Advertisement

दोन लहानग्यांची गोष्ट सांगणार ‘पिप्सी’


दोन लहानग्यांची गोष्ट सांगणार ‘पिप्सी’
SHARES

राज्य पुरस्कार विजेता ‘रेडू’, राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘रिंगण’, ‘वजनदार’, ‘गच्ची’ असे विविधांगी विषयांवरील सिनेमे देणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.


काय आहे पोस्टरवर?

विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाच्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि मुलगी दिसते. ग्रामीण भागातील या सिनेमाचं कथानक दोन लहानग्यांच्या मैत्रीवर आधारित असल्याचा अंदाज 'पिप्सी'चं पोस्टर पाहिल्यावर येतो. यावर्षीच्या राज्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष मोहोर उमटवणारा हा सिनेमा २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


मैथली, सर्वोत्कृष्ट बालकलाकार

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरमध्ये देखील ते दिसले होते. विशेष म्हणजे, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या सिनेमात लहान मुलांची निरागसता टिपण्यात आली असून, वास्तविक आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींमधून त्यांनी काढलेला निष्कर्ष पाहायला मिळणार आहे.


या महोत्सवात सिनेमाची निवड

राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा सिनेमा आपली विशेष छाप पाडत आहे. २०१८ मधील एन. आय. टी. टी. ई. या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली होती.


या महोत्सवात 'पिप्सी'चा समावेश

आगामी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'पिप्सी' चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी महोत्सवात आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बाल आणि तरुण वर्गासाठी देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या यादीतही 'पिप्सी' चित्रपटाने स्थान मिळवलं होतं. अशाप्रकारे एक वेगळा विषय घेऊन सर्वत्र आपली मोहोर उमटवणारा हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा