Advertisement

रावाचा रंक बनवणारा 'पॅटर्न'

मुळशी तालुक्यातील एका गावचा पाटील असलेल्या सखाराम (मोहन जोशी) आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. जमीन विकल्यानंतर अल्पावधीतच पैसे संपल्याने वॅाचमनची नोकरी पत्करावी लागणाऱ्या सखाराम यांना राहुल (ओम भूतकर) हा मुलगा आहे. शिंदे बिल्डरला (अजय पूरकर) वडिलांनी जमीन विकल्याचं त्याला दु:ख आहे

रावाचा रंक बनवणारा 'पॅटर्न'
SHARES

काही चित्रपटांच्या कथा कल्पनाविश्वात रमणाऱ्या असतात, तर काही वास्तव परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या असतात... 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील वास्तव चित्र रेखाटत शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी आहे. बळीराजा म्हणून मिरवणारा शेतकरी जेव्हा आपल्या काळ्या मातीचा सौदा करतो, तेव्हा त्याच्या नशीबी रंक म्हणजेच भिकाऱ्याच्या वाट्याला येणारे भोग येतात. अशा प्रकारची कथा नवीन नसून, यापूर्वीही विविध क्षेत्रांतील सर्वसामान्य व्यक्तींच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे.

शहरीकरणाने ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवत शेत जमिनी गिळंकृत केल्या. कवडीमोल भावाने राजीखुशीने किंवा बळजबरीने त्या जमिनी मिळवल्या आणि त्यावर आयटी पार्क, एमआयडीसी आणि बरंच काही उभारलं. शेतकऱ्याच्या हाती पैसा खेळू लागला. अचानक धनलाभामुळे स्वत:ला सावकार समजणाऱ्या शेतकऱ्याच्या गाठीशी आलेला पैसा कधी संपला आणि तो कधी रावाचा रंक झाला हे त्यालाही समजलं नाही. त्यानंतर त्यांच्या मुलांच्या भविष्य कशा प्रकारे पणाला लागलं त्याची कथा या चित्रपटात आहे.

मुळशी तालुक्यातील एका गावचा पाटील असलेल्या सखाराम (मोहन जोशी) आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. जमीन विकल्यानंतर अल्पावधीतच पैसे संपल्याने वॅाचमनची नोकरी पत्करावी लागणाऱ्या सखाराम यांना राहुल (ओम भूतकर) हा मुलगा आहे. शिंदे बिल्डरला (अजय पूरकर) वडिलांनी जमीन विकल्याचं त्याला दु:ख आहे. गावचा पाटील असून वॅाचमन बनलेल्या वडिलांना पाटीलकी गेली तरी तो पाटील म्हणून हिणवत असतो. शिंदे बिल्डर एक दिवस सखारामचं गहाण पडलेलं घरही जप्त करतो आणि त्यांचं कुटुंब रस्त्यावर येतं. 

एके काळी हिंद केसरी किताब पटकावणाऱ्या सखारामला शहरात येऊन हमाली करावी लागते. सखारामला तिथे त्याला पूर्वीपासून ओळखणारा शिरपा (महेश मांजरेकर) भेटतो. तो देखील मुळशी तालुक्यातीलच असतो. एकीकडे नन्या भाईच्या (प्रवीण तरडे ) गँगमध्ये सामील होऊन राहुल सात-बारा खाली करण्याचं काम करू लागतो, तर दुसरीकडे परगावाहून बदली होऊन शहरात आलेले पोलिस अधिकारी विठ्ठल कडू (उपेंद्र लिमये) वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांचीच आपसात जुंपवून देतो. या सर्व खेळात राहूल मात्र भरकटत जातो आणि एक दु:खद शेवट पहायला मिळतो.

