Advertisement

'आयला आयला सचिन...' म्हणत आला स्वप्नील

स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेला 'मी पण सचिन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील आपल्या व्यक्तिरेखेच्या आधारे एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशनल साँग नुकतंच चित्रित करण्यात आलं आहे.

'आयला आयला सचिन...' म्हणत आला स्वप्नील
SHARES

'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर स्वप्नील जोशी आता 'आयला, आयला सचिन...' म्हणत पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.


मी पण सचिन

स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेला 'मी पण सचिन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील आपल्या व्यक्तिरेखेच्या आधारे एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशनल साँग नुकतंच चित्रित करण्यात आलं आहे. 'आयला आयला सचिन...' असे या गाण्याचे बोल असून, सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणं एक पर्वणीच ठरणार आहे. 


प्रियदर्शन जाधवची धमाल

या गाण्यामध्ये स्वप्नीलचा धडाकेबाज परफॅार्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, त्याच्या जोडीला प्रियदर्शन जाधवची धमालही आहे. एका खेडेगावातील बाजारात हे गाणं चित्रित झालं आहे. बाजार म्हटला की डोळ्यांसमोर येतात ते भाजीवाले, बॅण्डवाले, वासुदेव, लहान मुलं आणि बरंच काही... या सर्वांसह सचिनचं भव्य पोस्टरही या गाण्यात झळकताना दिसतं. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरीत उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.


आयुष्यावर भाष्य

'आयला आयला सचिन...' हे गाणं त्रिनीती ब्रदर्स म्हणजेच हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर  यांनी संगीतबद्ध केलं असून, आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. सुजित कुमार यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्याबाबत स्वप्नील म्हणाला की, हा चित्रपट फक्त क्रिकेटवर आधारित नसून, आयुष्यावरही वेगळ्या अंगाने भाष्य करणारा आहे. कारण आयुष्य आणि क्रिकेटमध्ये खूप साम्य असतं. क्रिकेटप्रमाणेच आयुष्यामध्ये पुढच्या क्षणाला काय होईल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नसल्याचं स्वप्नीलचं म्हणणं आहे.


मास्टर ब्लास्टरला ट्रिब्युट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना या गाण्याद्वारे ट्रिब्युट देणार असून, त्यामुळेच हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवल्याचं चित्रपटाचा निर्माता श्रेयस जाधव म्हणाला. मराठीमध्ये रॅपर म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या निर्माता श्रेयस जाधवनेच या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. 'मी पण सचिन' हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्याची योजना श्रेयसने आखली आहे.



हेही वाचा - 

तिहेरी भूमिकेत झळकणार डाॅ. अमोल कोल्हे

रणवीर असाच आहे... 'पक्का ड्रामेबाज'




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा