Advertisement

'शौर्य' आणि 'सेवे'ची अपूर्व भेट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर आमटे दाम्पत्य


'शौर्य' आणि 'सेवे'ची अपूर्व भेट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर आमटे दाम्पत्य
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या हिंदवी स्वराज्यातील नवनवीन पैलू उलगडणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका नेहमीच काही ना काही अप्रकाशित वास्तव दाखवण्याच्या प्रयत्नात असते. भूतकाळात दडलेल्या इतिहासावर प्रकाशझोत टाकत एका मागोमाग एक वेगवेगळे पैलू उलगडण्याचं काम करत आहे. पुन्हा एकदा ही मालिका एका नव्या वळणावर उभी ठाकली असून, या निमित्ताने शौर्य आणि सेवेची अपूर्व भेट घडून आली आहे.


अद्भुत संगम

'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये शिवपर्वाची अखेर होऊन शंभूयुगाची सुरुवात होत असताना, एक सुखद घटना मालिकेच्या सेटवर घडली. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी लोकसेवेकरीता समर्पित केलं ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे या सेवाव्रती दाम्पत्याने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेच्या सेटवर कलाकारांना सदिच्छा भेट दिली आणि उपस्थितांना शौर्य आणि सेवेचा अद्भुत संगम घडल्याचं पाहायला मिळालं.


माणसात देव शोधा

या भेटीदरम्यान आमटे दाम्पत्याने कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. लोकबिरादरी प्रकल्पातील जुन्या आठवणींना उजाळा देत वन्यप्राणी आणि माणसांमध्ये जुळून आलेले भावबंध त्यांनी उलगडले. 'दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा आणि त्याची सेवा करा', असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 'स्वतःची ओंजळ भरल्यानंतर, दुसऱ्याची ओंजळ भरण्यासाठी आपल्या ओंजळीतलं दुसऱ्याला देऊ करणाऱ्या या दोन व्यक्तिमत्वांनी सेटवर येऊन कलाकारांशी संवाद साधल्याने आमचा दिवस अविस्मरणीय ठरल्याची भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.


खरा इतिहास लोकांसमोर

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचा भव्य सेट पाहून साक्षात शिवकाळात गेल्यासारखं वाटल्याचं मत मंदाताईंनी व्यक्त केलं. ही मालिका संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणत असल्याचंही म्हणत डॉ. प्रकाश आमटे यांनी कलाकार आणि तंत्रज्ञांचं कौतुक केलं. आमटे दाम्पत्याने दिलेल्या या मौल्यवान आशीर्वादाने मालिकेतील सर्व कलाकार-तंत्रज्ञ भारावून गेले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना नवउर्जा मिळाली आहे.



हेही वाचा - 

अर्शदला लागले वेब सिरीजचे वेध!

रणवीरच्या अमृतमयी शुभेच्छा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा