Advertisement

टारझन द 'आप ' मॅन ...!

महाराज आपण मुख्यमंत्री आहात. आंदोलक बालक नाहीत. जरा कचेरीतही बसा. लोकांना अधून मधून भेटा. बघावं तेव्हा टारझन सारखे या उपोषणावरून त्या उपोषणावर उड्या मारत असता. बर प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं उपोषण व्हाया धरणं संपलं की त्यांची प्रकृती बिघडते.

टारझन द 'आप ' मॅन ...!
SHARES

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेमके आहेत, तरी कोण हे ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. फार पूर्वी ते सरकारी अधिकारी होते. मग ते आंदोलक झाले. पुढे उपोषणकर्ते झाले. मग पुन्हा धरणे धरायला लागले. त्यामधल्या काळात ते खोकलाकर्तेही होते. मग अचानक अॅसिडिटीकार झाले. फार पूर्वी ते मफलरकार होते. ४-६ महिन्यांपूर्वी ते जेटलींच्या कृपेने कोर्ट कचेरीकार झाले. मग माफिकार झाले. कधी वेळ मिळाला की ते ऑफिसकार होतात.

म्हणजे कधीमधी ऑफिसातही जात. असे ते बरेच कार आहेत. कार वरून आठवले. ते सम आणि विषमकारही आहेत. म्हणजे ट्रॅफिक आणि प्रदूषणामुळे दिल्लीत प्रथमच गाड्या त्यांनी सम आणि विषम दिवशी रस्त्यावर आणायचा वेगळाच प्रयोग केला होता. कार वरून ते भविष्यात कारसेवकही होतील भरवसा नाही.


अरविंद केजरीवाल यांना कुणीतरी सतत सांगायला हवं की महाराज आपण मुख्यमंत्री आहात. आंदोलक बालक नाहीत. जरा कचेरीतही बसा. लोकांना अधून मधून भेटा. बघावं तेव्हा टारझन सारखे या उपोषणावरून त्या उपोषणावर उड्या मारत असता. बर प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं उपोषण व्हाया धरणं संपलं की त्यांची प्रकृती बिघडते. मग ते लागलीच केरळ नाहीतर बंगळुरूला पाळतात. त्यांना पत्रकारांचीही अॅलर्जी असावी. जवळपास कुणी पत्रकार फिरकलाकी त्यांना खोकल्याची ढास लागते. मग हे पत्रकारांना ‘ खो ‘ देतात. काय ‘कला’ आहे ! असो



दिल्ली हा भारताचा राजकीय केंद्रबिंदू आहे. पण या केंद्रबिंदूत दोन किंतू आयमिन बिंदू आहेत. एक मोदी नि दुसरे केजरीवाल. हे केजरीवाल उठसूट केंद्रातूनच केंद्रात म्हणजे मोदींवर टीका करत असतात. या टीकेच्या नादात केजरीवालांचे केंद्रातून विकेंद्रीकरण न होवो. बरे ते भाजपवाले यांचे आमदार कधी फोडतील याचाही भरवसा नाही. भाजपवाले इनकमिंग मध्ये किंग आहेत. तसे काही झाले तर केजरीवाल जंतर मंतरमध्ये उपोषणाला बसतील. म्हणून काही त्यांची त्या 'मंतर'वाल्यांपासून सुटका होईलच असं नाही.



गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी नायब राज्यपाल यांच्या घरातच धरणं धरलं ना. एक नाही दोन नाही चक्क ९ दिवस धरणे धरले. आम्ही केजरीवाल आणि मंडळींचे फोटो पेपरात पहिले, केजरीवाल, सिसोदिया आणि इतर ४-६ त्यांचे साथीदार राज्यपालांच्या घरात मस्तपैकी झोपलेले. कोचावर, गुबगुबीत गाद्यांवर छान पैकी ताणून दिलेले. आम्हाला कुणी असल्या आंदोलनला बोलावत नाही. गादी बिदी काही नसेल तरी चालेल. आम्ही जमिनीवरच ताणून देऊ. तर मंडळी चार दिवसांनी सिसोदिया आजारी पडले.



अफसोस त्यांना हा सोस परवडला नसावा. पण हे प्रकरण नेहमीसारखे केजरीवालांच्या अंगाशी आलं. कोर्टाने चांगलंच झापलं त्यांना. म्हणजे बघा झोपलेल्याना झापलं. कोर्ट म्हणाले तुम्ही कुणाच्या घरात कसं काय धरणं धरू शकता. मी केजरीवाल यांना पुढल्या खेपेस धरणं धारण्यासाठी महाराष्ट्रात आमंत्रित करतो. इथं या नि धरणातच धरणं धरा. नाहीतरी काही धरणं रिकामीच असतात.

अरविंद केजरीवाल यांनी आता हे धरणं बिरणं सोडून आत्मचिंतन करायला हवं. नाहीतरी ते सतत शून्यातच पाहत असतात. साहेब जरा लोकांकडेही पहा ना. त्यांनी तुम्हाला दोनदा संधी दिलीय. दुसऱ्यांदा तुम्हाला मुख्यमंत्री केलय. अलीकडे तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असल्याच्या बातम्या येताहेत. तुम्हाला म्हणून सांगतोय, हे लोक म्हणजे जनता बाहेरून दिसायला गोड वाटलं. पण कधी तुम्हाला ते केंद्राबाहेर फेकतील भरवसा नाही. मग उरलेलं आयुष्य कुठल्यातरी अध्यात्मिक केंद्रावर कायमचं काढावं लागेल.



हेही वाचा-

मला न मिळालेली चौथी सीट!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा