वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मताधिक्याने विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला.
आदित्य ठाकरे यांना ८२ हजार ५३६ मतं मिळाली. सुरेश माने यांना १९ हजार ८४२ मतं तर अपक्ष अभिजीत बिचुकले यांना ७३५ मतं मिळाली. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून आदित्य यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राहिली आहे. ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. संपूर्ण राज्याचं लक्ष वरळी मतदारसंघाकडं लागलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहीर यांचा पराभव केला होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच सचिन अहीर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आदित्य यांचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे या मतदारसंघातून आदित्य यांना फारसं तगडं आव्हान नव्हतं.