चित्रपटाच्या कथेत नावीन्य नाही. यापूर्वी अशा प्रकारच्या बऱ्याचदा समोर आलेल्या आहेत. 'वास्तव'पासून 'लालबाग परळ'पर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य व्यक्तीचा मुलगा गँगस्टर बनल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटांसोबतच एकांकिका आणि नाटकांमधूनही बऱ्याचदा हा विषय हाताळण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाहापेक्षा वेगळं असं यात काही नाही. चित्रपट सुरू झाल्यानंतर एक फाईट सुरू होते. त्यात पुढे धावणाऱ्या राहुलच्या मागे बरेच गुंड तलवारी आणि कोयते घेऊन त्याला मारण्यासाठी धावत असतात. या भल्या मोठ्या दृश्यादरम्यान टप्प्याटप्प्याने या चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते.

चित्रपट सुरू झाल्यानंतर आवश्यक असलेल्या गतीत पुढे सरकल्याने मध्यंतरापूर्वीपर्यंत पुढे काय घडणार याबाबत काहीशी उत्सुकता वाढते. मध्यंतरानंतरचा भाग काही अवास्तव घटनांच्या समावेशामुळे लांबल्यासारखा वाटतो. उत्कंठावर्धक घटनांच्या अभावामुळे कंटाळवाणा बनतो. काही दृश्यांना कात्री लावण्याची गरज होती. बहिणीचं एका शेठच्या घरी काम करणं आणि त्यालाच जीव लावणं हा मुद्दाही कथेच्या प्रवाहात बाधा आणणारा तसंच इतर बऱ्याच चित्रपटांमध्ये आलेला वाटतो.लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने प्रवीण तरडेने या सर्वांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज होती. 


पहिल्या दृश्यापासून महेश लिमयेचं कॅमेरावर्क मोहून टाकतं. मग ते सुरुवातीचं घारीचं दृश्य असो, वा मार्केट यार्डचं वरून घेतलेलं विहंगम दृश्य... 'खतरनाक...' हे गाणं अर्थपूर्ण असून, ताल धरायला लावणारं आहे. या गाण्यावर उमेश जाधवने कोरिओग्राफी करत प्रवीण तरडेसह इतरांनाही नाचवण्याचं काम केलं आहे.

कलाकारांच्या अभिनयाने या चित्रपटाला अंशत: तारण्याचं काम केलं आहे. विशेषत: प्रत्येक चित्रपटागणिक स्वत:मध्ये सुधारणा करणाऱ्या ओम भूतकरच्या अभिनयाचं कौतुक वाटतं. आजवर बऱ्याच पारितोषिक विजेत्या चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या ओमने या चित्रपटात एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते उन्मत्त झालेला भाई यशस्वीपणे साकारला आहे. एखाद्या भाईसारखी शरीरयष्टी नसली तरी त्याने केलेलं धाडस वाखाणण्याजोगं आहे. भाई साकारतानाची त्याची शैली साऊथच्या रवी तेजासारखी वाटते. 

 उपेंद्र लिमयेने संयतपणे साकारलेला पोलिस अधिकारी लक्ष वेधण्यात यशस्वी होतो. नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या शैलीत उपेंद्रने साकारलेली ही व्यक्तिरेखा दीर्घ काळ स्मरणात राहणारी आहे. मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा वेगळ्या रंगात सखारामचं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. त्यांना सविता मालपेकर यांनी चांगली साथ दिली आहे. महेश मांजरेकरांची भूमिका तितकीशी महत्त्वाची नसली तरी त्यांनी ती प्रामाणिकपणे साकारली आहे. प्रवीण तरडेने साकारलेला नन्या भाईही चांगला आहे. याशिवाय इतर कलाकारांनीही छान काम केलं आहे.


आजच नव्हे तर मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना कशा प्रकारच्या समस्यांना सोमोरं जावं लागत असून त्यांच्या पिढ्या कशा बर्बाद होत आहेत त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. असं असलं तरी नावीन्याचा अभाव असल्याने फार अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल.

......................................

चित्रपट : मुळशी पॅटर्न

निर्माते : अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन लि. आणि पुनीत बालन एन्टरटेनमेंट प्रा. लि. 

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन : प्रविण विठ्ठल तरडे

कलाकार : ओम भूतकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, आर्यन शिंदे



हेही वाचा - 

आयुष्य समृद्ध करणारी 'सायकल' छोट्या पडद्यावर!

उपेंद्रचा अनोखा पोलिसी पॅटर्न




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा