Advertisement

What’s up लग्नाची जोरदार तयारी! दुसरं गाणं रिलीज!


What’s up लग्नाची जोरदार तयारी! दुसरं गाणं रिलीज!
SHARES

मराठीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे त्यांच्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरले. म्हणूनच चित्रपटातील कथांबरोबरच त्यांच्या गाण्यांवरही तितकीच मेहनत घेतली जाते. चित्रपटातील गाणी एकदा का क्लिक झाली, की मग चित्रपटही आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. आता ‘What’s up लग्न’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी या चित्रपटातील एक सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे!


गाण्याचे बोल

‘What’s up लग्न’ या चित्रपटातील ‘तुझ्या आठवणींचे गंध सारे आणतो मी, जुन्या इंद्रधनुचे रंग सारे आणतो मी’ हे हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित झालं आहे. व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई जयसिंघानी यांनी ‘What’s up लग्न’ चित्रपटातील या गाण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. याआधी व्हिडिओ पॅलेसच्या दुनियादारी, क्लासमेट, मितवा, हाफ तिकीट या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत.


डान्स प्लसची जोडी सिनेमात

‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअॅलिटी शोमधील पल्लवी शिंपी आणि ऋषभ खडतले ही जोडी या गाण्यासाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली या गाण्यावर ‘सेन्शुअस कंटेम्पररी डान्स स्टाईल’ कोरिओग्राफ केली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे २४ बाय २४ फीट एवढ्या मोठ्या पाण्याच्या सेटवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं अतिशय थंड वातावरणात पल्लवी आणि ऋषभ यांनी हटके अंदाजात सादर केलं आहे. व्हीएफक्स, कॉंस्च्युम्सपासून ते कला दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक गोष्टींचा या गाण्यासाठी बारकाईने विचार केला गेलाय.


१६ मार्चला होणार प्रदर्शित

या गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून ट्रॅाय-आरिफ यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. तर ऋषीकेश रानडे यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यासाठी कसलेल्या आवाजाची गरज लक्षात घेत ऋषीकेश रानडे यांची निवड करण्यात आली. अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. येत्या १६ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा