Advertisement

एका सामाजिक व्यंगाची व्हायरल कथा!


एका सामाजिक व्यंगाची व्हायरल कथा!
SHARES

अवघ्या तीन-चार दिवसांत ऑक्सिजनअभावी 60 बालकांचा अंत होतो आणि त्यात 36 अर्भके...कारण काय तर, बिलाचे पैसे न भरल्यामुळे प्राणवायूचा पुरवठा बंद केला जातो...


घटना उत्तरप्रदेशातली...

पण, `मुंबई लाइव्ह`चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी बातम्यांच्या सीमेचे पाश तोडत या घटनेमुळे त्यांच्या मनातली अस्वस्थता व्यंगचित्रातून मांडली आणि `मुंबई लाइव्ह`च्या या व्यंगचित्राला देशभर नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला.

तसं तर `मुंबई लाइव्ह`चा उद्देश हा फक्त मुंबईच्याच बातम्या देणं हा असला तरी म्हापसेकरांसारख्या सर्जनशील व्यंगचित्रकारास आम्ही मुद्दामहून खुले आकाश दिले आहे आणि त्यातूनच त्यांचे हे व्यंग सरकारी पातळीपासून समाजात चर्चेचा विषय ठरले.

`निरुत्तर प्रदेश` या समर्पक शीर्षकाद्वारे सोशल मीडियातून जगभर पोहोचलेले हे व्यंगचित्र सध्याच्या राजकारणाची पातळी दाखवते. त्या चित्रावर येणाऱ्या प्रतिक्रियाही राजकारण कोणत्या स्तरावर जातेय याच्याच निदर्शक ठरत आहेत. म्हणजे, अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचे तर या व्यंगचित्रातून `मुंबई लाइव्ह`च्या प्रदीप म्हापसेकरांनी एकप्रकारे संपादकीय प्रतिक्रियाच व्यक्त केली होती.

घटना उत्तरप्रदेशातली असली तरी प्रदीप म्हापसेकरांनी त्यांच्या कुंचल्यातून या घटनेला जागतिक पातळीवर पोहोचवले आणि राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हेही यानिमित्ताने दाखवून दिले. `मुंबई लाइव्ह`ची ओळख बनलेल्या म्हापसेकरांच्या व्यंगचित्रांची धार यावेळी अधिक तीव्रपणे जाणवली. मुंबईच्या सीमा ओलांडत तमाम भारतीयांच्या भावनांना वाट करून देत या व्यंगचित्राने भाषा, धर्म, जातींच्या पलिकडे कसे जाता येते, याचाच दाखला यानिमित्ताने दिला.

सोशल मीडियावर अनेक जणांकडून हे व्यंगचित्र फॉरवर्ड करताना `मुंबई लाइव्ह` तसेच प्रदीप म्हापसेकरांचा उल्लेख होत नाही, असेही जाणवले. परंतु, आम्हाला त्याचे दुःख नाही. उलट, व्यंगचित्र इतिहास घडवू शकते हे यापूर्वी मार्मिकद्वारे बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिलेच होते. आज तोच कित्ता म्हापसेकर `मुंबई लाइव्ह`च्या माध्यमातून गिरवत आहेत, असेच अभिमानाने म्हणावेसे वाटते.

एका दिवसात अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचलेले हे व्यंगचित्र 3 हजारांवर लोकांनी शेअर केले यातूनच भाषेवरून भांडणाऱ्यांना योग्य तो मेसेज मिळाला असावा, असे आम्ही मानतो. त्याचवेळी अनेकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातूनही या चित्रावर कॉमेंट, चर्चा केली. काहींनी प्रेमळ भाषेत दम देण्यापासून विरोधाचे राजकारण करण्याचाही प्रयत्न केला. फ्रान्सच्या शार्ली हेब्दोची आठवणही काहींनी चक्क फोनवरून करून दिली.

अर्थात, `मुंबई लाइव्ह`ची स्थापनाच मुळात लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झाली असल्याने आम्ही या प्रेमळ सल्ल्यांचा आदर करत त्याकडे दुर्लक्षच केले.

खरंतर, या चित्राद्वारे सत्ताधाऱ्यांनी नक्की काय करायला हवे? हे समजून घेऊन बदल करावा हे अपेक्षित होते. पण, ते होण्यापेक्षा या प्रश्नाचे राजकारणच अधिक झाले. पंतप्रधानांनीही ट्विटींगनंतर लाल किल्ल्यावरील भाषणात या प्रकरणाचा ओझरता उल्लेख केला. त्यामुळे, लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे म्हणवणाऱ्या मीडियाची अजूनही दखल घेतली जातेय, हेही लक्षात आलं. असो, `मुंबई लाइव्ह`कडून यापुढेही व्यंगचित्र, बातम्या, लेखांच्या माध्यमातून जनतेचे विशेषतः मुंबईचे प्रश्न समोर आणण्याचे काम सुरूच राहील, भले कोणी शार्ली हेब्दोची आठवण करून दिली तरीही !



डाऊनलोड कराMumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा