Advertisement

'कामगार कायद्यातील बदल कामगारांच्या हिताविरुद्ध'


'कामगार कायद्यातील बदल कामगारांच्या हिताविरुद्ध'
SHARES

कामगार, शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांचा संयुक्त महाराष्ट्र घडवण्यात मोठा वाटा आहे. मात्र त्यांना न्याय मिळवून देण्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचेे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. कामगारांची गळचेपी करण्याच्या उद्देशाने व्यवसायिकीरणाच्या नावाखाली कामगार कायद्यांमध्ये मोठा गाजावाजा करून केंद्र आणि राज्य सरकारने अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांच्या काही तरतुदींमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हा बदल कामगार हिताच्या विरुद्ध आहे, असेही ते म्हणाले. ते भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे सोमवारी एल्फिन्स्टन रोड पश्चिम येथील कामगार क्रीडा भवनात 29 वा कामगार मेळावा आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्रातील 9 हजार 500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांना न्याय हवा आहे. परंतु हे सरकार त्यांच्याकडे पाहण्यास तयार नाही. बहुसंख्य मतांच्या जोरावर कायद्यात बदल करण्याचा सरकारचा मनमानी कारभार चालू आहे. मात्र या जुलमी सरकारच्या विरोधात संघर्ष करू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. यावेळी  अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी मोहन प्रकाश, आमदार भाई जगताप, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण यांच्या हस्ते 40 वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम केलेल्या दोन कामगारांचा सत्कार करण्यात आला. त्यात 'भीष्माचार्य' पुरस्काराने कामगार उत्कर्ष सभा संस्थापक सरचिटणीस विजय कांबळे यांना 25 हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानॉचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डाक टेलिग्राफ दूरध्वनी आंतरराष्ट्रीय युनियन आणि परिमंडळ सचिव राष्ट्रीय समन्वयक अशोक कौशिक यांना 21 हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह देऊन 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा