Advertisement

कसा आहे 'व्हॉट्सअॅप लग्न'? नुसतं नावावर जाऊ नका हो!

चित्रपटाचं वेगळं नाव पाहून नेहमीचाच विषय जरी असला, तरी काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशा आशेनं प्रेक्षक सिनेमागृहात जातो. मात्र, मध्यंतरानंतर चित्रपट पुन्हा त्याच जुन्या वळणार जातो आणि प्रेक्षक कंटाळतो. त्या दोघांची करिअर आणि संसार यावरून होणारी तीच टिपिकल भांडणं, त्यावर घरातल्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने त्यांना दिलेला 'अनुभवी' सल्ला या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे जुन्याच बाटलीत जुनीच दारू असं काहीसं प्रेक्षकांचं होतं.

कसा आहे 'व्हॉट्सअॅप लग्न'? नुसतं नावावर जाऊ नका हो!
SHARES

मुलगा किंवा मुलगी पंचविशी पार झाले, की घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होतो. शिवाय घरातल्यांपेक्षा त्यांच्या लग्नाची काळजी ही त्यांच्या नातेवाईकांनाचा जास्त! सध्याच्या करिअर ओरिएंटेड जगात मुलं लग्नाला फारसं महत्त्व देत नाहीत. मग अशा मुलांच्या बाबतीत लग्नाआधी आणि लग्नानंतर घडणाऱ्या गोष्टी. आपल्यापैकी बहुतेक जणांना हा स्टोरी तोंडपाठ असावी. 'व्हॉट्सअॅप लग्न' हे नाव जरी वेगळं असलं, तरी यामध्ये हाच चाऊन चोथा झालेला विषय पुन्हा हाताळण्यात आला आहे. 

आकाश (वैभव तत्ववादी) हा आयटीत काम करणारा तर अनन्या (प्रार्थना बेहेरे) ही नाटकात काम करणारी अभिनेत्री. या दोघांची ही लव्ह कम लग्नस्टोरी! हे दोघही आपापल्या कामानिमित्ताने मुंबईत एकटेच राहात असतात. सगळ्यांच्या घरात असते तशीच परिस्थिती त्यांच्याही घरात. दोघांच्याही घरातले लग्नासाठी त्यांच्या मागे लागतात. एकेदिवशी अपघातानेच झालेली आकाश आणि अनन्याची भेट शेवटी लग्नापर्यंत जाते. पण दोघेही करिअर ओरीएंटेड असतात. त्यामुळे करिअरपुढे नातं टिकवताना होणारी कसरत, येणारे अनुभव आणि घडणाऱ्या गोष्टी यावर भाष्य करणारा हा चित्रपट.



चित्रपटाचं वेगळं नाव पाहून नेहमीचाच विषय जरी असला, तरी काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशा आशेनं प्रेक्षक सिनेमागृहात जातो. मात्र, मध्यंतरानंतर चित्रपट पुन्हा त्याच जुन्या वळणार जातो आणि प्रेक्षक कंटाळतो. त्या दोघांची करिअर आणि संसार यावरून होणारी तीच टिपिकल भांडणं, त्यावर घरातल्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने त्यांना दिलेला 'अनुभवी' सल्ला या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे जुन्याच बाटलीत जुनीच दारू असं काहीसं प्रेक्षकांचं होतं.

चित्रपटाच्या सुरुवातीला वैभव अतिशय परफेक्ट दाखवला आहे. सर्व काही परफेक्ट. साधी अंथरूणाला पडलेली घडीही त्याला खटकते. आणि प्रार्थनाचा स्वभाव वैभवच्या अगदी विरूद्ध. मात्र, हे फक्त सुरूवातीलाच. पुढे संपूर्ण चित्रपटात याचा उल्लेखच नाही. त्यामुळे थेट शेवटच्या अर्ध्या तासामध्ये या दोघांच्या भांडणात त्यांच्यातले हे मतभेद अचानक उगवल्यासारखे समोर येतात.



दिग्दर्शक म्हणून विश्वास जोशी यांचा हा पहिलाच चित्रपट. जुन्याच विषयाला पुन्हा मांडण्याचं धाडस आणि आव्हान त्यांनी पेललं. त्यांच्या परीने त्याच रटाळ कथानकाला पुरेसा न्याय देण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. मात्र, कथेतच दम नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

चित्रपटात कलाकारांचा पुरेसा वापर विश्वास जोशींना करून घेता आला नसल्याचं स्पष्टपणे जाणवतं. वैभव आणि प्रार्थना बरोबरच चित्रपटात वंदना गुप्ते, विक्रम गोखले, विद्याधर जोशी, इला भाटे, स्नेहा रायकर यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. मात्र वैभव आणि प्रार्थना सोडले तर या कोणत्याच कलाकराला चित्रपटात फारसा वाव असल्याचं दिसत नाही.



वैभव आणि प्रार्थना यांच्या अभिनयाच्या व्यतिरिक्त चित्रपटातली गाणी हीच काय  ती एकमेव जमेची बाजू. 'व्हॉट्सअप लग्न'मधली तिनही गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्यातही 'फुंकरीची वादळे ही' हे गाणं तर कमाल जुळून आलंय! या गाण्यातून त्या दोघांची मैत्री आणि मैत्रीतून झालेलं प्रेम थेट जाऊन भिडतं.


 


'व्हॉट्सअॅप लग्न' या चित्रपटातले आकाश आणि अनन्या हे दोन्ही पात्र आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करतात. मात्र, ते सादर करत असलेली कथा मात्र आजच्या पिढीसोबतच मागच्या पिढीनेही घोकून घोकून तोंडपाठ केली आहे. त्यामुळे दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं, तर पंखे प्रत्येक घरात फिरतात, पण बाजूच्या घरात फिरणारा पंखा आपल्या घरातल्या पंख्यापेक्षा कसा वेगळा फिरतो, हे पाहण्याची उत्सुकता असेल, तर या 'व्हॉट्सअॅप'वर लॉग इन करायला हरकत नाही. म्हणजे, चित्रपटगृहात जायला हरकत नाही हो!



Movie - Whatsapp Lagna

Actors - Vaibhav Tatwawaadi, Prarthana Behere, Vikram Gokhle, Vandana Gupte, Ila Bhate

Ratings - 2.5/5



हेही वाचा

‘शिकारी’च्या टीजरमध्ये नेहा खानचा बोल्ड अंदाज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा