच्या या शॅार्टफिल्मसाठी मेघा घाडगेनं बरेच पुरस्कार पटकावले आहेत. सध्याचं वातावरण पावसाचं आहे. अशातच शॅार्टकट्टाच्या माध्यमातून 'पहिला पाऊस' सर्वदूर पोहोचणार असल्यानं खूप आनंद होत आहे. एका वेगळ्या विषयावर बनवलेला लघुपट प्रेक्षकांसमोर येत असल्याचं समाधान वाटतं.


भावनाही बरसू लागतात

या लघुपटाची कथा नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपलीशी वाटावी अशी असल्याचं सांगत अनंत म्हणला की, ही एका अशा स्त्रीची कथा आहे, जिला बालपणापासून गायनाची आवड असते. लग्न जुळवतानाही तिला गाण्याबाबत विचारलं जातं. त्यानंतर मात्र संसाराच्या रहाटगाडग्यात तिचं गाणंच हरवून जातं. एक दिवस अचानक एक घटना घडते आणि मागं वळून पाहताना तिला तिच्या गाण्याची आठवण येते. वर आभाळात नभ दाटून येत असतात आणि तिच्या मनात गायनाची ओढ जागृत होत असते. एकीकडं पहिला पाऊस बरसू लागतो आणि दुसरीकडं तिच्या नेत्रांद्वारे अंतर्मनात दडलेल्या भावनाही बरसू लागतात.


अभिनयाचं अनोखं दर्शन

'पहिला पाऊस'मधील मुख्य व्यक्तिरेखा मेघानं मोठ्या ताकदीनिशी साकारली आहे. नृत्यात पारंगत असलेल्या मेघाच्या अभिनयाचं अनोखं दर्शन या लघुपटामध्ये प्रेक्षकांना घडेल असं सांगत अनंत म्हणाला की, मेघा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. शब्दांविना भावना व्यक्त करण्याची कला तिच्या अंगी आहे. त्या बळावरच तिनं केवळ चार संवाद असलेल्या या लघुपटामध्ये जीव ओतला आहे. प्रत्येक स्त्रीला कोणती ना कोणती कला अवगत असते, पण संसाराचा गाडा ओढताना ती कुठंतरी हरवून जाते. त्या सर्व स्त्रीयांना आणि आपल्या पत्नीची कला जाणणाऱ्या पतींनाही हा लघुपट आपलासा वाटेल.


वर्तुळ प्रदर्शनासाठी सज्ज 

दिग्दर्शनासोबतच 'पहिला पाऊस'चं लेखनही अनंतनंच केलं असून, सिनेमॅटोग्राफी नझीर खान यांनी केली आहे. प्रवीण भोसले यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे, तर संकलन योगेश गोगटे यांचं आहे. अनंतबाबत सांगायचं तर त्यांनं रंगभूमीवर बरंच काम केलं आहे. 'माकडाच्या हाती शॅम्पेन' हे गाजलेलं नाटक सुरुवातीच्या काळात त्यानं दिग्दर्शित केलं होतं. विजय तेंडुलकर लिखित 'झाला अनंत हनुमंत', राजन खान यांच्या कथेवरील 'तिथे संदर्भ नसलेली गोष्ट', 'मूर्खाने सांगितलेली गोष्ट', 'उगवतीचा रंग धुक्याचा' आदी नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. अनंतच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'वर्तुळ' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्याखेरीज दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सवर त्याचं काम सुरू आहे.




हेही वाचा -

बिग बॉस कोण उंचावणार 'मनोरा विजयाचा'?

Movie Review : स्त्रीनं समाजव्यवस्थेशी दिलेला सशक्त लढा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा