मरिन ड्राइव्ह - काँग्रेस आणि भाजप सरकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 2014 साली सत्ताबदल झाला, तेव्हा आपले सरकार आले असे वाटले होते. पण गेल्या दोन वर्षात हवा तो बदल झालेला नाही. अगोदरच्या नालायक सरकार आणि या सरकारमध्येकाही फरक वाटत नाही. त्यामुळेच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे, असा घणाघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला.
मरीन ड्राईव्ह जिमखाना येथे युवासेनेने काढलेल्या 'केजी टू पीजी' महामोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आ. नीलम गोऱ्हे व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, 'आपण डिजिटल इंडिया म्हणतोय तर शिक्षण खात्याची हेल्पलाइन आणि व्हाट्सअँप नंबर आणि वेबसाईट तयार व्हायला हवी. सरकारला 2 वर्षे झाली. आता लोक आम्हाला विचारत आहेत की शिक्षणाचे अच्छे दिन कधी येणार, माझा कोणा एका व्यक्तीवर रोख नाही. राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांना अजून ११वी अॅडमिशन मिळालेले नाही'.
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विनोद तावडेंनाही ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिले. 'मला बाळासाहेबांनी नेतृत्वाची तलवार दिली आहे. कुणासाठी नेतृत्व सिद्ध करण्याची गरज नाही', असे आदित्य ठाकरे म्हणाले. गिरगाव ते मरीन ड्राईव्ह मार्गावरील महामोर्चात मोठ्या संख्येने विदयार्थी आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक सहभागी झाले होते.