मुंबई - युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपा एकमेकांना शत्रू म्हणून बघत असल्याचं समोर आलं आहे. वॉर्ड क्रमांक 127 च्या भाजपा नगरसेविका रितू तावडे यांच्या विरोधात शिवसेनेचे शाखाप्रमुख संजय कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही भाजपाच्या नगरसेविकेने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता.
हे सर्व कार्यक्रम 21 जानेवारीनंतर आयोजित करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप शिवसेनेचे 127 वॉर्डचे शिवसेना शाखाप्रमुख संजय कदम यांनी केला आहे. याबाबत रितू तावडे यांच्याशी संपर्क साधला असता 'हा कार्यक्रम सामाजिक संस्थेचा होता, यात इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळींना बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी स्त्री असल्याने मराठी कार्यक्रमाला जाणे गैर आहे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. तसंच अद्याप उमेदवारी घोषित झालेली नसल्याने आपल्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचा दावा रितू तावडे यांनी केला आहे.