SHARE

भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मातोश्रीला भेट देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अाहे. मात्र, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं अाहे. आज जागतिक पर्यावरण दिन असून या दिनी राजकीय प्रदूषण नको असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं अाहे.


अमित शहा अाणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बुधवारी चर्चा होणार अाहे. त्यामुळे त्यावर बोलणं अाता योग्य ठरणार नसल्याचं अादित्य यांनी सांगितलं. पर्यावरण संवर्धनाचा संदेश तसेच प्लास्टिक बाटल्यांचं विघटन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.


पक्षासाठी झोकून काम करतील

यावेळी अादित्य म्हणाले, ग्लोबल वार्मिंग आणि वातावरणातील बदल ही जगासमोर मोठी समस्या असून पर्यावरण टिकलं तरच आपण टिकू आणि भविष्यात राजकारणासाठी जगू. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या राजीनाम्याविषयी ते म्हणाले, सावंत यांनी राजीनामा दिला असून ते आता पक्षासाठी झोकून काम करतील. यावेळी देसाई म्हणाले, प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनातील एक टक्का रक्कम विघटन, प्लास्टिक वेचणाऱ्यांसाठी खर्च करावा. याचा फायदा प्लास्टिक गोळा करणार्यांना होईल. तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.


रोज १२०० टन प्लास्टिक तयार

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने पर्यावरण संवर्धानासाठी राज्यात प्लास्टिक बंदी केली असली तरी त्याची प्रत्यक्षात अमंलबजावणी होत नाही. राज्यात दररोज बाराशे टन प्लास्टिक तयार होतं. परंतु त्याचं विघटन होण्याचं प्रमाण कमी आहे. प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


गुजरातमधून राज्यात प्लास्टिक

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी असताना गुजरातमधून राज्यात प्लास्टिक दाखल होत असल्याबद्दल कदम यांनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यापाऱ्यांच्या बाटल्या पकडल्या त्याच व्यापाऱ्यांनी प्लास्टिकबंदीविरोधात कोर्टात धाव घेतल्याची धक्कादायक माहिती कदम यांनी यावेळी दिली.


पाण्याच्या बोगस कंपन्या

प्लास्टिकचे प्रदूषण पर्यावरणासाठी हानीकारक असून त्याचा पुनर्वापर करण्यावर उत्पादक कंपन्यांनी भर द्यावा. सध्या राज्यात १२० कंपन्या पाणी विकतात. अनेकांचे पाणी प्रदूषित असते. दर्जेदार कंपन्यांच्या नावाखाली बोगस कंपन्या कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही- शरद पवार

अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यता


संबंधित विषय
ताज्या बातम्या