Advertisement

तिहेरी भूमिकेत झळकणार डाॅ. अमोल कोल्हे

आध्यात्मिक चित्रपट बनवणं आणि त्यात काम करणं हे खूप मोठं आव्हान असल्याचं सांगत अमोल म्हणाला की, या चित्रपटात तिहेरी भूमिका साकारायला मिळणं हा माझ्यासाठी प्लस पॅाइंट होताच, पण घनश्याम येडेंसारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीने जीवनाचं अलौकीक तत्त्वज्ञान जगाला सांगणाऱ्या नवनाथांसारख्या महान संतांवर चित्रपट बनवण्याचं धाडस दाखवणं ही गोष्ट जास्त आवडली.

तिहेरी भूमिकेत झळकणार डाॅ. अमोल कोल्हे
SHARES

डाॅ. अमोल कोल्हे हे नाव एव्हाना हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महापुरुषाशी एकरूप झालं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराज साकारल्यानंतर सध्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारा अभिनेता डाॅ. अमोल कोल्हे प्रथमच तिहेरी भूमिकेत झळकणार आहे.


३ व्यक्तिरेखा

आजवर बऱ्याचदा ऐतिहासिक भूमिकांमध्ये दिसलेला अमोल 'बोला अलखनिरंजन' या चित्रपटात ३ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक ह. भ. प. घनश्याम येडे यांनी नवनाथांची महती वर्णन केली आहे. नवनाथांपैकी मुख्य असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या भूमिकेसोबतच अमोलने या चित्रपटात विश्वास आणि राजा या व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत. या निमित्ताने अमोल आपल्या चाहत्यांना तीन वेगवेगळ्या काळातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून भेटणार आहे.


मच्छिंद्रनाथांची भूमिका

चित्रटातील या भूमिकांबाबत अमोल म्हणाला की, ''या चित्रपटाची संकल्पना खूप छान आहेच, परंतु तो निर्माण करण्यामागील भावना मनाला खूप भावल्याने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज साकारले आहेत, परंतु या चित्रपटात वारकरी सांप्रदायाचा पाया असलेल्या मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारण्याचं सौभाग्य लाभलं. इतकंच नव्हे तर आजच्या काळातील इंजिनीयर विश्वासची भूमिकाही मी यात साकारली आहे. याशिवाय यात पुराण काळातील राजाही मीच आहे. त्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने माझ्यासाठी 'बोला अलखनिरंजन' असं म्हणायला लावणारा'' असल्याचंही अमोल म्हणाला.


आध्यात्मिक चित्रपट मोठं आव्हान

आध्यात्मिक चित्रपट बनवणं आणि त्यात काम करणं हे खूप मोठं आव्हान असल्याचं सांगत अमोल म्हणाला की, या चित्रपटात तिहेरी भूमिका साकारायला मिळणं हा माझ्यासाठी प्लस पॅाइंट होताच, पण घनश्याम येडेंसारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीने जीवनाचं अलौकीक तत्त्वज्ञान जगाला सांगणाऱ्या नवनाथांसारख्या महान संतांवर चित्रपट बनवण्याचं धाडस दाखवणं ही गोष्ट जास्त आवडली.

खरं तर अशा प्रकारचे चित्रपट बनवणं हे मोठं जिकीरीचं काम असतं. येडे यांनी प्रचंड जिद्दीच्या बळावर 'बोला अलखनिरंजन' हा चित्रपट बनवला असून, २८ डिसेंबर रोजी 'सब दु:ख भंजन' असं म्हणत तो प्रदर्शित होत असल्याचा विशेष आनंद आहे, असंही अमोल म्हणाला.


'यांच्या'ही भूमिका

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ह. भ. प. घनश्याम येडे यांनी केलं आहे. लेखन, गीतलेखन, निर्मितीच्या जोडीला येडे यांनीच मातृपितृ फिल्म्सच्या बॅनरखाली राहुल हक्सर यांच्या साथीने या चित्रपटाच्या वितरणाचीही जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय येडे यांनी या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिकाही साकारली आहे. याखेरीज सिया पाटील, दीपक शिर्के, प्रफुल्ल सामंत, नागेश भोसले आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. विशाल बोरुळकर यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, छायांकन सरफराज खान यांचं आहे.



हेही वाचा-

'या' मराठी चित्रपटात दिसणार दलिप ताहिल

'शौर्य' आणि 'सेवे'ची अपूर्व भेट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर आमटे दाम्पत्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा